“सुमेधा, तुझ्या डायनिंग टेबलावर रव्याच्या ढोकळ्याचा डबा ठेवला आहे. सलीलला माझ्या हातचे ढोकळे खूप आवडतात. कसे झालेत ते तूही सांग आणि हो, संध्याकाळी मी सर्वांसाठी जेवायच्या वेळेस गरम गरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी आणून देईन. सलील घरी आला, की मला कळव. सोनूला मी माझ्याकडे खेळायला घेऊन जाते. तुझी आई आली आहे तर दोघींना बोलायला तरी वेळ मिळेल. नाहीतर मुलं अजिबात बोलू देत नाहीत. मी जाते गं बरंच आवरायचं आहे.”
केतकीने डबा ठेवला आणि सोनूला ती तिच्या घरी घेऊन गेली. सुमेधा आजारी असल्यानं साधनाताई चार तास प्रवास करून भेटायला लेकीला आल्या होत्या. सुमेधाची तब्येत आता बरी असली तरी तिला भयंकर अशक्तपणा आला होता. आपल्याला सुमेधाकडे यायला उशीर झाला, पण तिचा शेजार चांगला आहे. त्यामुळे तिची सोय झालीये हे पाहून त्यांना बरं वाटलं. त्या तिला म्हणाल्याच, “सुमेधा, नशीबवान आहेस तू. एवढी काळजी घेणारा, तुला मदत करणारा तुझा शेजार आहे. मग आता मलाही तुझी काही काळजी नाही.”
पण यावर सुमेधाचे उत्तर ऐकून त्यांना आश्चर्यच वाटलं. “आई, तुला काळजी वाटत नसेल, पण आता माझी काळजी वाढलीय. कधी कधी मला वाटतं, हे घर सोडून दुसरीकडे राहायला जावं.”
“अगं, असं का म्हणतेस? एवढा चांगला शेजार मिळाला आहे तुला. बघ, आता तुझी तब्येत बरी नाही तर, शेजारची केतकी तुझी किती काळजी घेत होती. संध्याकाळचे जेवणही ती तुला आणून देणार आहे.”
“आई, अगं हेच मला नको आहे. मी तिला काहीही सांगत नाही. मग ती एवढं माझ्या घरासाठी का करते? कधी कधी मला वाटतं, तिला ओरडून सांगावं, “बाई, बस्स आता, मला तुझी मदत नकोय, माझं मी बघेन.”
सुमेधा एवढी का रागावली आहे, हे तिच्या आईला समजेना, तरीही ती तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती.
“अगं, चिडतेस कशासाठी? शेजारधर्म म्हणून ती तुला मदत करते आहे.”
“आई, नकोय मला तिचा शेजारधर्म. ती केव्हाही माझ्या घरात घुसते. तिला हवं ते हक्काने मागून घेते, आणि तिनं काही आणलेलं मला नको असलं तरी जबरदस्तीनं घ्यायला लावते. तिची एवढी घुसखोरी मला अजिबात आवडत नाही. मलाही माझी स्पेस हवी असते याचा ती विचारच करत नाही. ती तिच्या घरात बऱ्याच वेळा काही करत नाही. पार्सल मागवते आणि सलीलच्या आवडीचं काही करायचं असेल तर तिचा उत्साह वाढतो. तिनं काही दिलं तर सलील तिचं भरभरून कौतुक करतो, मग ती पुन्हा त्याच्या आवडीचं काहीतरी करायला घेते. काही पदार्थांमध्ये सलील माझी आणि तिची तुलना करतो आणि मला ते अजिबातच आवडत नाही. ती सारखी माझ्या घरी येते आणि सलील घरी असेल त्या दिवशी जरा जास्तच येते. म्हणूनच हे घर बदलावं असा विचार माझ्या मनात येतो.”
हेही वाचा… आहारवेद: सांधेदुखीसाठी आरामदायी मोहरी
सुमेधाचा राग कसला आहे, ते आता साधनाताईंना समजलं. शेजारी चांगले असावेत, एकमेकांना मदत करणारे असावेत असं सगळ्यांनाच वाटतं, पण आपल्या मदतीची शेजाऱ्याला खरंच गरज आहे का? आपली मदत त्यांना आवडते का? याचाही विचार करणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे खासगी अवकाश हवं असतं. त्यात कोणीही घुसखोरी केलेली आवडत नाही. शेजार कितीही चांगला असला तरी आपल्या खासगी आयुष्यातील सर्व गोष्टी आपण त्यांना सांगत नाही, सर्व गोष्टीत शेजाऱ्यांची लुडबुड नको वाटते. शेजारधर्म पाळताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केतकीच्या मनात कोणताही स्वार्थ नसेलही, ती अगदी स्वच्छपणे शेजारणीला मदत करत असेल, पण जेव्हा ती सलीलच्याच आवडीच्या गोष्टी करते तेव्हा सुमेधाच्या मनात शंका उपस्थित होते. अशा वेळेस आपण शेजारच्याला किती मदत करावी याचा अंदाजही तिनं घ्यायला हवा.
हेही वाचा… पॉर्नस्टार मुलगीच का ?
शेजारच्याशी असलेलं नातं हे घरातील नात्यांएवढंच महत्त्वाचं असतं. जाता-येता एकमेकांशी कोणत्याही कारणावरून संबंध येतात, बोलावं लागतंच. नातेवाईक आपल्या जवळ नसतात एवढे शेजारी जवळ असतात. त्यामुळं त्यांच्याशी नातं तोडताही येत नाही, पण मग काहीच बोलायचं नाही आणि त्यांची आपल्या घरातील घुसखोरी सहन करायची असंही नको आणि आता घर बदलावं हाही विचार नको, कारण घरं बदलणं सर्वांसाठी सोपंही नसतं, म्हणून शेजारी तुटणारही नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीत त्यानं लक्षही घालू नये याचं तारतम्य ठेवून त्यांना योग्य शब्दात समजावून सांगणं गरजेचं आहे. नात्यांसाठी कधी कधी वाईटपणा घेणंही गरजेचं असतं. सुमेधाला या सर्व गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे, हे साधनाताईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी या दृष्टीने सुमेधा आणि केतकी दोघांनाही समजावून सांगण्याचं ठरवलं आणि त्या पुढील कामाला लागल्या.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)