डॉ. शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरम मसाल्यामध्ये मिठाच्यानंतर मिरचीचे स्थान येते. प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात आवश्यक असणारा पदार्थ म्हणजेच मिरची होय. मीठ-मिरचीशिवाय भोजन रुचकर होत नाही. मराठीमध्ये ‘मिरची’, हिंदीमध्ये ‘मिर्च’, संस्कृतमध्ये ‘तीष्णा’ किंवा ‘उज्ज्वला’, इंग्रजीमध्ये ‘चिली’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘कॅप्सिकम अनम’ (Capsicum Annuum) या नावाने प्रसिद्ध असलेली मिरची ‘सोलॅनसी’ कुळातील आहे.

रंगानुसार लाल व हिरवी मिरची असे दोन प्रकार आहेत. तर तिच्या तिखटपणावरून कोल्हापुरी, गोमंतकी, लवंगी आणि सिमला मिरची असे प्रकार पडतात. मिरचीचे उत्पादन संपूर्ण जगात घेतले जाते. तर भारतामध्ये गुजरात व महाराष्ट्रामध्ये याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. कोल्हापुरी मिरच्या या रंगाने लालभडक, बारीक व लांब असतात. तर गोमंतकी मिरची ही आकाराने मोठी व गोल असून, त्याची साल जाड असते. लवंगी मिरची आकाराने अतिशय लहान परंतु स्वादाने अति तिखट असते. सिमला मिरची ही स्वादाने अजिबात तिखट नसते, तर आकाराने एक ते तीन इंच घेराची जाड व तीन ते सहा इंच लांब असते. ही मिरची तिखट नसल्यामुळे तिची भाजीही केली जाते.

हेही वाचा >>> मैत्रिणींनो, ‘टूल्स फ्रेंडली’ होऊ या!

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : मिरच्या उष्ण, तिखट, दीपक, पाचक, पित्तकारक, रक्तवर्धक, कृमीनाशक, कफ, आम व वातनाशक असतात. परंतु तिच्या अतिरिक्त सेवनाने त्या दाहकारकही बनतात. मिरच्यामुळे तोंडास चव येते. अग्नी प्रदीप्त होतो आणि घेतलेल्या अन्नाचे शोषण होऊन भोजन रुचकर लागते.

आधुनिक शास्त्रानुसार : मिरचीमध्ये प्रथिने, कर्बोदके, उष्मांक, स्निग्धता, मेद, ‘बी-६’, ‘अ’, ‘क’, ‘के’ जीवनसत्त्व, लोह, कॉपर, पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ ही सर्व पौष्टिक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१) आहारामध्ये मिरच्यांचा उपयोग करताना सहसा पातळ सालीपेक्षा जाड सालीच्या मिरच्यांचा उपयोग करावा. जाड मिरच्या पातळ सालीच्या मिरच्यांपेक्षा कमी तिखट असून, त्या शरीराला जास्त हानिकारक नसतात.

२) चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, सांबार, पोहे, चिवडा, कढी यामध्ये हिरव्या मिरच्यांचा उपयोग करावा. परंतु आयुर्वेदानुसार हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरणे शरीरासाठी जास्त हितकारक असल्याने शक्य त्या वेळी लाल मिरचीचाच वापर करावा.

३) रोजच्या आहारामध्ये लाल मिरचीचा उपयोग करण्यासाठी सुकलेल्या लाल मिरच्यांची कुटून किंवा दळून तिखट पावडर बनवून ठेवावी. तिचा वापर आवश्यकतेनुसार आहारात करावा.

हेही वाचा >>> चॉइस तर आपलाच : तुमची मुलं आळशी झालीत ?

४) हिरव्या मिरच्यांचे लोणचेही चांगले होते. या मिरच्यांच्या लोणच्यामध्ये लिंबाच्या फोडी करून घातल्याने लोणचे स्वादिष्ट तर लागतेच, शिवाय त्यासोबत घेतलेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.

५) लाल मिरचीच्या आतील बी काढून ती मिरची गायीच्या तुपात तळावी. नंतर भाताबरोबर ती कुस्करून खाल्ल्यास भातास छान चव येते.

६) झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करण्याऐवजी मिरच्यांचा रस + कडूलिंबाच्या पानांचा रस (लिंबोळ्याचा रस ) + गोमूत्र एकत्र करून जर झाडांवर फवारणी केली, तर झाडांना कीड लागत नाही.

७) अपचन, अग्निमांद्य, भूक कमी लागणे, तोंडास चव नसणे या लक्षणांवर जर योग्य प्रमाणात आहारामध्ये मिरचीचा वापर केला, तर पचनक्रिया सुधारून वरील लक्षणे कमी होतात.

८) दातदुखीचा त्रास वाढला असेल, तर मिरच्यांच्या रसात कापूस भिजवून तो दुखणाऱ्या दाताखाली धरून ठेवावा. यामुळे दातदुखी थांबते.

९) तोंडास अरुची निर्माण होणे, भूक न लागणे या लक्षणांवर थोड्या प्रमाणात ताजी मिरची खावी.

हेही वाचा >>> गच्चीवरची बाग : औषधी वनस्पती

१०) शेंगादाणे घालून तयार केलेला मिरचीचा ठेचा व बाजरीची भाकरी गरिबांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मुख्य अन्न आहे.

(११) कुत्रा चावला असल्यास त्याचे विष कमी करण्यासाठी दवाखान्यात जाण्यापूर्वी प्रथमोचार म्हणून ती जखम स्वच्छ धुऊन त्यात हळद व किंचित मिरची पावडर भरावी. थोड्या वेळाने लगेच धुऊन टाकावी. यामुळे जखम पिकत नाही व लवकर भरून येते.

१२) निरनिराळ्या प्रकारच्या औषधांमध्ये, चूर्णामध्ये, लेप, मलमांमध्ये मिरचीचा उपयोग जंतुनाशक म्हणून केला जातो.

१३) संधिवाताचा त्रास होत असेल, तर दुखऱ्या भागावर मिरचीचे मलम लावल्यास वेदना कमी होतात. (१४) ताप आला असेल, तर थोड्या प्रमाणात मिरची खावी. यामुळे रक्त शुद्ध होऊन घाम येतो व ताप त्वरित कमी होतो.

सावधानता :

मिरचीमुळे जरी भोजन स्वादिष्ट, रुचकर होत असले, तरी तिचा वापर प्रमाणात करावा. कारण जास्त प्रमाणात मिरची खाणे शरीरासाठी नुकसानकारक आहे. यामुळे दाह, लघवी होताना जळजळ होणे, मूळव्याध, शरीराची, त्वचेची, आतड्यांची, पोटाची, आग होणे अशी लक्षणे दिसून येतात. मिरचीच्या जास्त तिखटपणामुळे व अतिरिक्त सेवनाने शरीरात तमोगुण वाढीस लागतो. रक्तातील उष्णता वाढते. डोळ्यांचे नुकसान होते. पुरुषत्व कमी होते. तसेच किडनीला इजा पोहोचू शकते. त्यामुळे मिरचीच्या उपयोग आवश्यक तेवढ्याच प्रमाणात करावा. सहसा मिरची पावडर ही घरीच बनवावी. बाजारातून आयती तिखट पावडर आणू नये. कारण त्यामध्ये कचरा व भेसळ असण्याची शक्यता असते. तयार तिखट पावडरमध्ये बिया, देठे, भेसळ, कचरा असण्याची शक्यता असते. म्हणून लाल मिरच्या आणून त्यांची देठे काढून नंतर त्या दळाव्यात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of capsicum annuum benefits of capsicum annuum information about capsicum annuum zws
Show comments