माहितेय का तुला, की तू येणार म्हणून आम्ही सारे कुटुंबीय किती प्रफुल्लित झालो होतो. एक सळसळता उत्साह ल्यायलेली व्यक्ती आता कायमची या घराची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची सदस्य होणार म्हणून खूप खूश होतो. तू आलीस आणि सगळ्यांचं मन जिंकून घेतलंस. घरातील तरुण मुलांना जरा शिस्त लागली. तुझे सासरेसुद्धा नेहमीचा हेकेखोरपणा थोडा बाजूला ठेवून मवाळ झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!

काही दिवसात तुझी सुट्टी संपून नोकरी सुरू झाली, अन् तुझ्या सासूला तुझ्यासाठी किती करू अन् किती नको असं झालं. सासूला वाटत होतं, सून म्हणून आपल्याला जे अनुभव आले, ते तुझ्या वाट्याला येऊ नयेत! किती किती तयारी केली होती तिनं या नवीन भूमिकेसाठी. मैत्रिणींशी चर्चा केली. नातेसंबंधावरचे लेख वाचले. तू तिच्या मुलासाठी या घरात आली आहेस, याचं भान तिनं ठेवलं बरं! तुमच्या दोघांच्या स्पेसमध्ये जराही न डोकावता, तुमचं रूटीन जरा सोपं करण्याची धडपड करत होती ती. पण तुझी सासू थोडी सावधही होती बरं का! आपल्याला तरुण वयात कुणाचा सपोर्ट मिळाला नाही… मात्र त्यामुळे आपण खूप लवकर स्वावलंबी झालो याचंही भान तिला होतं. आणि सूनबाई, तुझ्याही नकळत तिनं हळूहळू तुझं बोट सोडलं होतं… तुला स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यासाठी !

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

सुनेला दुसरी लेक मानणारी तुझी दुसरी आई तिनं हेच करणे अपेक्षित होतं ना! जशी लेक, तशीच तू… हे तर खरंच होतं गं. लग्नाआधी व्हायचे तसेच लाड तुझे या घरातही होत गेलेच ना! घरची सून म्हणून वेगळी अपेक्षा तुझ्याकडून ठेवली नाही. पण सूनबाई, तू या घरातील एक महत्त्वाचा घटक आहेस. त्या नात्याने तू काही जबाबदारी वाटून घ्यावी, अशी अपेक्षा तुझ्या सासूने केलीच होती बरं का! शेवटी तुझी सासू आणि तू. एकाच कुटुंबातील मुख्य घटक ना! मुलींनी सुपरवुमन होण्याचा अट्टहास करू नये, असं तिचं मत होतंच. सुपरवुमन तुझी सासूही नव्हती आणि तू पण असायला नकोच आहे.

आणखी वाचा : नवा कम्फर्ट झोन

फक्त थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे गं. घरातील कष्टाच्या सगळ्या कामांना मदतनीस बायका आहेत, पण अगदी किरकोळ कामंदेखील आपला काहीच संबंध नसल्यासारखं नजरेआड करणं बरोबर नाही. फक्त नोकरी आणि नवरा इतकंच तुमचं जग नको असायला. तुझे मित्र, मैत्रीण किंवा माहेरचे कुणी आले तर घरचे कौतुकाने स्वागत करतात किनई? कारण ते त्यांना आपलं मानतात. तसं इतर कुणी नातेवाईक आले तर एक सदस्य म्हणून तुझाही थोडासा सहभाग हवा. तू स्वतः रांधून स्वयंपाक करण्याची अजिबात अपेक्षा नाही, पण मावशीबाईकडून नेमकं काय करून घ्यायचं, तुला आणि नवऱ्याला काय आवडतं इतकं बघायल हरकत नाही. आजकालच्या मुलांना देवपूजेची फारशी गोडी नाही, पण घरातील मोठे चार दिवस गावाला गेले तर किमान देवघर कळकट दिसू नये इतकी स्वच्छता राखावी. शेवटी हे सगळं मन प्रसन्न रहावं यासाठी असतं.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : मुलं होणं – स्टॉप नव्हे पॉज!

तू ऑफिसमध्ये किती छान नीटनेटकं, टापटीप जातेस … सगळे कपडे कायम उत्तम परीट घडीचे ठेवलेले असतात. मग जाताना मागे खोलीभर कपड्यांचे ढीग का सोडायचे? नाही, म्हणजे कुणी तुमच्या खोलीत जात नाही, पण थोडीफार स्वयंशिस्त. थोडा घरच्या लक्ष्मीचा हात फिरला की सगळं कसं निरामय वाटतं. गेल्या आठवड्यात तुझ्या दिराला बरं नव्हतं. तुझे सासरे बाहेरगावी गेले होते. त्याला डॉक्टरकडे न्यायचं होतं, आणि तुम्हा दोघांना एका बर्थ डे पार्टीला जायचं होतं. तू पुढाकार घेऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलीस, पण तिथे उशीर होतोय म्हटल्यावर त्याला तिथेच सोडून तुम्ही निघून गेलात. तुझी सासू जाऊन त्याला घरी घेऊन आली. तिथे तुम्ही दोघं चुकलात. ही वेळ उद्या घरात कुणावरही येऊ शकते. आपल्या छोट्या छोट्या कृतीने भावनिक बंध आणि नाती मजबूत होत असतात. गेलेली वेळ पुन्हा येत नसते. आजकालच्या पिढीला कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखं कसं जगता येतं, तिथे असूनही नसल्यासारखं?

ऐक न सूनबाई, उद्या कदाचित कंपनी बदलून तुम्ही दुसऱ्या गावी जाल. तिथे तुमचं दोघांचंच जग असेल… तेव्हा आजूबाजूला चार माणसांशी स्नेह ठेवून राहाल. पैसा कितीही असला ना, तरी प्रसंगी माणसाला माणूस लागतं गं!
adaparnadeshpande@gmail.com