कुमार वयापासून ते साधारण वीस बावीस वयापर्यंतचा काळ असा असतो, की त्या वयात आपल्यावर आपल्या मित्रपरिवाराचा फार मोठा पगडा असतो. त्यांची मतं, त्यांची निवड, त्यांचा वेळ, त्यांच्या मागण्या याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. एकदा का ग्रुप मधील एखाद्या ‘अल्फा’ लीडरने एक फर्मान काढलं, की ते जणू ब्रम्हवाक्य! त्याच्या पुढे बाकी सारं गौण. घरच्यांची मतं तर फारच टोलावली जातात. ग्रुप म्हणेल ती पूर्वदिशा. इंग्रजीत म्हणतात, a man is defined by his company. अगदी बरोबर आहे. त्यामुळे एक चांगलं किंवा वाईट व्यक्तिमत्व तयार होण्यात कायम सोबत असणाऱ्या मित्रमंडळीचा मोठा वाटा असतो. अशावेळी ती संगत वाईट असेल तर त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतात. मुलगा काय किंवा मुलगी, आयुष्यातील फार मोठा टप्पा हा संगतीवर अवलंबून असतो हे मान्य करावं लागेल.
आणखी वाचा : टोमॅटोसारखी त्वचा हवी? मग ‘हे’ कराच!
सुयश हा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा अत्यंत अभ्यासू आणि शांत मुलगा. एक दिवस कॉलेज मधून घरी परतताना एका टवाळखोर ग्रुपमध्ये त्याला त्याची लहान बहीण दिसली. चारपाच मुलं- मुली मिळून दुचाकी गाड्या पळवत एका चाकावर फिरवण्याची कसरत करत होते. एक दोन जण सिगारेटची वलयं सोडत जोरजोरात आरडाओरड करत होते. ते सगळं बघून सुयशला धक्का बसला. आपली सोळा- सतरा वर्षांची बहीण चित्र विचित्र कपडे घालून अपशब्द वापरत तिथे ‘हूटिंग’ करतेय हे त्याच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं. त्यावेळी सगळ्यांसमोर तिला न ओरडता त्यानं तिला फोन लावला, आणि काहीतरी कारण सांगून घरी बोलावलं. ती घरी आल्यावर आई वडिलांना त्याने यातलं काही सांगितलं नाही.
आणखी वाचा : व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!
शांतपणे तिच्या खोलीत गेला. “दादा, प्लीज आई बाबांना काही सांगू नकोस.” ती म्हणाली.
“मी अजून तरी काहीच बोललो नाही, पण का गं? याआधी तर तू काही लपवलं नाहीस.”
“मला त्यांची कंपनी आवडते, पण आई बाबांना नाही आवडणार.”
“ ओह! म्हणजे त्यांना आवडणार नाही असं काहीतरी वाईट तू करतेय हे तुझ्या लक्षात आलंय तर. व्हेरी गुड. तू आहेसच तशी खूप शहाणी. आपलं चुकतंय हे जर तुला समजतंय तर चूक कशी सुधारायची हे पण सांग.” तो शांतपणे म्हणाला.
“ पण दादा, मला त्या सगळ्या ग्रुपबरोबर मस्त वाटतं. मी एन्जॉय करते.”
“ मला सांग सोनू, त्या अमनकडे बाईक होती. पण तो चालवत नव्हता. का? त्याच्याकडे लायसन्स आहे? ”
“ नाही. मागच्या वेळी त्याला पोलिसांनी पकडलं होतं. लायसन्स नाही त्याच्याजवळ म्हणून. ही इज जस्ट सेव्हीनटिन! ”
“ लायसन्स मिळण्याचं, मतदान करण्याचं, अगदी लग्न करण्याचं सुद्धा एक वय ठरवून दिलेलं आहे … किती? अठरा. कारण तोपर्यंत आपल्या मेंदूची काही बाबतीतली निर्णय क्षमता कमजोर असू शकते. मग या आताच्या वयात तुम्ही काय करायला हवं ? ” त्याचा प्रश्न.
“ अभ्यास, खेळ, निरोगी आयुष्य बनवणे, आणि करिअर करणे…माहितेय रे ! पण…”
“ पण, दिल है के मानता नही… हो ना? मी काही तुझ्यापेक्षा फार मोठा आहे का ? मी पण तुमच्या गँग सारखी मस्ती करू शकतो की. पण नाही … मी मात्र वाईट गोष्टींपासून चार हात लांब राहतो बघ. मला एक उत्तम प्रोग्रामर बनायचंय… कोडींग मास्टर ! आता जर मी नुसतीच मौज मस्ती केली तर पुढे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल. तुझा आवडता विराट कोहली जर असा टुकारगिरी करत असता तर इतका महान खेळाडू झाला असता का? तुला एक उत्तम डिझायनर व्हायचं आहे ना? चल मग, आजपासून आपण दोघं मिळून सगळ्या टॉप क्लास इन्स्टिट्यूट शोधून काढू, आणि तयारीला लागू. तुला नक्की मिळेल ॲडमिशन. चल दे हाय फाय !” शांतपणे समजून सांगणाऱ्या, सगळ्यातले चांगले वाईट परिणाम दाखवून देणाऱ्या दादाचं म्हणणं सोनूला पटलं. सोनूने त्याला जोरात टाळी दिली.
आणखी वाचा : आहारवेद: उन्हाचा ताप कमी करणारा कांदा
मोठ्या शहरात शिक्षणासाठी बहिणीसोबत राहणाऱ्या मनीषाला देखील तिच्या लहान बहिणीचा असाच अनुभव आला. एक दिवस तिला मध्यरात्री जाग आली, तर तिची लहान बहीण काव्या घरी नव्हती. तिच्या लॅपटॉपवर सर्च हिस्ट्रीमध्ये रेव्ह पार्टीच्या लिंक्स बघून मनीषा हादरली. तिनं आधी काव्या आणि तिच्या मैत्रिणीला फोन लावले. अर्थातच प्रतिसाद मिळाला नाही. तिनं बरीच खटपट केली, आणि पोलिसांना सगळं सांगितलं. नंतर दोन तासांनी तिला पोलिसांचा फोन आला. रेव्ह पार्टीत सामील काही जणांना ताब्यात घेऊन बाकी जणांना त्यांनी सोडलं होतं, त्यात काव्या होती. मनिषाने दुसऱ्याच दिवशी काव्याला समुपदेशकाकडे नेलं. त्यांनी काव्याला खूप छान समजावून सांगितलं. तिलाही तिची चूक उमगली होती. आपण किती मोठ्या संकटात फसणार होतो याची तिला तीव्र जाणीव झाली. मोठ्या बहिणीने धाकटीला निसरड्या वाटेवरून सावरायला मदत केली होती. नशीबवान असतात अशी माणसं ज्यांना तोल जाताना आधार देऊन वेळीच सावरणारी मजबूत भावंडं कायम सोबतीला असतात.
adaparnadeshpande@gmail.com