चांगले चार वर्ष प्रेमसंबंध असलेले सारा आणि समर आता लवकरच लग्नबेडीत अडकणार होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्न सहा महिन्यांनी करायचं ठरलं, पण आताशा त्यांचे सारखे वाद होऊ लागले होते. तिला समरच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. आतापर्यंत आपल्या करिअरची तारीफ करणारा, आपल्या प्रगती वरून खुश होणारा समर, आजकाल त्यावरून टोमणे मारू लागला होता.
आणखी वाचा : आहारवेद:घातक वनस्पती तूप
आधी तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींशी हसून बोलणारा आजकाल जरा चिडचिड करत बोलतो. ती उशिरा पर्यंत बाहेर असलेली दिसली की हजार प्रश्न विचारतो. सतत तिच्या पागाराचं ती काय करतेय, किती खर्च करतेय याची चौकशी करत राहातो… अशा अनेक दृश्य बदलांमुळे ती थोडी काळजीत पडली होती. त्याचे हे बदललेले रूप तिला अस्वस्थ करू लागले. आता त्याच्या भेटीने, फोनमुळे ती मोहरत नव्हती. आता तिला पूर्वीसारखी त्याची आस नव्हती. आता त्याचं नाव काढलं की हुरहूर वाटण्या ऐवजी कपाळावर आठ्या येत. ती त्याला टाळू लागली…
आणखी वाचा : झोपू आनंदे : स्वप्नांचा मागोवा
“सारा अगं, तीन कॉल्स येऊन गेले समरजीजूंचे. तू बोलत का नाहीस ? नाराज आहेस का?” साराची लहान बहीण विचारत होती. “पुन्हा फोन आला तर सांग, दिदी मीटिंग मध्ये आहे म्हणून !” हे असं तीन दिवस चालल्यावर समर मुंबईवरून सरळ साराच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याला टाळण्याचं कारण विचारलं तर साराने जरा ठामपणे सांगितलं, “ लग्नाआधीच जर तू मला इतकी बंधनं घालतो आहेस, तर लग्नानंतर तू मला मोकळा श्वास घेऊ देणार नाहीस. आधी प्रेमात पडलेला समर आणि आता लग्न ठरल्यावर हक्क बजावणारा समर यात फार ताफावत आहे. बरं झालं मला वेळीच वास्तव कळलं, नाहीतर लग्न करून मी विचित्र तिढ्यात अडकले असते.” साराने स्वत:साठी अशी ठाम भूमिका घेतली. घरात थोडे वाद झाले, पण शेवटी त्यांचं लग्न मोडलं.
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : ब्रेकअप.. पुढे काय?
वेद आणि विनिता यांचं एका विवाह संस्थेमार्फत लग्न ठरलं. घाईघाईत साखरपुडाही झाला. दोन्ही बाजूने भरपूर खर्च करण्यात आला, पण विनिता साशंक होती. आपल्याला वेदशी बोलण्यास, त्याला समजून घेण्यास थोडा वेळ हवा होता, असं तिला वारंवार वाटू लागलं. तसा वेळ त्यांना मिळाला, पण साखरपुड्यानंतर. प्रत्येक भेटीत तिचा अपेक्षाभंग होऊ लागला. वेदच्या घरचं वातावरण तिला फार गंभीर वाटलं. तिच्या घरी सगळे खूप मोकळे, बोलके आणि खिलाडू वृत्तीचे असल्याने तिला तो फरक फार जाचक वाटला. काही भेटीत तिचं मत पक्क झालं. तिनं सरळ त्याला गाठून तिचं मन मोकळं केलं.
“हे बघ वेद, आपल्या घरच्यांनी आपलं लग्न पक्क करण्याची फार घाई केली असं मला वाटतं. थोडा वेळ द्यायला हवा होता. तुमच्या आणि आमच्या घरातल्या वातावरणात, वागण्यात फार फरक आहे. पुढचं सारं आयुष्य जिथे काढायचं तिथे इतकं गंभीर वातावरण असेल तर मी गुदमरून जाईन. आपली मनं अजून जुळलेली नव्हती. आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो आणि आता थेट आपलं लग्न ठरलं आहे. पण मला आपल्यातला फरक जाणवतो आहे. तुझ्या माझ्या आवडी निवडी खूप वेगवेगळ्या आहेत. मी जरा खर्चिक तर तू काहीसा कंजूस. मला खूप जास्त मित्रमैत्रिणी आहेत आणि तुला अजिबातच नाहीत. तू नको तितका अबोल आहेस. माझी तर घुसमट होईल अशाने. या गोष्टी लग्न ठरवताना नाही समजल्या, पण आता लक्षात येत आहेत. म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. वेदने तिला बराच वेळ समजावण्याचा प्रयत्न केला. या तशा फार किरकोळ बाबी आहेत, आपण सहज जुळवून घेऊ शकतो, असंही सांगितलं, पण विनिताला कुठलीही तडजोड मान्य नव्हती.
पण साखरपुडा झाल्यावर हा नकार घरच्यांना कसा सांगणार? म्हणून तिनं वेदलाच गळ घातली, की त्याने स्वतःच त्याच्या घरच्यांना सांगावं की त्याला वनिता अजिबात पसंत नाही. वेदसाठी ही सगळी तारेवरची कसरत होती, पण विनिताच्या जिद्दीपुढे त्याला मान झुकावावी लागली. कधी कधी ही वेळ मुलग्यांवरही येते. आपली होणारी पत्नी फार आक्रस्ताळी, हट्टी, टोकाची मतं असणारी आहे हे समजल्यावर मुलगा लग्न मोडण्यात पुढाकार घेऊ शकतो.
लग्नसंबंध म्हणजे आयुष्यभराची गाठ. निर्णय घेण्याची घाई करून कसं चालेल? तिथे संयम असावाच लागेल. पूर्वीचा काळ वेगळा होता, वृत्ती वेगळी होती ‘लग्न करून टाकू, बाकी होत राहील आपोआप’ असं म्हटलं जात असे. लग्न टिकवण्याकडे कल होता. त्यात कुणाचं मन भरडलं गेलं तरी फारसा विचार होत नसे. आता तसं नाही. आता काळ बदलला आहे. मुलगा मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत की नाही हे तपासण्यासाठी थोडा कालावधी द्यावा लागेल. नाहीतर विनाकारण साखरपुड्याचा घाट घालून दोहो बाजूने पैसा, वेळ खर्ची पडून मनस्ताप विकत घेणं दोन्ही कुटुंबांसाठी क्लेशकारकच.
adaparnadeshpande@gmail.com