संदीप चव्हाण
गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. त्या अगदी नर्सरी बॅग्जपासून ते जमिनीवर वाफे तयार करून पिकवता येतात. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे ऊन मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते.
पालक : पालक ही पालेभाजी आहे. पालेभाजींना चार इंच खोलीची जागा पुरेशी असते. पालक एका चौरस फुटांत पाच ठिकाणी लावावी. एका ठिकाणी दोन बिया चिमटीत घेवून पेरभर मातीत पेराव्यात.
आंबट चुका : ही पालकासारखीच दिसणारी भाजी आहे. याची चव मात्र आंबट असते. शिवाय ही जमिनीलगत पसरट वाढते.
धने व शेपू : यासही चार इंच खोलीची जागा पुरेशी आहे. एका चौरस फुटाला चार चार बोटांच्या अंतरांवर लागवड करावी. एका चिमटीत पाच पाच बिया घेवून त्यांची पेरभर मातीत बिया रुजवाव्यात.
लाल माठ व हिरवा माठ : लाल माठ व हिरवा माठाचे बियाणे हे आकाराने बारीक असते. यांची उंचीही २-३ फूट एवढी वाढत असते. पालेभाजी हवी असल्यास एका चौरस फुटाला चिमूटभर बियाणे घेवून ते मातीवर जेवणावर मीठ टाकल्यासारखे चौफेर विखरून द्यावे. मातीखाली दाबायची गरज नाही.
धान्य वर्गीय बियाणे : ज्वारी, बाजरी, मका : मका हे धान्य वर्गीय असते. योग्य पोषण मिळाल्यास त्यास पेरा पेरावर कणीस धरले जातात. मक्यास चार इंच खोलीची जागाही पुरेशी असते. किंवा गच्चीवरची बाग संशोधीत एरो ब्रिक्स बेडमधेही लागवड करता येते. मक्याचे बी हे एका चौरस फुटाला दोन दोन लागवड कराव्यात. बागेत ज्वारी, बाजरी लागवड करताना एका चौरस फूटाला चार चार बियाणे पेरावेत.
वेलवर्गीय बियाणे : डांगर, वाल, दोडके, गिलके, दुधी भोपळा, कारले, चवळी, काकडी या प्रकारच्या वेलवर्गीय बियाणे हे चार इंच मातीच्या खोलीत अथवा एरोब्रिक्स बेडमध्ये उत्तम प्रकारे येतात. वेलाची वाढ छान होते. कारण त्यास पसरट जागा लागते. एका जागेवर शक्यतो २-२ बिया पेराव्यात. यांची रोपे तयार करण्याची गरज नसते. तसेच यास नर्सरी बॅग्जमधे बियाणे लागवड करून रोपे वाढवावीत. अशी रोपे वाढलेली बॅग बेड अथवा जमिनीवर ठेवून द्याव्यात म्हणजे मूळं ही तळापासून बाहेर येवून खालील मातीत वाढतात. डांगर ही जमिनीवर पसरणारी वेल आहे. फळ जड असल्यामुळे त्यास मांडावर पसरवणे जरा आव्हानात्मक असते. पण मांडवावर चढवल्यास फळास हवेशीर टोपली बांधावी म्हणजे फळाला आधार मिळून ते चांगले वाढते.
sandeepkchavan79@gmail.com