नवरा बायको म्हणे एका रथाची दोन चाकं! माय फूट! नवरा बायको चाकं नाही, मी तर म्हणेन की नवरा जर गाडीचं बॉनेट असेल तर बायको मागचं बंपर! दोन टोकं! असा संताप येतो ना मला या नवऱ्याचा!” ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी सुरेखा तडतडत होती आणि मानसी शांतपणे तिचं ऐकून घेत होती. “तू आधी शांत हो सुरेखा. सकाळपासून बघतेय, कामात लक्ष नाही तुझं. भांडण झालं दिसतंय सुमेध सोबत.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : नातेसंबंध: लहान भाऊ वयात येतोय?

“अगं या नवऱ्यांना कधी कधी अजिबात स्वतःची मतं नसतात. छोट्या छोट्या गोष्टीत बायकोचा सल्ला मागतात. शर्ट कोणता घालू?आज शूज घालू की स्यांडल? या मित्रा बरोबर जाऊ की नको? असल्या फालतू गोष्टीत सल्ला मागायचा. आपण बायकोचं किती ऐकतो असं दाखवायचं आणि मोठ्या निर्णयात विचारायचंच नाही? बंगळुरूला जॉब लागलाय त्याला. कधी इंटरव्ह्यू दिला, कधी ठरवलं? काही काही बोलला नाही. पॅकेज जास्त होतं म्हणून ठरवून मोकळा झाला. आणि वर काय म्हणतो, “आपल्याला मूल होणारच, तेव्हा तुझे माझे आईवडील येतीलच. मग तुला एकटं वाटणार नाही, म्हणून मी त्यांना हो म्हणालो.’ अगं, कधी होणार मूल आम्हाला? याला माहीत आहे का? जिच्या पोटी जन्म होणार तिचं मत नको विचारायला ? सगळं काही हाच ठरवणार का? आणि वर म्हणतो, ‘त्यात काय इतकं?’ असा संताप आलाय म्हणून सांगू.” मानसीला सुरेखाचा त्रागा समजत होता, कारण तीही त्यातून गेली होती. पण तिचा स्वभाव शांत असल्याने ती परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळत होती. मानसीच्या नवऱ्यानं तर राहतं घर तिला न सांगता विकून टाकलं होतं. का, तर मोठ्या फ्लॅट मध्ये जाण्याचं सरप्राइज द्यायचं होतं म्हणून.

आणखी वाचा : नातेसंबंध: आईवडील लग्नासाठी मागे लागले आहेत?

अनेक घरात पुरुष मंडळी म्हणजे नवरे मंडळी बायकोला गृहीत घरून एकतर्फी निर्णय घेऊन मोकळे होतात . तिचं मत घेतच नाहीत आणि मग आपण डावलल्या गेलोय म्हणून ती दुखावते, तर कधी तिचा संताप संताप होतो. अनेकदा नवरे मंडळी आधी न सांगता अचानक मित्रांना जेवायला बोलावतात. बायकोला माहीतच नसतं. मग ऐन वेळेवर तिची फजिती होते. कधी तिनं सुट्टीचा काही दुसरा प्लान आखलेला असतो. बायकोचा संताप होतो, आणि नवरे म्हणतात त्यात काय इतकं? खरं तर अनेक पुरुषांना नीट नियोजन न जमल्याने त्यांच्या बायकांना असा त्रास होतो. कधी कधी त्यांच्या हे लक्षातच येत नाही, की बायकोची देखील काही वेगळी इच्छा किंवा अपेक्षा असू शकते. आपल्या पत्नीला प्रत्येक निर्णयात सामील करून तिचं मत विचारायला हवं याची जाणीव अचानक होत नसते. ती जाणीव त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्या आई वडिलांच्या वागण्यातून, सांगण्यातून यायला हवी. पुरुषांना स्त्रीच्या म्हणण्याचा आदर करता आलाच पाहिजे हा विचार वाढत्या वयापासून सहजगत्या मनावर बिंबवल्या गेला पाहिजे. ती विचारांची पेरणी जर आधी झाली नसेल तर लग्नानंतर अशा पुरुषांच्या बायकांना प्रत्येक प्रसंगानंतर आणि प्रत्येक मोठ्या निर्णयानंतर बंड पुकारावं लागतं.

सुरेखानं हेच केलं. ती म्हणाली, “तू तुझ्या करिअर मध्ये खूप पुढे जावं अशी माझी पण इच्छा आहे, पण यापुढे जर तू मला विश्वासात न घेता असा सरळ सरळ निर्णय घेऊन टाकलास तर मी देखील तुझा सल्ला मागत बसणार नाही. आता तू बंगळुरूला जातो आहेस तर काही दिवसात मीसुद्धा बंगळुरूला ट्रान्स्फर करवून घेते. आपण तिथे एकत्र राहू, पण मूल कधी आणि केव्हा होऊ द्यायचं या बाबतीत निर्णय तू एकटा नाही घेणार. हाच काय कुठलाही निर्णय तू एकटा नाही घेणार. आपले भलेही मतभेद होतील, पण माझं मत न विचारता तू परस्पर निर्णय घेणार नाहीस.” तिच्या या मताशी मानसी सहमत होती. तिला देखील आता तिच्या नवऱ्याशी स्पष्ट बोलायची गरज जाणवली. नवरे मंडळी जर अशी वागत असतील तर बायकांना ठामपणे आपली बाजू मांडता आलीच पाहिजे नाही का ?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship husbands takes the decision without consulting wife whats wrong vp