छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’च्या मराठीच्या चौथ्या पर्वात अभिनेत्री रुचिरा जाधवने तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसह एन्ट्री घेतली होती. मराठी ‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच एका कपलने एन्ट्री घेतलेली पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरातील या ‘दो हंसो का जोडा’मधील रुचिराचा प्रवास रविवारी संपला.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुचिराचा चाहता वर्ग तसा बराच मोठा आहे. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात रुचिरा फार काही चांगली कामगिरी करताना प्रेक्षकांना दिसली नाही. आणि कदाचित त्यामुळेच तिला ‘बिग बॉस’च्या घरातून लवकर निरोप घ्यावा लागला.
खरं पाहायला गेलं तर, ‘बिग बॉस’च्या घरात रुचिराने बॉयफ्रेंड रोहितसह जाण्याचा घेतलेला निर्णय हा एका अर्थाने धडाडीचाच मानावा लागेल. कारण, या खेळात कोणीच कोणाचं नसतं. घरात बनलेले पक्के मित्रही कधीकधी खेळामध्ये शत्रू होताना दिसतात. भावना, नाती आणि एकंदरच इथे सगळ्याचाच कस लागतो. अशात एका वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीला, आपल्या बॉयफ्रेंडला रुचिरा घरात घेऊन गेली. हा खेळ जितका टीममध्ये खेळण्याचा आहे, तितकाच तो वैयक्तिकही आहे. पण रुचिरा ना टीममध्ये खेळताना दिसली ना वैयक्तिक…ती दिसली ती केवळ रोहितला सपोर्ट करताना.
‘बिग बॉस’च्या घरातील रुचिराचा वावर म्हणजे केवळ रोहितच्या अवतीभोवती फिरणं, त्याची काळजी घेणं, इतकाच. काही टास्कदरम्यान ती नक्कीच चांगली खेळताना दिसली. अनेकदा स्वत:ची मतंही मांडताना दिसली. पण रुचिरा ही रुचिरापेक्षा रोहितची गर्लफ्रेंडच जास्त वाटली. ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल टाकताना रोहित रुचिराचा बॉयफ्रेंड म्हणून आला होता. पण जाताना मात्र रुचिरा रोहतची गर्लफ्रेंड म्हणून घरातून बाहेर पडली. याउलट रोहितने मात्र त्याचा खेळ पहिल्या दिवसापासूनच दाखवायला सुरुवात केली होती. टास्कमध्येही प्रत्येक वेळेस रुचिरा रोहितला चीअर अप करताना दिसली. परंतु, रोहित रुचिराला खेळण्यासाठी प्रोत्साहन देताना फार कमी वेळा दिसून आला. रुचिराच्या फॅन फॉलोविंगचाही रोहितला थोड्या फार प्रमाणात का होईना नक्कीच फायदा झाला आणि यापुढेही तो होईलच.
हेही वाचा >> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच कपलची एन्ट्री झाली होती. त्यामुळे रुचिरा आणि रोहित वेगळ्याप्रकारे हा खेळ खेळतील, असं प्रेक्षकांना वाटलं होतं. पण रुचिरा-रोहित एकत्र कधीच स्ट्रॅटेजी मांडताना दिसले नाहीत. ते दिसले ते केवळ एकमेकांचे मतभेद दूर करताना…दिवसभरातील छोटी-मोठी भांडणं रात्री झोपताना एकमेकांना मिठी मारुन संपून जायची. खरं तर रोहित रुचिराला ‘बिग बॉस’च्या घरात फार महत्त्व देताना दिसलाच नाही. त्याचा खेळ तो घरात एन्ट्री करण्यापूर्वीच डोक्यात पक्का करुन आला होता, असं वाटतं. मांजरेकरांनीही अनेकदा रोहितचं उदाहरण देऊन रुचिराला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. परंतु, तरीही रुचिराला स्वत:चा खेळ दाखवता आला नाही. त्यामुळेच केवळ रोहितची गर्लफ्रेंड होऊन न खेळता रुचिरा म्हणून खेळली असती तर कदाचित प्रेक्षकांनाही तिला पाहायला आवडलं असतं.
आणखी वाचा >> मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?
रुचिराने शेवटच्या आठवड्यात तिचा खेळ दाखवायला सुरुवात केली होती. रोहितशी तिच्या मतांसाठी, स्वत:साठी ती भांडताना दिसली. घरातून बाहेर पडतानाही तिने स्वत:साठी स्टॅण्ड घेतलेला पाहायला मिळाला. परंतु, रुचिराने सुरुवातीपासूनच स्वत:साठी असा स्टॅण्ड घेतला असता, तर निश्चितच ती खेळातही चांगली कामगिरी करताना दिसली असती. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात थांबण्याची आणखी एक संधी प्रेक्षकांनी तिला नक्कीच दिली असती. परंतु खेळ न समजल्यामुळे आणि स्वत:पेक्षा जास्त महत्त्व रोहितला दिलं गेल्यामुळे रुचिराचा घरातील प्रवास फार लवकर संपला.