२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र लढ्यामध्ये महात्मा गांधींचे भारत छोडो आंदोलन महत्त्वाचे आहे. आज स्वतंत्र भारतामध्ये अनेक स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, पण जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, तेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होऊन अनेक महिलांनी देशाकरिता योगदान दिले. त्यातील म. गांधींच्या भारत छोडो आंदोलनामध्ये एक वीरांगना धारातीर्थी पडली. ब्रिटिशांनी गोळीबार सुरु केला, लाठीहल्ला केला, तरीही या वीरांगनेने भारताचा झेंडा सोडला नाही. या वीरांगना म्हणजे मातंगिनी हाजरा. भारताच्या इतिहासामध्ये काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या या मातंगिनी हाजरा यांच्याविषयी जाणून घेऊया…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती पूर्ण भारत देशामध्ये उत्साहाने साजरी करण्यात येईल. महात्मा गांधीजींच्या अनेक चळवळींमध्ये महिलांनी सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यातील एक महत्त्वाच्या वीरांगना म्हणजे मातंगिनी हाजरा. बंगाल येथे ब्रिटिश विरोधी आंदोलनामध्ये त्या नेतृत्व करत असताना २९ सप्टेंबर, १९४२ रोजी त्यांना गोळी लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ७३ व्या वर्षीही भारत छोडो आंदोलनामध्ये त्या सक्रिय सहभागी झाल्या होत्या. ब्रिटिशांनी विरोध केला, गोळीबार, लाठीहल्ला केला तरी त्यांनी माघार घेतली नाही. भारताचा झेंडा कायम फडकत ठेवून त्या शहिद झाल्या.
हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…
कोण होत्या मातंगिनी हाजरा ?
मातंगिनी हाज्रा यांचा जन्म १८६९ मध्ये तमलूकजवळील होगला गावी झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. हुंडा देणेही शक्य नसल्यामुळे मातंगिनी यांचा विवाह १२ व्या वर्षी मेदिनीपूरमधील अलिनान गावातील ६० वर्षीय त्रिलोचन हाजरा यांच्याशी करण्यात आला. परंतु, त्या योग्य वयाच्या होण्याआधीच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या काळातही गावातील लोकांना जमेल तशी मदत करून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. साधारण त्याच काळात भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या होत्या. महात्मा गांधींनी संघटित होण्याची, राष्ट्रचळवळीत सहभागी होण्याची हाक दिली होती. २० वर्षीय मातंगिनी यांनी राष्ट्रकार्यात सहभाग घेतला आणि वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत त्यांनी कायम महात्मा गांधीजींना साथ दिली. प्रसिद्ध लेखक मणि भौमिक यांनी कोड नेम गॉड या पुस्तकात म. गांधीजींच्या कार्याविषयी लिहिले आहे. त्यात मातंगिनी त्यांचा उल्लेख “ मातंगिनी’ज लव्ह फॉर गांधी वॉज सो ग्रेट दॅट शी बीकम नोअन इन अवर ऍज ‘गांधीबुरी (दि ओल्ड गांधीअन वुमन) असा आहे. महात्मा गांधींचा संदेश, विचार यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. याच काळात त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्य झाल्या आणि गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून खादी कातण्यास सुरुवात केली.
ऑगस्ट, १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाला गती प्राप्त झाली होती. भारतभर व्यापक स्तरावर ही चळवळ सुरु होती. मातंगिनी यांनीही ६ हजार लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. मातंगिनी यांनी गोळीबार आणि लाठीहल्ला न करण्याची विनंती केली. या निषेध मोर्चावर ब्रिटिशांनी हल्ला केला केला, मातंगिनी शरण गेल्या नाहीत. ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना या हल्ल्यामध्ये अनेक जखमा झाल्या, त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या वंदे मातरम म्हणत होत्या.
लहान वयात मोठी जबाबदारी स्वीकारून, राष्ट्रकार्यासाठी सतत कार्यरत राहून, महात्मा गांधीजींचे विचार त्यांनी तळागाळात पोहोचवले.