असं म्हणतात की मनात जर जिद्द असेल तर सर्वकाही शक्य होतं. प्रयत्नाची पराकाष्ठा केली की सर्व स्वप्ने पूर्ण होतात. आज आपण अशाच एका उंच भरारी घेणाऱ्या तरुणीविषयी जाणून घेणार आहोत. कमी वयात यशाचं शिखर गाठणारी आणि आपल्याबरोबर इतरांचे स्वप्न पूर्ण करणारी ही तरुणी आहे रोहिणी वाघमारे.
रोहिणी वाघमारे, अत्यंत साधारण घराण्यातील मुलगी. वडील व्यावसायिक होते आणि आई गृहिणी. रोहिणीला दोन भाऊ आणि एक बहिण आहेत. रोहिणी घरातली मोठी कन्या. आयुष्यात तिला काहीतरी वेगळं आणि मोठं करायचं होतं पण आत्मविश्वास कमी होता. तिला लिहायची खूप आवड होती, पण पुढे दहावीनंतर विज्ञान शाखा घेतली आणि लिहिणं सुटत गेलं.
२०२० मध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षी तिने तिच्या प्रिय आजीला गमावले. आजी तिच्यासाठी अत्यंत जवळची आणि प्रिय व्यक्ती होती. त्याकाळात तिच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले, पण ती खचली नाही आणि तिने मोठ्या हिंमतीने पुन्हा लिहायला सुरुवात केली. २० जुलै २०२० मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी तिने अबोलीस्नेह नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं, जे तिने तिच्या आजीला समर्पित केलं होतं. त्यानंतर तिने मागे वळून कधी पाहिले नाही. तिने स्वत:ची १२ पुस्तक प्रकाशित केले. ही तर एक सुरुवात होती.
असं म्हणतात जो दुसऱ्यांच्या अंगणात आनंदाची झाडे लावतो, त्याच्याच अंगणात सुखाची फुले पडतात. रोहिणी स्वत:पर्यंतच थांबली नाही. तिने केलेला संघर्ष इतरांच्या वाटेला येऊ नये आणि नवनवीन लेखकांना संधी मिळावी म्हणून तिने स्वत:चे प्रकाशन सुरू करण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनतीनंतर तिने वयाच्या २१ व्या वर्षी २०२२ मध्ये रोहिणी नावाने स्वत:चे प्रकाशन सुरू केले. ‘रोहिणी पब्लिकेशन’ हे महाराष्ट्रातील एक उत्तम प्रकाशन आहे. आजवर तिने या प्रकाशनाद्वारे ५० हून अधिक पुस्तक प्रकाशित केले आहे.
हेही वाचा : स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांनीही गरोदर राहायला हवं का? नीना गुप्ता यांचं वक्तव्य का ठरतंय चर्चेचा विषय
रोहिणी सांगते, “सुरुवातीला कोणी सहकार्य करायचे नाही, नावं-बोटं ठेवायचे, पण आज सर्वांचेच खूप सहकार्य आहे. विशेष म्हणजे माझ्या वडिलांनी सुरुवातीपासून मला प्रोत्साहन दिले. वडिलांच्या सहकार्यामुळेच मी इथवर पोहचले.
खरं तर रोहिणी ही तरुण मुलामुलींसाठी एक प्रेरणा आहे जे काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न बघतात. रोहिणीने कमी वयात खूप प्रगती केली. जे करायला लोकांना वर्षांनुवर्षे जातात, ते रोहिणीने खूप कमी वर्षांमध्ये कमावले. या मागे तिची जिद्द अन् इच्छा शक्ती होती आणि हार न मानण्याचा तिचा सकारात्मक दृष्टीकोन होता.
रोहिणी सांगते, “लेखन क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवा लेखकांनी पैसा, प्रसिद्धीसाठी येऊ नये कारण हे सगळं मिळायला फार वेळ लागतो, त्यांनी संयम बाळगून यावे.” ती पुढे सांगते, “स्वप्न पूर्ण होतात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा! निराशा आली तरी थांबू नका, अपयश आल्याशिवाय यशाची चव कळत नसते. म्हणून आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहा. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही.”