डॉ. शंतनू अभ्यंकर
‘बाईपण भारी देवा’ गाजतो आहे. आधी बायको जाऊन आली. मग मी गेलो. वाजत-गाजत सादर झालेल्या आणि वाजल्या-गाजल्यामुळे मी गेलेल्या इतक्या सिनेमांनी माझी इतकी दारुण निराशा, इतक्या वारंवार केली आहे, की ही खबरदारी मी घेतोच! सिनेमा वाईट आहे हे कळायला तो एकदा तरी पाहायला हवा, अशी बायकोची ठाम समजूत. त्यामुळे गनिमाच्या गोटातून माहिती काढण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरतं. आल्या आल्या बायकोनं डिक्लेअर केलं, ‘‘भारीच आहे सिनेमा. थिएटर हाऊसफुल्ल होतं. पण सगळ्या बायकाच होत्या!’’ शत-प्रतिशत बायका म्हटल्यावर मी हादरलो. म्हटलं, ‘‘माहेरची साडी’ छाप होता की काय?”
‘‘नाही रे, तू बघच.’’ शिवाय फेसबुक, व्हॉटसॲपवर चर्चा होत्याच. स्त्रीप्रधान, बायकांवरच्या अन्यायाला वाचा फोडणारा, बायकांच्या बाजूचा… पण म्हणूनच पुरुषांनी बघावा असा!
मग बघितला. बाहेर गटागटानं येणाऱ्या बायका, अगदी नटूनथटून! साड्या, नथी, अगदी झकपक! इतक्या सगळ्या बायकांवर आपण इतके दिवस इतका अन्याय करत होतो असं वाटून मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी आपला तिकीट गच्च मुठीत धरून अंग चोरून होतो. माझी उपस्थिती लक्षात आली तर काय घ्या? पण कोणीही माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. आपल्याच धुंदीत, हसत खेळत, सगळ्या आत शिरल्या आणि काहींनी तर पॉपकॉर्नवाल्यासमोर मंगळागौरीच्या गाण्यावर फेर धरला. मग थिएटरमधला जल्लोष. कुजबूज, खसखस, हशे, उसासे, चुकचुक, टाळ्या आणि चक्क शिट्ट्यासुद्धा.
हेही वाचा… नवऱ्याच्या आत्महत्येनंतर पत्नीनं ७,००० कोटींच्या कर्जातून ‘सीसीडी’ला तारलं
अनेक अनपेक्षित गोष्टी करण्यात या चित्रपटाचं यश आहे. ‘बाईपण भारी देवा’ या नावापासून सुरुवात. ‘लहानपण दे गा देवा’, हा मूळ चरण, ही मूळ मागणी. पण इथे काही मागितलं वगैरे नाहीये. थेट बाईपण भारी देवा, असं देवालाच ठासून सांगितलं आहे!
इथे हीरो नाही. मात्र सहा सशक्त अभिनेत्रींची, सशक्त फौज इथे उभी आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा साऱ्यांचा सहजसुंदर वावर, जणू ती ती पात्र जिवंत झाली असावीत.
‘सख्खी आई विरुद्ध सासूआई’ असा दोन विहीणी विहीणींत हा सामना रंगणार असं वाटत असतानाच हा धोपट मार्ग सोडून कथा बिकट वाटेची वहिवाट करते. ज्या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्तानं या सहा भगिनी, सह-भगिनी होतात, त्या स्पर्धेचा निकाल, बक्षीस समारंभ वगैरे काहीही आपल्याला दिसत नाही. यांचा खेळ मात्र ठसक्यात आणि दणक्यात होतो. वयोमान आणि आकारमान लक्षात घेता हे त्यांच्या इतकंच कॅमेऱ्याचेही कसब!
इतकी फिट्ट सिच्युएशन असूनही इथे मंगळागौरीची पूजा नाही. नसणारच. कारण मंगळागौरीच्या मूळ कथेतल्या वैश्य पत्नीला आंबे खाल्यानं मुलगा होतो, तो अल्पायुषी ठरेल असा शाप असतो. अपघातानंच त्याची पत्नी झालेल्या मुलीच्या व्रतानं शाप त्याला भोवत नाही आणि तिचं वैधव्य टळतं! या कहाणीतला कोणताही प्रश्न या सहा जणींचा नाही. त्यातले तोडगेही त्यांच्या पचनी पडणारे नाहीत. इथे मंगळागौरीचे खेळ हा एक क्रीडाप्रकार आहे. असो. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, हेच खरं.
हेही वाचा… प्रीती अघालयम… संचालक, ‘आयआयटी झांझिबार’!
काहीशा नाखुषीनं आणि नाईलाजानं या सहा सहोदरा एकत्र येतात. आतापावेतो या बहिणाबाईंत चांगलीच ‘बहीणबंदकी’ माजलेली असते! पण हळूहळू नादुरुस्त नाती दुरुस्त केली जातात, दुरुस्त नाती तंदुरुस्त केली जातात आणि दुरुस्तीपार नाती तोडून टाकली जातात. यात भेद करायला शिकवणारा विवेक सामूहिक शहाणपणातून जागवला जातो. यासाठी योजलेले कथांश, पेरलेले नाट्यमय प्रसंग आणि खटकेबाज संवाद दाद घेऊन जातात.
प्रत्यक्ष स्पर्धेतली हारजीत काहीही असली, तरी जिंकलेल्या असतात, एकीमेकींसाठी सखी-संवादिनी झालेल्या, या सहाजणी आणि जिंकलेले असतात लेखक-दिग्दर्शक.
प्रत्येक दृश्य चढत चढत जाणारं, एका उत्कर्ष बिंदूला पोहोचणारं. करूण, आश्चर्य, उपहास, हास्य, अशा रसांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारं. त्यांची गुंफणही अशी, की एकातून दुसरं सहज उमलणारं, भावनांची लपाछपी साधणारं. हा तंत्रनिपुण दिग्दर्शक मधूनच वर्तमान पात्रांबरोबर प्रेक्षकांनाही भूतकाळाची सफर घडवून आणतो. ही युक्ती अगदी परिणामकारक ठरते. प्रत्येक दृष्यातून आणि दृष्य-चौकटीतून हा गडी आपल्याला काही सुचवत जातो. तो काही सांगत नाही, कोणताही आव आणत नाही, फक्त सुचवत जातो.
खाष्ट सासू, सोशीक सून किंवा अंथरुणातून मेकअपसकट उठल्या उठल्या ‘च्या शिजवायच्या’ऐवजी कुटील कारस्थानं शिजवणाऱ्या लोकोत्तर स्त्रिया इथे नाहीत! पण सवतीला ऊंची मेकअप बॉक्स देता देता, ‘सांभाळ, हे सौंदर्य क्षणिक आहे,’ असं सुचवणाऱ्या बायका, नाकर्त्या नवऱ्याचं कर्ज फेडायला कंबर कसणाऱ्या बायका, दशकानुदशकं मनात अढी बाळगणाऱ्या, कुढणाऱ्या बायका, स्वतःसाठी ब्रा घेताना अवघडणाऱ्या बायका आणि बहिणीनं आधार दिला की लगेच माप देणाऱ्या बायका मात्र आहेत.
हेही वाचा… ‘माणूस’ नसलेली ‘बाई’ टीव्हीवर बातम्या वाचते, तेव्हा…
पुरुषाचीही विविध रुपं येतात. काही रगेल, काही रंगेल, काही रांगडे, तर काही पुचाट. इथे ‘पुरुषगिरी’ गाजवणारे सासरे आहेत, त्यापुढे नांगी टाकणारे मुलगे आहेत, मनाने खचलेल्या बायकोला समर्थ साथ देणारे आहेत आणि मिठ्ठास कोल्हापुरी बोलणारेही आहेत.
फक्त महिलांसाठी ट्रॅव्हल कंपन्यांकडून आखून दिल्या जाणाऱ्या ट्रिपसारखा वाटला हा सिनेमा. बायकांची मनोकामना पूर्ण करणारा, त्यांनाही नकळत त्यांच्या क्षमता दाखवणारा, गुरुगिरी न करता गुरुमंत्र देणारा, त्यांनाही न जाणवलेला भवताल आरास करून मांडणारा.
मात्र उत्तमाच्या या अस्सल अदाकारीत माझ्यासारख्या डॉक्टरला जाम खटकलेली गोष्ट म्हणजे, ‘फायब्रॉईड’चं निमित्त होऊन एकीला इमर्जन्सी हिस्ट्रेक्टॉमी करावी लागते ही! आधीच (माझ्यासारख्या!) कोणा चांगल्या डॉक्टरला दाखवलं असतं तर ही चूक टळली असती. स्त्रीपात्राची गर्भाशयाची पिशवी तातडीनं काढून टाकण्याचा प्रसंग पुन्हा कोणा सिने-दिग्दर्शकावर ओढवलाच, तर प्रसूती-पश्चात-रक्तस्राव, कोरिओकार्सीनोमा, सर्व्हायकल प्रेग्नन्सी, सेप्टिक अबॉर्शन, असे काही मातबर पर्याय मी आत्ताच नमूद करून ठेवतो. फायब्रॉईड ही तशी बिच्चारी आणि निरुपद्रवी गाठ. सुमारे १० टक्के महिलांमध्ये या गाठी आढळतात. तक्रार असतेच असं नाही. हिच्यासाठी बरेचदा शस्त्रक्रिया लागते, पण तातडीच्या शस्त्रक्रियेचा प्रसंग विरळाच. हा सगळा प्रकार अवास्तव वाटतोच, पण प्रेक्षकातल्या महिला आपापल्या फायब्रॉईडबद्दल गैरसमज घेऊन बाहेर पडतात त्याचं काय?
एवढा एक अनिष्ट परिणाम वगळला, तर या ‘बाई-पटा’चे इष्ट परिणाम भरपूर आहेत. आता पैठण्या, दागिने यांच्या फ्याशनी येतील. आता नथी आणि नाचगाणी जनमान्य होतील. वाढदिवसाचा ‘हॅपी बड्डे’ आणि डोहाळ जेवणाचा ‘बेबी शॉवर’ झालेल्या जमान्यात, येत्या श्रावणात, आता मंगळागौर ‘इन थिंग’ ठरेल.
lokwomen.online@gmail.com