अपर्णा देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल आपल्या लाडक्या मैत्रिणीचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात आल्याने पौर्णिमा तिला लंचब्रेकमध्ये मुद्दाम बाहेर घेऊन गेली.
“ काय झालं विदी? तुझं आणि निखिलचं काही भांडण झालं का? काय बिघडलंय?” या प्रश्नानंतर विदुला एकदम रडायलाच लागली. “आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी निखिलबरोबर राहातेय. इतका विश्वास त्याच्यावर टाकला, पण आता हा एकदम विचित्र वागतोय. मला प्रचंड त्रास होतोय त्याचा. आता मला नकोय हे नातं. रोज पळून घरी जावंसं वाटतं गं!”
“ मग जा ना! आई-वडील आणि तुझं घर तुझ्या हक्काचं आहे. निखिल आणि तू एकमेकांना अजिबात बांधिल नाही आहात. तुम्ही लग्न थोडंच केलंय? फक्त ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये आहात. कुठलंही बंधन नाही तुझ्यावर. मग अडचण काय आहे?”
“कोणत्या तोंडानं घरी जाऊ गं?”
“म्हणजे काय? ज्या हिमतीने तू त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घरी सांगितला त्याच हिमतीने तू परत येतेय हेही सांग. ते उलट फार खुश होतील, कारण ते तुझ्या या निर्णयावर नाराजच होते. आई वडिलांसमोर आपली बाजू व्यक्त करण्यात कसला इगो? ‘लिव्ह इन’ हा तुझा एक प्रयोग होता. तो अनुभव तुला घ्यायचा होता तो तू घेतला. आता ते नातं तुला पुढे न्यायचं नाही, हे त्यांना मोकळेपणानं सांग. नेमकं कुठे खटकलं, काय नाही पटलं हेही प्रामाणिकपणे सांग. ते तुझ्या भल्याचाच विचार करतील. कदाचित, त्यांना फार सुटल्यासारखं वाटेल. केवळ त्यांना सामोरं जाण्याची भीती बाळगून तू निखिल सोबत अनिच्छेने राहू नयेस असं मला वाटतं.” पौर्णिमा जवळ बोलून आणि तिचं सडेतोड मत ऐकून विदुलाला फार फार हायसं वाटलं. तिची पुढील वाट मोकळी झाली होती.

आणखी वाचा-शासकीय योजना : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी ‘लेक लाडकी’ योजना

अशीच काहीशी गत तारिकाचीही झाली होती. ती गेल्या दीड वर्षापासून तरुणसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहात होती. सुरुवातीला सगळं छान मजेत सुरू होतं, पण नंतर तरुण इतर मुलींमध्ये गुंतत गेला. त्यांच्या सोबत बराच काळ घालवू लागला. त्याला आता तारिकाची ‘कंपनी’ आवडेनाशी झाली होती. तिनं हा विषय तरुण जवळ काढला तेव्हा तो स्पष्ट म्हणाला की, ‘लिव्ह इन’मध्ये राहताना आपण आधीच नियम ठरवून घेतले होते. आपण दोघं एकमेकांना कुठलीही कमिटमेंट देणार नाही आहोत. तू आणि मी इतर नातेसंबंध जुळवायला मोकळे आहोत. मग आता तुला मला जाब विचारता नाही येणार. पण तारीकासाठी ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. ती भावनिक दृष्ट्या तरुणमध्ये गुंतली असल्याने त्या नात्यातून बाहेर पडणं हे तिच्यासाठी फार यातानादायी होतं. तिनं दुसरा फ्लॅट भाड्याने घेतला, नोकरीही बदलली, पण ती खचून गेली होती. शेवटी तिला समुपदेशकांची मदत घ्यावी लागली.

आणखी वाचा-नातेसंबंध: घटस्फोटानंतर माहेरी वाजतगाजत स्वागत व्हावं?

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहाताना त्यातील संभाव्य अडचणी आणि धोके याचा नीट विचार होणं गरजेचं आहे. हे नातं कायम स्वरुपी नात्यात बदलेल, दीर्घकाळ असंच बंधनातीत राहील किंवा यातून कधीही बाहेर पडण्याची वेळ येईल, असा सर्वकष विचार नक्कीच आवश्यक आहे. आपण असे मनुष्य प्राणी आहोत ज्यांना मन, मेंदू आणि भावनेवर ताबा मिळवणं इतकं सोपं नाही. त्यामुळे अशा नात्यातून बाहेर पडताना मन खंबीर असावं लागेल.

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationships want to get out of the live in mrj