“समीरा आज खूप नाराज दिसतं आहेस? काय बिनसलंय तुझं?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काही नाही ग, या वर्षीही सचिनदादा माझ्याकडे राखी बांधायला येणारच नाही, तो खूप बिझी आहे असं वहिनीनं कळवलं आहे “

“अग, तो बिझी असेल तर तू जा त्याच्याकडं, एवढं नाराज कशाला व्हायचं?”

“राधिका, अगं, ते शक्य नाहीये, गेल्या पाच वर्षांत मी दादाकडं गेलेली नाहीये.”

समीरा आज खूपच नाराज आहे, हे लक्षात आल्यामुळं राधिका तिच्याशी बोलून तिचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करीत होती. सचिन आणि समीरा दोघं जुळी भावंडं. लहानपणापासून सगळ्या गोष्टी दोघांच्या सोबतच झाल्या. दोघांचं एकमेकांशिवाय पान हलायच नाही. त्याचा जन्म आधी झाला म्हणून तो मोठा दादा झाला एवढंच. लहानपणापासून दोघही एकमेकांना खूप समजून घ्यायचे. भांडणं झाली तरीही एकमेकांशिवाय त्यांना करमायचं नाही. एकमेकांच्या सोबतीला दोघंही कायम हजर असायचे. सचिनच्या लग्नापूर्वी समीराचं लग्न झालं होतं, तेव्हा तो एकटा पडला होता. तिच्या सासरी जाण्यानं तो बेचैन झाला होता, तेव्हा बाबांनी त्याची खूप समजूत घातली. त्यानंतर त्याचं लग्न झालं आणि त्याचवेळी समीरा बाळंतपणासाठी माहेरी गेली होती.

हेही वाचा… घरातील वृद्धांचं ‘पालकत्त्व’ ही केवळ घरातल्या बाईचीच जबाबदारी असते का?

आईबाबा आणि सचिन सर्वजण तिची खूप काळजी घ्यायचे, रात्री बाळ त्रास द्यायचा तेव्हा तो बाळाला सांभाळत बसायचा आणि त्याच्या बायकोला हे अजिबात पटायचं नाही. नवीन लग्न झालेलं असताना बायकोला वेळ द्यायचं सोडून तो बहीण आणि त्याच्या तिच्या बाळाकडे एवढं लक्ष देतो हे वहिनीला अजिबातच पटलं नाही त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याच्या संसारात आपल्यामुळं अडचण नको म्हणून ती बाळ लहान असतानाच आपल्या सासरी परत आली. आईबाबा असेपर्यंत ती अधून-मधून त्यांना भेटायला जायची. पण करोनाच्या काळात दोघांचंही निधन झालं. त्याच्या नंतर समीराचं माहेर संपलं होत. वहिनीचा स्वभाव वेगळा आहे, आपण त्यांच्या घरी कधी गेलो तर त्यांच्यात वाद नको, तिला पटत नाही, दादाला त्रास नको हा विचार करून ती त्यांच्याकडे जाणं टाळायची, हे सर्व ती राधिकाला सांगत होती.

“राधिका, तूच सांग, मी कशी जाऊ त्याच्याकडे? पुन्हा पुन्हा ते वाद नकोच, त्यापेक्षा न गेलेलं बरं!”

प्रत्येक स्त्रीला माहेर हवं असतं. कितीही वय झालं तरी तिचं ते हक्काचं ठिकाणं असतं, आई वडिलांच्या माघारीही तिला तो आपलेपणा तिथं मिळायला हवा. भावा-बहिणीचं नातंही अतूट असतं. मग, फक्त वहिनीच्या येण्यानं त्यात कटुता का यावी?

अनेक कुटुंबात या पवित्र नात्यात दुरावा आल्याचं लक्षात येतं आणि बहिणीचं माहेरच बंद होऊन जातं. राधिकाला समीराच्या मनाची अवस्था कळत होती. समीरानंही मनावर ओझ न ठेवता, या नात्यातील कटुता कमी करणं गरजेचं होतं, तिच्या मनातील अपराधी भाव काढून टाकणं आवश्यक होतं आणि यासाठीच ती प्रयत्न करीत होती.

हेही वाचा… कृष्णसख्याच्या शोधातल्या असंख्य द्रौपदी आणि दुःशासनांची दुनिया!

“समीरा, तुझ्यामुळं सचिन दादा आणि वहिनी यांच्यामध्ये वाद होतात, हा तुझ्या मनातील समज तू काढून टाक. तू चार वर्षे त्यांच्या घरी गेलेली नाहीस म्हणजे चार वर्षे त्यांच्यात अजिबातच वाद झालेले नाही असं आहे का? त्यांचे वाद कोणत्या ना कोणत्या कारणावरून होत राहतात. तू जेव्हा जाशील तेव्हा तुझं एक निमित्त फक्त त्यांना मिळतं. तू त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. भाऊ आणि बहिणीनं आपसातील नातं अखंड राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. बहिणीनं भावाच्या संसारात हस्तक्षेप करू नये, तिनंही केवळ आपलं माहेरपण जपावं आणि वाहिनीशी मैत्रीपूर्ण संबध निर्माण करावेत. आपल्या येण्याचं तिला ओझं वाटू नये याचीही काळजी घ्यावी. भावानेही आपल्या बहिणीशी नातं अखंड राहण्यासाठी बहीण-भावाच्या नात्यात पत्नीने हस्तक्षेप करू नये ही समज पत्नीला द्यावी. त्यासाठी थोडी कटुता सहन करावी लागली तरी आपलं म्हणणं पटवून देता यायला हवं. त्या घरातील बहिणीचं स्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा. तिचं माहेर तिला अखंड मिळेल हा प्रयत्न करावा. कोणत्याही स्त्रीला माहेरकडून किती रकमेचं गिफ्ट मिळालं यापेक्षा प्रेम आणि आपुलकी किती मिळाली हे महत्त्वाचं असतं. समीरा, दादाशी तू बोलून घे आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी तुला जाता आलं नाही तरी येत्या रविवारी जाऊन त्याला भेटून ये, त्याला राखी बांध, औक्षण कर, त्याशिवाय तुलाही समाधान वाटणार नाही. कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता, आनंदाने जा.”

खरं तर समीराच्या अंतर्मनात हेच होतं, पण तिच्या मनात येणारे नकारात्मक विचार तिला थोपवता येत नव्हते आणि त्यामुळं तिच्या मनाचा गोंधळ होत होता. पण राधिकाशी बोलल्यावर तिला खूपच हलकं वाटलं आणि रविवारी दादाच्या घरी जाण्याचं तिचं नियोजन सुरू झालं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship between brother and sister and issue of interference in respective families by themselves dvr