बऱ्याचदा नवरा जाच करतो, संतापी आहे- मारतो, किंवा संशयी आहे म्हणून पत्नीस अत्यंत त्रास देतो, अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर दिसतात. अनेकदा ती सगळं मुकाट सहन करते, केवळ मुलांच्या भविष्याचा विचार करून संसार टिकवून ठेवते… पण अनेकदा या उलटही चित्र दिसतं, की बायको महाकजाग, संशयी आणि तापट आहे. साहजिकच तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात कायमच उन्हाळा असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : कोण आहे मीरा मुराटी?

अशावेळी घरातला तो पुरुष अनेक बाजूंनी पिचून जातो. त्याच्या कामाचा ताण, आई- वडील घरात असतील तर त्यांचं करणं, मुलांच्या गरजा पूर्ण करणं आणि त्यात सतत कजाग बायकोची रोजची किरकिर असेल तर काय करेल तो बिचारा? दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेल्या व्यक्तीस मग ती स्त्री असो की पुरुष , घरात शांतता आणि प्रेम मिळत नसेल तर त्याचं जगणं खूप कठीण होतं हे नक्की. बायको आदळआपट करणारी आणि संतापी असेल तर ती नवऱ्याचं जगणं नकोसं करते अशावेळी बहुतांश पुरुष नकळत व्यसनाकडे किंवा वाईट सवयींकडे वळू शकतात. पत्नीकडून प्रेम मिळत नसेल तर ते दुसऱ्या स्त्रीकडून ते मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. फारच सोशिक पुरुष असेल तर त्याच्या दैनंदिन त्रासाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होतो, तो अबोल आणि अंतर्मुख होत जातो. हे दोन्ही पर्याय अर्थातच वाईट. दोन्ही मध्ये आनंद आणि सुख सहजपणे मिळणे दुरापास्तच.

आणखी वाचा : सलाम तिच्या जिद्दीला! बाळाला जन्म दिल्यानंतर तीन तासांतच दिली १० वीची परीक्षा!

किरण हा तिशीचा आयटी इंजिनीअर. त्याची पत्नी राधिका श्रीमंत घरची एकुलती एक लाडावलेली मुलगी. तिच्या पसंतीने लग्न करूनही लग्नानंतर ती अजिबात खुश नव्हती. घरात तिला हव्या तशा सोयी नाहीत, या कारणाने सतत चिडचिड करी. नोकरी न करता पूर्णवेळ घरात राहूनही घर आवरणं, स्वच्छ्ता राखणं, किरण घरी आल्यावर बाईनं केलेला स्वयंपाक त्याला वाढणं अशी कामंही तिला कष्टदायक वाटत. तोच रात्री घरी आला की, ओव्हनमध्ये जेवण गरम करून आपलाआपण जेवून घेई. तिला सारखंच बाहेर हॉटेलिंग, मॉलमध्ये खरेदी, मैत्रिणींसोबत पिकनिक आणि मजा हवी असे. सुरुवातीला किरणनं तिचे सगळे लाड पुरवले. पण ती त्या मौजमस्तीच्या ‘मूड’ मधून बाहेर यायला तयारच नव्हती. “मी दुसऱ्या कुणासाठी माझी आवड कोंप्रो करणार नाही! ” या मताच्या आपल्या विक्षिप्त बायकोसोबत जमवून घेणं किरणला अतिशय कठीण जाऊ लागलं. जेव्हा घरच्यांनी मूल होऊ देण्याविषयी सुचवलं तेव्हा तिनं खूप गोंधळ घातला. माझा जन्म पोरं संभाळण्यासाठी झालेला नाही, आणि असले अत्याचार मी माझ्या शरीरावर होऊ देणार नाही, असं जेव्हा ती म्हणाली तेव्हा मात्र किरणचा संयम संपला. मूल नको तर एखादी नोकरी तरी कर असं सुचवलं तर तिनं तेही धुडकावून लागलं. “मी तुला घटस्फोटही देणार नाही, आणि तुझ्या मताप्रमाणेही वागणार नाही!” असं तिनं ठणकावून सांगितलं. त्यादिवशी पासून त्यानं तिचं बोलणं रेकॉर्ड करणं सुरू केलं आणि तिला घटस्फोट देण्यासाठी एक उत्तम वकील नेमला.

आणखी वाचा : ‘पावनखिंड’, प्राजक्ता माळी आणि बायकांच्या भोळ्याबाभड्या आशेचा ‘तो’ सीन!

अभय हा एक कलाकार मनाचा, हळूवार स्वभावाचा कॉलेज प्राध्यापक. त्याची पत्नी अनिता अतिशय भांडखोर आणि रागीट स्त्री. ती देखील एका शाळेत शिक्षिका होती. घरात जराही मनाविरुद्ध काही झालं, की त्याचा राग ती आपल्या मुलांवर काढायची. वाटेल तसं बोलणं, त्याच्या आईला उद्देशून टोचून बोलणं, त्याच्या बहिणीकडून सगळी कामं करवून घेणं असं तिचं वागणं असल्याने त्याला खूप त्रास होत असे. तिचा पगार ती बँकेत तसाच ठेवून घरातला सगळा खर्च नवऱ्याच्या पगारातून करत असे. अर्थातच त्याच्या कमाईतून सगळं होणं कठीण जाऊ लागलं. अनेकदा प्रेमानं समजावून सांगूनही तिच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. काही विशिष्ट चांगले पदार्थ तयार केल्यास ती अतिशय मोजकंच तयार करत असे. गुपचूप स्वतः खाऊन आणि मुलांना देत असे, पण घरातील इतर व्यक्तींना देत नसे. हे तिचं नीच पातळीवरचं वागणं कुणालाच आवडत नसे. एक दिवस त्याच्या आईची प्रकृती ठीक नसताना त्याच्या बहिणीने दवाखान्यात जाताना थोडे पैसे मागितले. त्यावर तिनं प्रचंड गोंधळ घातला. त्या दिवशी मात्र त्यानं तिच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. एका विशिष्ठ मर्यादेपर्यंतच आपल्या जोडीदाराच्या त्रासदायक वागण्याशी जुळवून घेता येतं. त्यानंतर आयुष्याची फरफट होण्यापासून वाचण्यासाठी नाईलाजाने असे निर्णय घ्यावे लागतात. अशी वेळ कुणावर येऊच नये हे जरी खरं असलं तरी आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालत नाही हे सत्य आहे .

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship wife is another headache pains vp