फार पूर्वी नाही पण साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर एक जाहिरात लागायची. आयोडिनयुक्त मीठ न खाल्ल्याने मुलांना, माणसांना Goiter (गोयटर) हा आजार कसा होतो ते त्यात दाखवलं जायचं. गळ्याच्या खालच्या भागातील ग्रंथी यात वाढलेली असायची. भारतातील काही तुरळक भागांत ज्या ठिकाणी खरंच मातीमध्ये, मिठामध्ये खनिज द्रव्ये कमी प्रमाणात आहेत त्या ठिकाणी हा आजार सापडायचा.
विशेष बाब म्हणजे त्याच्या काही वर्षांपूर्वीच याच भारतात प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे मीठ मिळावे म्हणून महात्मा गांधींना मिठाचा सत्याग्रह करावा लागला होता. त्याकाळी इंग्रज हे मीठ मोठमोठ्या उद्योगांबरोबरच त्यांच्या देशात रस्त्यावर पडणारा बर्फ हटविण्यासाठी वापरायचे. या मिठावर एवढे मोठे अर्थकारण अवलंबून आहे की, जे मीठ आपल्याला मोफत अथवा एक ते दोन रुपया किलोने मिळत होते तेच मीठ आता आपण चढ्या किमतीमध्ये आयोडिनयुक्त मिठाच्या नावाखाली विकत घेतोय. अशा प्रकारे कालांतराने भारतीय बाजारपेठेत याच मोठ्या मिठाचे बदललेले नाव व वाढलेले दर हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. आणि याच भारतात गोईटर ही व्याधी कमी झाली असली तरी वाढलेले थायरॉइडचे रुग्ण हाही एक स्वतंत्र संशोधनाचा विषय झाला आहे. कारण हा फक्त योगायोग नक्कीच नाही. याच्या पाठीमागेसुद्धा थायरॉइडच्या तपासणीपासून ते आयुष्यभर घेण्याच्या औषधांपर्यंत बऱ्याच मोठय़ा विदेशी कंपन्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
हेही वाचा… चॉइस तर आपलाच: सेल्फ पिटी की स्ट्रॉंग असणं?
भारतीय परंपरेतील चांगल्या व आरोग्यदायक गोष्टी बंद पाडणे व त्यावर अर्थकारण करणे हाच विदेशी कंपन्यांचा आजवरचा प्रमुख इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. थायरॉइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये केस गळणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, मासिक पाळीच्या तक्रारी, चिडचिड, नैराश्य, अंगावर सूज याबरोबरच अन्न सेवनाची इच्छा नसणे, काहींना डोळे बाहेर आल्यासारखे वाटणे, सततचा थकवा जाणवणे, शरीरातील रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, गळ्यावरील ग्रंथीला सूज येणे अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न भिन्न जाणवतात. हा आजार प्राधान्याने दोन प्रकारचा असतो. हायपो थायरॉइड किंवा हायपर थायरॉइड. या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला रुग्णाची वेगवेगळी लक्षणे जाणवतात.
काहींना गर्भवती झाल्यानंतर थायरॉइड मागे लागते. तर काहींचे वजन वाढू लागले की, तपासणीनंतर हे थायरॉइडमुळे झाले आहे असे समजते. खरंतर आयुर्वेदात हा पुन्हा अग्निदुष्टीचाच आजार आहे असे सापडते. पांडू व्याधीची अनेक लक्षणे या आजारात आढळतात. कित्येक रुग्णांचे वेगळे वेगळे निदान करूनही थायरॉइड पूर्ण बरा झाल्याचे अनेक रुग्ण आम्ही सध्या अनुभवत आहोत. हे होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आयुर्वेदानुसार मात्र रसवह व रक्तवह स्रोताची दुष्टी प्रमुख जाणवते. बाहेरील मीठ अधिक घालून दीर्घकाळ जतन करून ठेवलेल्या पदार्थाचे अति सेवन जसे की, चिप्स, सॉस, लोणची, बेकरीचे पदार्थ इत्यादी घेतल्याने शरीरातील मीठ, आयोडिन इत्यादी खनिज द्रव्यांचे संतुलन बिघडते व यांच्या दीर्घकालीन सेवनाने थायरॉइड हा आजार मागे लागतो. तसेच आहारात योग्य मिठाचे न केलेले सेवन, जेवणाच्या अनियमित वेळा, अनावश्यक घेतलेले ताणतणाव ही हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांपैकी काही महत्त्वाची कारणे आहेत. म्हणजे फक्त योग्य मिठाचा नियमित वापर व नियमित आहारसुद्धा आपणास थायरॉइड होण्यापासून वाचवू शकतो. तसेच भ्रामरी, उज्जनी प्राणायाम आदी थायरॉइडचे कार्य सुधारण्यास फार मोठी मदत करतात हेही आता सिद्ध झालं आहे.
हेही वाचा… जॉर्जिया मेलोनी यांच्यासारखं वागायला आपल्याला जमेल का?…
लक्षात ठेवा आजार काही आकाशातून पडत नाहीत, काही आजार हे बदलत्या जीवनशैलीतून निर्माण झालेले असतात. त्यांनाच आपण बदललेल्या जीवनशैलीचे आजार असे म्हणतो. मग आत्ताच थायरॉइडचे रुग्ण एवढे का वाढले? यामागे आपण नक्की कोणत्या जीवनशैलीत बदल केला आहे याचा मात्र विचार प्रत्येकानेच केला पाहिजे.
harishpatankar@yahoo.co.in