ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त अनेकदा गप्पांचे विषय रंगतात. घर, ऑफिस लग्नानंतर मुलींचं बदललेलं आयुष्य…अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा होतात. असंच बोलता बोलता आमच्यात विषय निघाला तो विधवा महिलांचा. आपल्या समाजात आजही महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. त्यात नवरा गेल्यानंतर तर त्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन काही अंशी बदलतो. अनेकदा तिला टोमणे ऐकावे लागतात. काही कारणं नसताना चुकांचं खापरही तिच्या माथी मारलं जातं. विधवा बायकांचा विषय सुरू असतानाच एका मैत्रिणीने तिच्या जवळच्या नात्यातील एका महिलेबरोबर घडलेला प्रसंग सांगितला.
काही महिन्यांपूर्वीच काकूंच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. माझी मैत्रीण व तिच्या कुटुंबातील काही जण काकूंना त्यांच्या गावी भेटायला गेले होते. त्यांचं घराणं तसं सुशिक्षित. काकूंचे पती पेशाने डॉक्टर होते. त्यांच्या आकस्मित निधनाने कुटुंबियांना जबर धक्का बसला होता. काकूंचं तर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. पण, तरीही यातून त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. मैत्रिणीचं कुटुंब भेटायला गेल्यानंतर साहजिकच त्यांना रडू कोसळलं. नवऱ्याच्या निधनानंतर आभाळ कोसळलेल्या काकूंना मात्र कुटुंबियांकडून त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्या बोलण्यातून माझ्या मैत्रिणीला ते जाणवलं. “घराबाहेर पडायचं नाही. एक वर्ष कुठेही जायचं नाही. घरातच बसून राहायचं,” असं त्यांना कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं.
आणखी वाचा>> विधवा आहे आणि पैठणी नेसून मिरवतेय बघ कशी?
घराची पायरी ओलांडली तरी काकूंना बोलणी खावी लागत होती. या सगळ्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडत चालली होती. त्यात लहान मुलगी. एक वर्ष घरात बसून राहिल्यास मुलीचं शिक्षण बाकीच्या गोष्टी या सगळ्याकडे कसं लक्ष देणार? हा प्रश्न त्यांना सतावत होता. सगळं सांगितल्यानंतर काकूंनी एक प्रश्न विचारला. “एक वर्ष घरात राहिल्याने माझा नवरा परत येईल का?” आणि त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं.
१२ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी नववीत होते. १२ दिवसांच्या दुखवट्यानंतर आमच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे होते. गृहिणी असलेल्या माझ्या आईला चार मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत होती. कसं होणार? ही काळजी कायम असायची. प्रत्येक संकटातून मार्ग काढून त्यावेळी परिस्थितीला आम्ही सामोरे जात होतो. पण आम्हालाही नको ते सल्ले देणारी अनेक माणसं भेटली. “वहिनी, एक वर्ष तुम्ही मुलांना घेऊन गावी जा”, “१२वी झाल्यानंतर मुलींची लग्न करून टाक”, “रुम विकून गावाला रहायला जा” असे फुकटातले सल्ले जवळचेच लोक देऊन जायचे. पण माझ्या आईचा ठाम निर्णय व आमच्या मागे काही खंबीरपणे उभ्या असणाऱ्या व्यक्तींमुळे आम्ही या सगळ्यातून मार्ग काढू शकलो.
आणखी वाचा>> पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’
खरं तर आपल्याकडे फुकटचे सल्ले देणाऱ्यांची फौजच आहे. यातील एक सल्ला जरी त्यांनी स्वत:ला दिला, तरी पुन्हा दुसऱ्यांना बिनकामी सल्ला देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. समोरच्यावर काय प्रसंग उद्भवला आहे, काय संकट आलं आहे, त्याची मनस्थिती काय, याचा जराही विचार न करता लोक तोंडाला येईल ते बोलत सुटतात. नवरा गेल्यानंतर स्त्री कोणत्या परिस्थितीत असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. पण आपल्याकडे मात्र नवरा गेला की काही लोक “यांचं आता कसं होणार” असं काळजीपूर्वक नाही तर कुत्सितपणे विचारतात. यात त्यांना काय मज्जा येते, कोणास ठावूक? एकदा त्या स्त्रीच्या जागी स्वत:ला ठेवून बघा…मग कळेल, तिचं पुढचं संपूर्ण आयुष्य अधांतरी सुरू असतं!