आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब आणि नातेसंबंध यांना जास्त महत्त्व देणारी आहे. आपली कुटुंब संस्था खूप मजबूत आहे यात वादच नाही. या व्यवस्थेचा आपण साऱ्या जगासमोर आदर्श घालून दिलेला आहे. जवळच्या नात्यातील व्यक्तींचा मान राखणे आणि कित्येकदा पटत नसतानाही त्यांच्या म्हणण्याला मान देणे हे आपण परंपरेनुसार करत आलो आहोत. समाजात आपल्या कुटुंबाचा मानमरातब राखणे किंवा पत राखणे यास फार महत्त्व दिले जाते. अनेक कुटुंबांत रक्ताच्या नात्यात होणाऱ्या कुरबुरी किंवा छोटेमोठे समज-गैरसमज बाजूला सारून नातं टिकवण्यासाठी मान-अपमान बाजूला सारले जातात. अनेकदा समाजात आपली ‘झाकली मूठ’ कायम राखण्यासाठी कुटुंबातील ठिणग्या बाहेरील जगास दिसू नयेत यासाठी धडपड केली जाते. त्यात काही ‘काळी कृत्य’ घरातील चार भिंतीआड लपवली जातात, आणि याच मानसिकतेचा गैरफायदा कुटुंबातील एखादी विकृत व्यक्ती उचलते.
आणखी वाचा : ‘किल द बिल’ची ओपोकू आहे तरी कोण ?
गरिमा ही एका मोठ्या कुटुंबातील सात- आठ वर्षांची गोड मुलगी. एकाच घरात आजी-आजोबा, दोन काका, दोन काकू, बरीच भावंडं, तिथे शिक्षणानिमित्त राहाणारा काकूंचा भाचा वरुण, आणि आणखी काही मंडळी राहात होती. हा वरुण गरिमाला एकटं गाठून तिच्याशी लगट करायचा. त्याचा स्पर्श तिला आवडायचा नाही, पण विरोध कसा करायचा हे न समजल्याने ती गप्प राहायची. त्यानंतर तो तिला एकांतात गाठून तिच्या शरीराशी खेळू लागला आणि गप्प राहाण्याची धमकीही देऊ लागला. काकूंच्या या भाच्यावर काका-काकूंचा प्रचंड जीव होता. गरिमाच्या आई-वडिलांनाही त्याचं कौतुक असल्याने त्याच्या विरुध्द बोलण्याची गरिमाची हिंमतच झाली नाही .
आणखी वाचा : इन्सुलिनची शंभरी : रोमांचक शोधाची कहाणी
त्याच्या अशा वागण्याने ती पार कोमेजून गेली. आपल्या बाबतीत काहीतरी गलिच्छ होतंय, त्याचा स्पर्श आपल्याला नकोसा वाटतोय हे तिला कळायचं, पण आपल्या ‘दादा’ विरुद्ध काही बोलण्याची हिम्मत झाली नाही. सगळ्या घराची मर्जी संपादन केलेल्या या भाच्याची हिम्मत मात्र वाढत गेली, आणि एक दिवस संधी साधून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत ती गप्पच राहिली. तिनं तोंड उघडल्यास तिच्या लहान बहिणीस जिवे मारण्याची धमकी त्याने दिली आणि तो तिथून गायब झाला, पण तिची वेदना तिच्या आईच्या लक्षात आली. प्रेमाने खोदून विचारल्यावर गरिमा बोलती झाली आणि घरात स्फोट झाला.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?
अशा वेळी बऱ्याच कुटुंबात जे होतं, तेच झालं. आजोबा म्हणाले, “जे झालं ते झालं, याबद्दल कुठेही काहीही बोलायचं नाही. आपली सगळीकडे बदनामी होईल. मी कोणत्या तोंडाने व्याही बुवांना सांगणार, की त्यांच्या मुलाने आमच्या नातीला… छे छे. कुणीही काहीही बोलायचं नाही.” काकूनेही भाच्याचीच बाजू घेऊन कांगावा केला. आरोप फेटाळून लावले, पण गरिमाच्या आईबाबांनी ठाम भूमिका घेतली, आणि पोलिसांत तक्रार केली. वरुणला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेकदा लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती कुणीतरी नात्यातीलच असते, जिच्यावर कुटुंबाचा विश्वास असतो, त्या व्यक्तीला चार भिंतीआड कृष्णकृत्य करणं अत्यंत सोपं जातं. पीडित मुलगी नात्याची बूज राखत गप्प बसते. हे गप्प बसणंच अत्यंत घातक आहे. कुण्या व्यक्तीचा स्पर्श जराही नकोसा होत असेल तर त्याच वेळी आई-वडिलांजवळ बोलून दाखवण्याची शिकवण सतत बिंबवणे गरजेचं आहे. जराही नकोसं वाटत असेल तर मुलांनी त्वरित बोलायला हवं. आरडाओरडा करायला हवा. पालकांनी कुटुंबात खूप डोळस आणि सजग असण्याची गरज आहे. नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या पालकांनी मुलांना अत्यंत खात्रीशीर व्यक्तींच्या हातातच सोपवावं. काळजी घेणाऱ्या व्यक्तींशीदेखील या विषयावर बोलून जागरूक राहाण्याची गरज विशद करावी.
आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?
आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीडित व्यक्तीने अपराधी वाटून घेऊन संपूर्ण कोलमडून जाण्याची वृत्ती! कुठल्याही प्रकारे लैंगिक शोषण होत असताना ती विकृती ही सहन करणाऱ्या व्यक्तीची नसून अत्याचार करणाऱ्याची असते हे समजावून सांगणे आवश्यक आहे. “बेटा, जे झालं त्यात तुझी काहीही चूक नाही आणि तुला मान खाली घालावी लागेल असं तू काहीच केलेलं नाही.” असे उभारी देणारे शब्द आवश्यक आहेत. त्रास देणाऱ्या व्यक्तीस मोकळं सोडलं जाणार नाही हा विश्वास द्यायला हवा. त्या मानसिक अवस्थेतून मूल/ अपत्य लवकर बाहेर येण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन वाईट प्रसंग विसरून जाण्यास मुलांना मदत करायला हवी. पुढील आयुष्य भरभरून आनंदाने जगण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहातं ते खरं कुटुंब!
adaparnadeshpande@gmail.com