सुमित्रानं आज घाईघाईनं मला बोलावून घेतलं होतं. तिच्या चेहऱ्यावरील चिंता मला स्पष्ट दिसत होती. मुलगी, प्राची सासरचं घर सोडून आली आणि पुन्हा नांदायलाच जायचं नाही म्हणते, हे ऐकून कोणतीही आई काळजी करणारच. मी प्राचीशी बोलावं अशी तिची इच्छा होती.
मी तिच्या रूममध्ये गेले तर ती वेबसीरिज बघण्यात मग्न होती. मला बघून तिनं ती सीरिज पॉज् केली, कानातले हेडफोन काढून बाजूला ठेवले.
आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?
“हाय मावशी, कधी आलीस? आज कोर्टला सुट्टी आहे का?”
“प्राची, अगं, मी सुट्टीवरच होते. भाची आल्याचं समजलं. म्हटलं, भेटून यावं. बरं, आता किती दिवस मुक्काम आहे ते सांग म्हणजे तू असेपर्यंत एक गेटटुगेदर करू या.”
“मावशी, आता मी इथंच आहे. तू केव्हाही सांग, आपण ठरवू.”
“इथंच आहे म्हणजे?”
“म्हणजे मी आता प्रतीककडे जाणार नाही. आईकडेच राहणार आहे. त्याला त्याच्या आईसोबतच राहू देत. मी वेगळं होण्याचं ठरवलं आहे.”
“प्राची, तू हे सगळं इतक्या शांतपणे सांगते आहेस? याच्या परिणामांचा विचार तरी केलास का?”
“मावशी, ज्या माणसाला माझी किंमत नाही त्याच्यासोबत राहण्यात काही अर्थ आहे का?”
आणखी वाचा : रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये वाढतो ‘ऑस्टिओपोरोसिस’चा धोका; ‘या’ लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष ठरेल घातक
“प्राची, काय झालंय? मला शांतपणे सांगशील का?”
“मावशी, प्रतीकने माझ्याशी लग्न केलंय, पण तो कधीही माझ्याशी एकरूप झाला नाही, कारण त्याच्या आईनं आम्हाला मोकळेपणाने कधी एकत्र येऊच दिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप असतो आणि त्यालाही सर्व गोष्टी आईशी बोलायच्या असतात. रविवारी आम्हा दोघांना कुठे फिरायला जायचं असेल तर जाता येत नाही, कारण त्याचं म्हणणं असतं, आईला एकटीला ठेवून कसं जायचं? मग त्यांना घेऊनच आम्हाला जावं लागतं. प्रत्येक गोष्टीत त्यांचा विचार तो आधी करतो. दिवाळीला मला नेकलेस करण्याचं त्यानं कबूल केलं होतं, पण आईलाही काही तरी दागिना करायला हवा आणि तेवढं बजेट आत्ता नाही म्हणून त्यानं तेही करण्याचं पुढं ढकललं. हे मला अजिबात पटलं नाही. त्यावरूनही आमची भांडणं झाली. मावशी, अगं, तो प्रत्येक गोष्टीत माझी तुलना आईशी करतो. तुला आईसारखं हे करता येत नाही, तुला आईसारखं ते जमत नाही. माझं काही अस्तित्व त्या घरात आहे की नाही? रोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आधी तो त्यांच्याशी गप्पा मारणार आणि नंतर बेडरूममध्ये येणार, म्हणजे माझ्या वेळेतही त्या वाटेकरी. मी माझं मन किती मारायचं?
आणखी वाचा : आदिवासी विद्यार्थिनींना फेलोशिप
परवा तर हद्दच झाली. अगं, आमच्या लग्नाला आता पुढच्याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही दोघांनी ठरवलं होतं, लग्नानंतर किमान तीन ते चार वर्षं प्लानिंग करायचं, स्वतःचं घर आणि काही ठरावीक बचत करायची आणि मग मुलांबाबत विचार करायचा. हे सगळं ठरलेलं असताना आता त्याची आई म्हणते म्हणून आणि तिला आजी व्हायची हौस आहे म्हणून आम्ही लग्नाला एक वर्ष झाल्यावर लगेचच मुलाचा विचार करायचा, असं प्रतीकचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही मूल केव्हा जन्माला घालायचं हेही त्याच ठरवणार? बस्स… मी आता त्याच्या ‘आई -आई’ या प्रकरणाला वैतागले आहे. मी त्याला स्पष्टच सांगितलं, की तू वेगळा राहणार असशील तरच मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे, पण तो मला म्हणाला, मी आईला सोडून कधीच वेगळा राहणार नाही. त्याला त्याची आई सोडायची नाही आणि मला आता त्याच्या आईसोबत राहायचं नाही. त्यामुळे, मी आता प्रतीकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्याच्याकडे मी पुन्हा कधीही जाणार नाही.”
आणखी वाचा : मेन्टॉरशिप – पप्पांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय…
“प्राची, कोणताही आततायीपणा करून, घाईनं निर्णय घेणं योग्य नाही. तू कधी प्रतीकच्या बाजूनं विचार करून पाहिला आहेस का? त्याचे वडील गेल्यानंतर त्याच्या आईनंच त्याला वाढवलं, चांगलं शिक्षण दिलं, त्याला सक्षम बनवलं. आता आईसाठी आपण काही करायला हवं असं प्रतीकचं म्हणणं असणार. तुमचं लग्न झाल्यानंतर आईला एकटं वाटू नये याची काळजी तो घेतो आहे.
एक लक्षात ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी पहिली स्त्री ही त्याची आई असते. प्रतीकचंही तसंच आहे. तिच्याविषयी त्याच्या मनात नेहमीच पहिलं स्थान असतं. तो लहानपणापासून प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करीत आलेला आहे, फक्त लग्न झालं म्हणून ही त्याची सवय लगेच बंद होणार आहे का? किंवा व्हावी का? काही काळ त्याच्यासाठी जावा लागेल. तुला तुझं अस्तित्व त्या घरात निर्माण करावं लागेल. तो त्याच्या आईचा जेवढा विचार करतो, तेवढाच तूही करतेस हे त्यालाही पटायला हवं. प्रतीकला वडील नाहीत, तसंच भाऊ, बहीण कोणीही नाही. मग आईला एकटीला सोडून स्वतंत्र वेगळं राहणं हे त्याच्या पचनी पडणार आहे का? आणि केवळ यासाठी तुम्ही दोघांनी वेगळं होणं योग्य होणार आहे का?”
आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
“पण मावशी, मी तरी काय करू? लग्नानंतर त्यानं त्याची प्रायॉरिटी बदलायला नको का? मला वेळ द्यायला नको का? आईशी माझी तुलना करणं थांबवायला नको का?”
“नक्कीच. त्यानंही त्याच्या वागण्यात बदल करायला हवा. आपली पत्नी आणि आपली आई या दोघींना सांभाळताना दोघींच्या वेगळ्या अपेक्षा असणारच आहेत आणि दोघींच्या सर्व अपेक्षा आपण पूर्ण करू शकणार नाही, याची जाणीव ठेवून योग्य वेळी योग्य व्यक्तीला न्याय देणं गरजेचं आहे. आपण पत्नीला वेळ देतो म्हणजे आईवर अन्याय करतो, असं नाही. तसंच आईसारखं वागणं पत्नीला जमेलच असं नाही या गोष्टीचा स्वीकार करून त्यानंही बदल करायला हवेत.”
आणखी वाचा : उपयुक्त : ‘बीबी क्रीम’ आणि ‘सीसी क्रीम’: फरक काय?
“मावशी, तू त्यालाही हे समजावून सांगशील का? मलाही माझा संसार करायचा आहे, पण माझाही कम्फर्ट झोन मला त्या घरात हवा आहे.”
प्राची आता योग्य वळणावर आली होती. नाती सांभाळताना माझंच खरं असं म्हणून चालणार नाही हे हळूहळू तिलाही कळायला लागलं याचं मलाही समाधान वाटलं.
smitajoshi606@gmail.com