तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का, की आपण नात्यातील एखाद्या व्यक्तीस काही निमित्ताने नीट विचारपूर्वक, त्यांच्या आवडीनिवडीनुसार भेटवस्तू विकत आणतो, आकर्षक वेष्टनात सजवून त्यांना भेट देतो, आणि त्या व्यक्तीस ती वस्तू खूपच आवडल्याचं सांगितलं, की मनापासून भरून पावतो. पण आपण खरंच फक्त तेवढ्यावर थांबतो का? म्हणजे भेट देऊन निरपेक्षपणे आपण त्या विषयातून बाहेर येतो का? उत्तर आहे… नाही! आपण त्या व्यक्तीस महागडी भेटवस्तू दिली हे आपण बहुतांश वेळा लक्षात ठेवतो. जेव्हा आपल्याकडे काही कार्य असतं तेव्हा ती व्यक्ती आपण त्यावेळी दिलेल्या भेटवस्तूची परतफेड नक्की करणार ही नकळत अपेक्षा ठेवतो, आणि तसं झालं नाही तर पुढे कितीतरी काळ त्या व्यक्तीबद्दल मनात थोडासा आकस ठेवतो. चार वेळा बोलून दाखवतो.
आणखी वाचा : …त्याचं कारण फक्त ‘बिग बॉस’च!
अनेकदा भेटवस्तू किंवा ‘देणंघेणं’ हे नात्यात दरी पडण्याचं कारण असल्याचं आढळून येतं. हा अनुभव तुम्हाला आला असेल तर असं वाटणारे फक्त तुम्ही एकटे नाही आहात. फार मोठ्या प्रमाणात सर्व सामान्यांमध्ये ही अशीच भावना असते. नात्यातील पुरुष मंडळींचं याकडे फारसं लक्ष नसतं, असं मानलं जातं. पण स्त्रिया या बाबतीत फार बारकाईने विचार करतात आणि मनासारखी भेटवस्तू न मिळाल्यास मनात ‘डूख’धरून असतात, असं निरीक्षण आहे.
आणखी वाचा : तणावपूर्ण जीवनशैलीही विस्मरणाला कारणीभूत!
काही संवाद…
जसं की … “तुमच्या बहिणीला मी वाढदिवसाला किती भारी ड्रेस दिला होता. आणि तिनं बघा हे काय दिलं मला.” किंवा “तुझ्या आईवडिलांनी आपल्या पाचव्या अॅनिव्हर्सरीला सून म्हणून मला सोन्याचा दागिना करायला हवा होता. त्यांना काही कौतुकच नाही माझं! मीच मूर्ख म्हणून सासूबाईंना इतकी भारी पैठणी घेऊन आले.” “ काय गं तुझा भाऊ? लाखोंनी कमावतो, पण मला गिफ्ट देताना कधीच ब्रॅण्डेड शर्ट घेत नाही.” अथवा “तुमच्याकडे ना आहेराची परंपरा जरा कमजोरच आहे बाई. त्या ***कुटुंबात बघा, सगळ्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून चांदीच्या वस्तू दिल्या. नातं टिकवायचं तर असं करावं लागतं माहितेय का…” अशा प्रकारची वाक्य आपल्या आजूबाजूला अगदी सहजपणे कानावर पडतात.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नानंतर वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास काय करावं?
नातेसंबंध जपताना स्नेह म्हणून किंवा प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून, कौतुक म्हणून भेट देणं अगदी रास्त आहे. देणारा आणि घेणारा असे दोघंही आनंद देतात, घेतात. पण या देण्याघेण्यात वस्तूंचं मोल भावनेपेक्षा किंवा नात्यापेक्षा जास्त होऊ लागल्यास संबंधांना तडा जातो. भेट वस्तू काय आहे यापेक्षा कुणी आणि कोणत्या भावनेने दिली आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं नाही का? लग्नात आईवडिलांनी मनासारखा खर्च केला नाही म्हणून स्वतःच्या आईवडिलांना दूषणं देणाऱ्या मुली बघितल्या, की त्यांची कीव करावी वाटते. आपली ऐपत नसताना केवळ नातं जपण्यासाठी पैसा उधार घेऊन भेटवस्तू किंवा आहेर घ्यावा लागत असेल तर ते नातं खरंच टिकविण्याच्या लायकीचं आहे का, याचा विचार व्हायला हवा.
आणखी वाचा : ‘त्या’ अभिनेत्रींसारख्या सासूबाई मिळाल्या तर…
काही ठिकाणी समोरील व्यक्तीस ओझं वाटावं, वस्तूच्या किमतीखाली ती दबून जावी म्हणून मुद्दाम अत्यंत महागड्या भेटी दिल्या जातात. दुसऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यास ती परतफेड न करू शकल्याने एकतर मनाने दूर जाते किंवा कायम दबलेली असते. आपल्या श्रीमंतीच्या बळावर नात्यातील लोकांना असं दाबून टाकणाऱ्या व्यक्तींना कणखरपणे उत्तर देण्याची ताकद असेल तर ठीक, नाहीतर मग संबंध कायमचे तुटतात.
आणखी वाचा : SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !
नातं टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता आहे ती प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास यांची. भेटवस्तू हे फक्त एक संबंध दृढीकरणाचं किंवा प्रेमाच्या प्रकटीकरणाचं माध्यम आहे इतकंच! त्याला तितकंच महत्त्व द्यायला हवं. नात्याला तडा जाण्याचं ते एक कारण नक्कीच व्हायला नको.
adaparnadeshpande@gmail.com