वंदना सुधीर कुलकर्णी
संपूर्ण ग्रुप आज जवळजवळ एक आठवड्यानंतर भेटला होता. परंतु पम्याची अस्वस्थता अजूनही गेली नव्हती. ‘बेवक्त बारिश’ आणि त्याचे चिंताजनक परिणाम त्याच्या डोक्यातून जाता जात नव्हते. त्याला ती रात्र आठवली. तो एका वेगळ्या ग्रुपबरोबर हिमालयात ट्रेकिंगला गेला होता. ट्रेकमध्ये त्याची एका मुलीशी छान मैत्री झाली. ट्रेक संपला त्या दिवशी सर्व जण आपापल्या मार्गाने पुढे जाणार होते. पम्या आणि ती एकाच शहरातले. त्यांची गाडी दुसऱ्या दिवशी रात्रीची होती. त्या दोघांना वाटलं, त्या शहरात फिरण्याऐवजी आज रात्री इथेच राहू दोघे. उद्या सकाळी लवकर निघू. मग ते त्या छोट्या गावात फिरायला बाहेर पडले. आवडलेल्या निसर्गरम्य परिसरात थोडे रेंगाळले…
आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?
हिमालयात दुपारी दोननंतर हवा बदलते. सोसाट्याचा वारा सुटला. पूर्ण अंधारून आलं. तुफान पाऊस सुरू झाला. ते चिंब भिजून कसेबसे हॉटेलमध्ये पोचले. थोडे भांबावलेले, थोडे गोंधळलेले, थोडे संकोचलेले, थोडे घाबरलेलेही…पण एकांत मिळाला होता. पावसामुळे वातावरण अधिकच रोमँटिक होऊन गेले होतेच… त्यात तरुण वय… इतक्या छोट्या ओळखीवर इतकं इंटीमेट होण्याबद्दल त्या मुलीच्या मनात खूप गोंधळ होता. पम्याही थोडा भेदरलेलाच होता; पण अखेर दोघांचाही बांध फुटला. निसर्गाने त्याचे काम केले. यथावकाश ते परतले. ‘रात गयी बात गयी’ असं दोघांनाही वाटत असताना त्या मुलीचा अचानक पम्याला फोन आला. तिची पाळी चुकली होती.
आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…
मुळात पाळी नियमितच नसल्याने, सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं. मग तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दरम्यान, ती कुटुंबाबरोबर सहलीला जाणार होती. त्यात पुढचे १५-२० दिवस गेले. डॉक्टरकडे तपासणी होऊन ती गरोदर राहिल्याचे (pregnancy confirm) कळेपर्यंत काही आठवडे गेले होते. त्यामुळे आता गर्भपात ( M.T.P.- Medical Termination of Pregnancy) अवघड होता. घरी सांगितलं तर आपलं काही खरं नाही, म्हणून आता तिला पम्याचाच आधार वाटला. पम्याचा हा पहिलाच अनुभव होता. हे सर्व जिथे आणि ज्या पद्धतीने घडलं त्यात सुरक्षित सेक्सचा ( protected sex) पर्याय त्यांना सुचलाही नाही. परिणामांच्या शक्यतेचा तर त्यांनी विचारही केला नव्हता.
आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?
पम्याच्या पायांखालाची जमीन सरकली. आता याच्याशी कसं डील करायचं? त्याला काही सुचेना. शेवटी त्याने अनयला विश्वासात घेतलं. नंतर जरी त्यांनी ते सर्व ‘निपटलं’, तरी त्यात त्या मैत्रिणीच्या शरीर, मनाची खूप हानी झाली. पम्याला अनेक महिने अपराधी भावनेने घेरलं. दोघांना समुपदेशकाची मदत घ्यावी लागली. ते सर्व आठवून पम्या फार डिस्टर्ब झाला होता. मुग्धाने सांगितलेलं शहाणपण आपल्याला आधी येतं तर…
बोलता बोलता हरवलेल्या पम्याला सर्वांनी हलवून जागं केलं! अनयला लक्षात आलं, की पम्या इतका का विचारांमध्ये हरवला आहे. त्याने मूड लाईट करण्याचा प्रयत्न करत म्हटलं, “पम्याने या वेळी काहीतरी इतकं सीरियसली घेतलं त्याचं आता सेलिब्रेशन करूयात, काय? आपण सर्व मिळून पम्याला पार्टी देऊयात. तो म्हणेल तिथे जाऊयात.”
आणखी वाचा : किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?
पण आता रेवाचं अनयच्या म्हणण्याकडे लक्ष नव्हतं. तिला आज एचआर मॅनेजरनं घेतलेली मीटिंग आठवत होती. नव्याने जॉइन झालेल्या काही मुलामुलींनी कडक सिक्युरिटी आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असलेल्या कंपनीमध्येही कॉन्फरन्स रूम, रिकाम्या मजल्यावरच्या छोट्या केबिन्स् अशी ठिकाणं चक्क चोरून सेक्स करण्यासाठी वापरली होती. त्यासाठी त्यांनी सगळ्या स्टाफलाच दमात घेतलं होतं आणि सक्त ताकीद दिली होती. स्थल, काल, वेळ… कशाचंच भान राहिलेलं नाही की काय या नव्या पिढीला. आणि संयम नाही म्हणजे किती नाही, रेवाला आश्चर्य वाटत होतं.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच
रेवाच्या आई, बाबांचे स्त्रीरोगतज्ज्ञ मित्र त्यांना एकदा सांगत होते, की पाळी सुरू होऊन एक, दोन महिनेही झालेले नसतात नि शाळेतील मुली आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन गर्भपातासाठी (M.T.P.) येतात. पालकांना पूर्ण अंधारात ठेवलेलं असतं. भविष्यातील धोक्यांची पर्वा नसते. संसर्गातून होणारे गुप्तरोग तर नित्याचेच. स्वतःच्या आरोग्याची पर्वा नाही, कौटुंबिक/सामाजिक स्वास्थ्याची, नात्यातल्या उद्ध्वस्ततेची पर्वा नाही. एक्साइटमेंट, थ्रीलच्या नावाखाली बेजबाबदारपणा किती वाढत चालला आहे. कसं आवरायचं हे सारं? त्यात आपल्याकडे सर्व पातळ्यांवर लैंगिक शिक्षणाची (sex education)बोंब! आणि नको ती माहिती नको तेवढी उपलब्ध… पीअर प्रेशरच्या नावाखाली आणि बरोबरीच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपणच वेगळे ठरू नये म्हणून भीडही चेपत चालली आहे… असा सगळा आनंदीआनंद… गर्भपाताकडे वळणारी तरुण पिढी सगळ्यांच्या चिंतेचा विषय होत होती.
यावर काय बोलावं हे कुणालाच काही सुचेना…
सगळे बराच वेळ गप्प बसून राहिले.
(क्रमशः)
vankulk57@yahoo.co.in