तरुण मुलं- मुली जे कॉलेजवयीन किंवा नुकतेच पदवीधारक आहेत, त्यापैकी बऱ्याच जणांना एव्हाना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असतात. त्या फुलपंखी दिवसात अनेकदा फक्त वरवर दिसणाऱ्या गुणांवर भाळून आपल्या पार्टनरची निवड केली जाते. फार खोलात जाऊन नीट परिक्षणातून ही निवड सहसा होत नाही… आणि अशा वेळेला काही काळात इतर आकर्षण खुणावू लागल्याने पूर्वीचा निर्णय चुकीचा वाटून आधीचं नातं तोडलं जातं. इतकंच काय अनेकदा तर बरीच वर्ष गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड असलेली जोडीसुद्धा इतर कुणी आवडल्याने वेगळे झालेले बघायला मिळतात. असा ब्रेकअपचा निर्णय दोहो बाजूंनी घेतलेला असेल तर तो जास्त क्लेशकारक ठरत नाही, पण फक्त एका बाजूने असल्यास जोडिदारासाठी तो अतिशय दुःखदायक असतो. बरीच वर्षे नात्यात असलेल्या बॉयफ्रेंडनं आपल्या गर्लफ्रेंडला काहीही न सांगता दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले म्हणजे तिला ‘डिच’ केलं तर तो अनुभव तिच्यासाठी वेदनादायक असतो.
शमिता आणि करण ही जोडी ऑफिसमध्ये प्रसिद्ध प्रेमीयगुल जोडी होती. एकमेकांच्या घरी कल्पना दिलेली होती आणि दोघं लवकरच लग्नाचा निर्णय घेणार होते. त्याच काळात करणनं नोकरी बदलली. आता तो आणि शमिता पूर्वीसारखे सतत सोबत राहू शकत नव्हते. भेटीमध्ये अंतर पडू लागलं. शनिवार- रविवार एकत्र घालवणं ही मोठी पर्वणी वाटू लागली. कधी कधी करणला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागे. तिथं त्याची भेट निलाक्षीशी झाली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला. शमिताला पूर्णपणे अंधारात ठेवून त्याने तिच्याशी प्रेमसंबंध जुळवून आणले. काही आठवड्यातच करण आपल्याला ‘डीच’ करतोय की काय, ही शंका तिला आली. तिनं त्याला तसं स्पष्ट विचारलंही, पण त्यानं अजिबात कबूल केलं नाही.
आणखी वाचा : Women U19 WC: चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाने ‘काला चष्मा’ गाण्यावर केला डान्स; पाहा VIDEO
एका जवळच्या मैत्रिणीनं शामिताला खात्रीपूर्वक सांगितल्यावर शमिता सरळ नीलाक्षीला भेटली. तेव्हा करणनं तिला लग्नाचं वचन दिल्याचं उघड झालं. शामिताची शंका खरी ठरली होती. अशा वेळी पुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे खूप आरडाओरडा करून त्या मुलाला माफी मागायला लाऊन, पुन्हा असं न करण्याचं वचन घेऊन काहीच न घडल्यासारखं नातं पुढे न्यायचं. दुसरा मार्ग म्हणजे हे नातंच कुचकामी होतं आणि आता तमाशा करून काहीच उपयोग नाही हे सत्य स्वीकारून आपलं आयुष्य पुढे न्यायचं. शमितानं दुसरा पर्याय निवडला. इतकी वर्षं प्रेमसंबंध असताना त्याला दुसरी मुलगी आवडली आणि तिला लग्नाचं वचन दिलं याचा अर्थ आपल्या नात्याचा पायाच कच्चा होता हे मनाशी स्वीकारून ती त्याच्यापासून वेगळी झाली. आपली बदनामी होईल या भीतीपोटी करणनं माफी मागितली, पुन्हा असं होणार नाही असं सांगितलं तरीही तडा गेलेली काच पूर्वी सारखी एकसंध रहात नसते हे समजून शमितानं आपला वेगळा मार्ग पत्करला.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : आईवडिलांचं प्रेम हवंच!
“तू मला विश्वासात घेऊन सरळ सरळ नीलाक्षी बद्दल बोलला असतास तरीही मी तुला माफ केलं असतं. पण तू मला फसवलंस. तुला एकाच वेळी दोन नात्यात राहायचं होतं. नात्यात सर्वात महत्वाचा पाया म्हणजे विश्वास. तू त्यालाच खिंडार पाडलंस. अशा माणसाशी मला अजिबात संबंध ठेवायचे नाहीत. तुझ्या सारखी माणसं दुसऱ्या नात्यातही प्रामाणिक राहातील याची खात्री नसते. मला काही दिवस त्रास होईल, पण अशा विश्वासघातकी माणसाशी आयुष्यभराचं नातं मला नकोय हे नक्की.” कालांतराने शमिता त्या नात्यातून मानसिकदृष्ट्या बाहेर आली. अशी पूर्वायुष्यात धोक्याला सामोरे गेलेली व्यक्ती पुढील आयुष्यात आपल्या जोडीदाराकडे विनाकारण संशयाने बघण्याची शक्यता असते. ती अस्थिरता सतत मनात घर करून राहते. नवीन बॉयफ्रेंड किंवा विवाहानंतर पती कितीही प्रामाणिक असेल तरीही तो शंकेचा किडा वळवळ करत राहू शकतो. आपण कुणाकडून फसवले गेलो ही भावना खूप आघात करते हे खरं, पण त्याची काळी सावली आपल्या सुंदर भावी नात्यावर पडू नये याची काळजीही घ्यावी लागते. चांगल्या सुदृढ नात्यासाठी ते नक्कीच आवश्यक आहे.
adaparnadeshpande@gmail.com