अपर्णा देशपांडे
भावी जोडीदार म्हणून तुम्हाला कसा तरुण हवा आहे? असा प्रश्न विचारल्यास मुलींचे साधारण उत्तर असते, प्रेमळ. समजूतदार, आर्थिक दृष्ट्या भक्कम, काळजी घेणारा, स्त्रियांचा आदर करणारा…वगैरे. एक आर्थिक बाजू सोडली तर बाकी गुण त्या व्यक्तीमध्ये असण्यासाठी त्याला त्याच्या घरातील स्त्रियांचा आदर, सन्मान आणि त्यांच्या विषयी भरपूर प्रेम असणं गरजेचं आहे.
हा तरुण जर त्याच्या बहिणी, आई, मावशी, आत्या अशा घरातील स्त्रियांबाबत खूप काळजी घेणारा असेल तर अगदी सहजपणे त्याच्या भावी पत्नी विषयी देखील तशाच भावना राखून असतो, कारण तो त्याचा मूलभूत स्वभावच बनलेला असतो . अशा वेळी त्याचं त्याच्या आईकडे जास्त लक्ष असणं, तिच्या मताचा प्रभाव असणं हेही स्वाभाविक आहे. इतकं सगळं जर छान छान आहे तर अडचण काय? .तर मंडळी अडचण तेव्हा येऊ शकते जेव्हा होणारा नवरा त्याच्या वयाच्या सव्वीस ते अठ्ठावीस मध्ये असतानाही भावी पत्नीला काहीच न विचारता, तिचं मत न घेता सगळं सगळं त्याच्या आईच्या सल्ल्याने करत असेल तर? मुलींना सुशील, प्रेमळ नवरा तर हवा आहे, पण तो ‘ममाज बॉय’ असेल तर मात्र ते नको असतं. आईवर प्रेम करणं, तिच्याशी सतत संपर्कात असणं, तिच्या अवती भवती करणं, हे वाईट नाही, पण त्याचं प्रमाण किती असावं ज्यामुळे त्याची गर्लफ्रेंड वा बायको नाराज होणार नाही? कसं ओळखणार की होणारा जोडीदार ‘ममाज बॉय’ आहे की नाही ? काही थोडक्यात निरीक्षणे –
१ : अशी मुलं त्यांच्या रोजच्या घडामोडी बारकाव्यासहित आईला सांगतात. ही बाब कदाचित त्यांच्या बायकोला हाताळायला अवघड वाटू शकते.
२: गर्लफ्रेंड वा बायकोसाठी काहीही भेट वस्तू खरेदी करताना त्यांना आईसाठीसुद्धा काहीतरी घ्यायचं असतं.
३: गर्लफ्रेंड वा बायकोने अचानक बाहेर जाऊन काहीतरी खाण्याचा बेत आखला तर आई नाराज होईल म्हणून तो सरळ नाही म्हणू शकतो. ( आईला खरंच विचारलं तर कदाचित ती आनंदाने हो म्हणू शकते.)
४: दोघांमधील गुपित, जे खास दोघांचं असतं, ते देखील हे तरुण आईजवळ सांगून मोकळे होतात.
५: मित्र मंडळींमध्ये जास्त वेळ रमल्यानंतर अशा तरुणांना खूप अपराधी वाटतं.( आपण आईला सोडून मजा केली याचा अपराध भाव)
६ : नाटक सिनेमा बघण्याचा कार्यक्रम ठरल्यास आईला घेऊन जाण्याबाबत आग्रही असू शकतात.
७ : स्वतःला नाही पटलं तरीही आईच्या म्हणण्या बाहेर ते वागत नाहीत.
अशा पद्धतीने वागल्यास गर्लफ्रेंड आणि आई यांचं स्थान वेगवेगळं अबाधित ठेवणं त्यांना फार जड जातं. लग्नानंतर फार मोठा काळ एकाच घरात राहायचं असेल तर मुलांना पत्नी आणि आई या दोन्ही नात्याला न्याय देणं जमलं पाहिजे. आपला बॉयफ्रेंड ‘मम्माज बॉय’ आहे हे समजल्यानंतर मुलीला आधीतर संयम बाळगण्याची गरज आहे.रश्मिकाने कुणालच्या बाबतीत हेच केलं. कुणालचं आईशिवाय पान हलत नाही हे समजल्यावर तिनंही त्याच्या आईला भरपूर सन्मान द्यायला सुरुवात केली. दोघांचाही विश्वास कमावला. आपल्या ग्रुपसोबत त्याने गोव्यास जायला नकार दिला, तेव्हा तिनं एक दिवस हळूच कुणालजवळ विषय काढला. “कुणाल, आईला तू एकटं सोडून जायला घाबरु नकोस. बाबा आहेत ना…आणि आईला देखील किती समाधान वाटेल तुला मजा करताना बघून. आईला तिचं तिचं विश्व निर्माण करून देऊ आपण. त्यांच्या ग्रुप मध्ये त्यांना मिसळून एन्जॉय करू देत की. सारखं तुझ्या अवती भवती करून घरात बसवून ठेवणार आहेस का त्यांना? आता त्यांना आणि बाबांना थोडं मोकळं सोडून तू तुझं विश्व निर्माण करण्याची वेळ आली आहे. उद्या तुझी नोकरी बदलली , गाव बदललं तर काय सतत त्यांना आपल्या मागे धावायला लावायचं का? रोज ऑफिसमधून एक फोन ठीक आहे.
तू सारखा फोन करून त्यांना बांधून नको ठेवूस. तुझं अवकाश तू जप , त्यांचं त्यांना जपू दे. त्याने प्रेम कमी न होता प्रेमाची मजा आणखी वाढेल बघ. तुझी काळजी घ्यायला आता त्याची पत्नी आहे हे समजलं की किती ‘रीलॅक्स’ होतील दोघं.” कुणाल मित्रांबरोबर गोव्याला गेला. खरंच धमाल केली त्याने. रोज रात्री आईशी फोनवर बोलत होता. आईपण खूष होती. रश्मीकाचं म्हणणं त्याला पटलं. आपली होणारी पत्नी खूप शहाणी आहे, हे लक्षात येऊन खूप सुखावला तो. आताही तो आईला तितकाच सन्मान आणि प्रेम देणार होता, पण रश्मीकाला न डावलता. आपल्या भावी नवऱ्याचं मन रश्मीकानं राखलं, आणि त्यांच्या नात्यातील स्वतःचं स्थानही मजबूत केलं .
adaparnadeshpande@gmail.com