सुषमाने खूप विनंती केल्यानं मी तिला आज नाही म्हणू शकले नाही. पण तिचं फोनवरचं संभाषण ऐकल्यानंतर ती फारच डिस्टर्ब आहे हे माझ्या लक्षात आलं. ती आली, बसली. अत्यंत अस्वस्थ होती.
“ये सुषमा, बैस बरं आधी. हे पाणी घे प्यायला, थोडी शांत हो. एवढी धावपळ करीत येण्यापेक्षा तू फोनवर माझ्याशी बोलू शकली असतीस.
“मला जे सांगायचं आहे ते फोनवर बोलण्यासारखं नाही म्हणूनच प्रत्यक्ष आले.”
ती घटघटा पाणी प्याली. पर्समधील रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला, एक आवंढा गिळला आणि बोलायला सुरुवात केली.
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : कोरिओग्राफर दीपाली विचारे- लाभली चालती बोलती विद्यापीठं !
“मॅम तुमच्याशी कसं बोलू तेच मला कळतं नाहीये, हे बोलायला लाजही वाटते आहे, पण मी कोणाजवळच बोलू शकत नाही म्हणून तुमच्याकडे आले आहे. माझे सासरे माझ्याशी अतिजवळीक करण्याचा प्रयत्न करतात. मला जवळ बसायला सांगणं, माझ्या पाठीवरून हात फिरवणं, माझा हात हातात घेणं, मला स्पर्श करणं. शी. मला किळस येते या सगळ्याची. काल तर ते माझ्या बेडरूममध्ये येऊन मी झोपले होते त्या बेडपाशी आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत बसले. मला जाग आल्यावर मी वैतागलेच आणि त्यांच्यावर खूप ओरडून बोलले. माझा नवरा सचिन त्यावेळी घरात नव्हता, पण मी बोलल्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं आणि त्रास व्हायला लागला म्हणून मी डॉक्टरांना फोन केला त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. काल रात्री त्यांना ॲडमिट केलं. आता त्यांची तब्येत बरी आहे. संध्याकाळी त्यांना घरी आणणार आहेत, पण मी सचिनला सांगितलं आहे की, आता मला त्यांच्यासोबत राहायचं नाही, पण मी सांगितलेल्या सर्व गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो, तुला त्यांच्यासोबत ॲडजस्ट करावंच लागेल म्हणतो. मला ते समोर आले तरी त्यांचा राग येतो–मी काय करू?”
आणखी वाचा : फॅशनमधले अचाट तोडगे : ‘ब्रा’ऐवजी वापरल्या जाणाऱ्या ‘पेस्टीज्’!
सुषमा आणि सचिन या दोघांच्याही घरची परिस्थिती मला माहिती होती. या दोघांचा हा पुनर्विवाह होता. सचिनचा पहिला घटस्फोट झाल्यानंतर लग्न करायचं नाही, असं त्यानं ठरविलं होतं, परंतु आईचं करोनामुळे निधन झाल्यानंतर त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांचं वय ८० वर्षं असल्यानं त्यानं घटस्फोटित सुषमाशी पुनर्विवाह केला होता. सचिनचे वडील सरकारी नोकरीत होते. निवृत्तीनंतर पत्नीबरोबरचं आयुष्य खूप चांगलं गेलं होतं, पण वयोमानानुसार त्यांना रक्तदाब, मधुमेह, आणि विस्मरण यांचा त्रास सुरू झाला. आपण काय वागतो, कसं वागतो, काय बोलतो याचंही त्यांना कधी कधी भान राहायचं नाही.
आणखी वाचा : बाळंतपण नैसर्गिक की सिझरीयन; त्याचा बालकांच्या लसीकरणावर काय परिणाम होतो?
सचिन हा त्यांचा एकच मुलगा. त्यांना सोडून राहणं सचिनलाही खरंच शक्य नव्हते. या बाबतीत सुषमालाच समजून घेणं गरजेचं होतं. तिच्या मनातील विचार काढून टाकण्याचा मी प्रयत्न करीत होते.
“सुषमा, अगं, म्हातारपण म्हणजे एक प्रकारचं बालपण असतं, लहान मुलांनी काही केलं तर आपण मनावर घेत नाही तसेच वृद्ध व्यक्तींचं काही चुकलं तर दुर्लक्ष करायला हवं.”
“ त्यांनी इतर कोणताही त्रास दिला असता तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण हे स्पर्श करणं, माझ्याजवळ बसणं मला आजिबात आवडत नाही आणि ते मी सहनच करू शकत नाही, मी जर पोलिसांत अशी तक्रार दिली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, मला या सर्व प्रकाराची अत्यंत चीड आलेली आहे आणि माझा नवरा माझ्या भावना समजून घेऊ शकत नाही.”
तिच्या आविर्भावावरून ती त्यांचा तिरस्कार करत होती, तिचा रागराग मला समजत होता.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात कुंडलीचे मोल?
“सुषमा, तू त्यांची मानसिकता समजून घे. त्यांनी तुला केलेला स्पर्श हा लैंगिक सुखाच्या हेतूनच केला असेल असं नाही. वयस्कर व्यक्तींना आपल्या जवळ कोणीतरी बसावं, आपला हात हातात घ्यावा, आपण कोणावर तरी माया करावी असं वाटत असतं. शंकररावांची पत्नी गेल्यानंतर त्यांना खूप एकटं वाटतं आहे, त्यांच्या मनावर झालेला तो खूप मोठा आघात आहे. पोलीस तक्रार करून, त्यांच्यावर आरोप करून तुला काय मिळणार आहे? तुझ्या वडिलांनी तुला मायेने कधी जवळ घेतले नाही का? तुझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही का? त्यांनी तुला स्पर्श केला हे खरं असलं तरी नको त्या ठिकाणी स्पर्श केलेला नाही. बाईला स्पर्श कळतो. तू या गोष्टीचे अवडंबर करू नकोस, त्याला सामोरे जा. आणि अगदीच त्यांचा हेतू वाईट आहे, असं तुझ्या लक्षात आलं तर चिडचिड न करता योग्य शब्दांत त्याची जाणीव तू त्यांना करून दे. प्रश्न वाढवू नकोस ते सोडवण्याचा प्रयत्न कर.”
सुषमाचा राग आता शांत झाला होता. मी जे बोलले त्यावर ती विचार करीत होती. चष्मा बदलला की समोरच जगही वेगळं दिसतं याची प्रचीती तिला घ्यायची होती.
smitajoshi606@gmail.com