बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्मच समजला जातो. आपल्या पोटात राहणारा एक जीव नऊ महिने जीवापाड जपून या जगात सुखरुपपणे आणणं ही स्त्रीत्वाची सगळ्यांत मोठी कसोटी असते. कितीही अडथळे आले तरीही स्त्री धैर्याने, हिंमतीनं त्याला सामोरं जाते आणि आपल्या बाळाला जन्म देते. आपल्या बाळाला बघितलं की तिच्या सगळ्या वेदना दूर होतात. तिच्यात वेगळंच सामर्थ्य, शक्ती येते. आतापर्यंतची अल्लड तरुणी आई झाली की पूर्ण बदलून जाते. तिला जगात काहीही अशक्य नसतं. याच शक्तीची, सामर्थ्याची मनोधैर्याची प्रचिती नुकतीच बिहारमध्ये आली. बिहारमधल्या या नवमातेनं आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांत १०वीची लेखी परीक्षा दिली. बिहारसह संपूर्ण देशभरात तिचं कौतुक होतंय!

आणखी वाचा : असा नादानपणा पुन्हा नाही करणार! – अभिनेत्री नर्गिस फाखरी

बिहारमधल्या बांका जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेत रुक्मिणी कुमार शिकते. तिची दहावीची परीक्षा सुरु होती. रुक्मिणी गर्भवती होती आणि तिची बाळंतपणाची तारीखही अगदी जवळ आली होती. पण तिची शिकण्याची जिद्द जबरदस्त होती. गरोदरपणातही तिनं अभ्यास सोडला नव्हता. त्यामुळे काहीही झालं तरी परीक्षा द्यायचीच हे तिनं ठरवलंच होतं. तिची परीक्षा सुरु झाली तेव्हा तिला नववा महिना सुरु होता. तिच्या बाळंतपणाची तारीख जवळ येत होती. १४ फेब्रुवारीला गणिताचा पेपर देऊन ती घरी गेली तेव्हा तिला अस्वस्थ वाटत होतं. पण तरीही तिनं दुसऱ्या दिवशी विज्ञानाचा पेपर द्यायचाच, हे ठरवलंच होतं. तिला रात्रीच कळाही सुरु झाल्या होत्या. पण त्या सहन करत तिनं पेपर द्यायचा ठरवलं. जेव्हा प्रसूती वेदना असह्य झाल्या त्यावेळेस मात्र तिला रात्रीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रात्रभर तिला त्रास होत होता. तरीही सकाळी ती पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर गेली. तिथं प्रसूतीवेदना सुरुच होत्या…

आणखी वाचा : ‘पावनखिंड’, प्राजक्ता माळी आणि बायकांच्या भोळ्याबाभड्या आशेचा ‘तो’ सीन!

जेव्हा कळा असह्य झाल्या तेव्हा मात्र तिला तिथून तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. सुदैवाने बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप होते. मातृत्वाची परीक्षा तर रुक्मिणीनं सुखरुपपणे पार पाडली. आता प्रश्न होता लेखी परीक्षेचा. तिनं हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस यांना पेपर लिहू देण्याची विनंती केली. अर्थातच नुकत्याच बाळंत झालेल्या रुक्मिणीला तीन तास पेपर लिहिण्याची परवानगी कशी द्यायची असं सुरुवातीला डॉक्टर आणि नर्सेसना वाटलं. आरोग्य आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडे तिनं मागितलेली परवानगी घाईघाईत मंजूर करण्यात आली. रुक्मिणीची शिकण्याची जिद्द बघून डॉक्टरांनी तिला परवानगी तर दिलीच. तिच्याबरोबर अत्यावश्यक औषधे, सलाईन वगैरे तातडीची आरोग्यव्यवस्था असणारी एक अँब्युलन्सही सज्ज ठेवली होती.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : मला दोन आई कशा?

बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांत रुक्मिणीनं ही लेखी परीक्षा दिली. आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभं राहून चांगली नोकरी मिळवण्याचं रुक्मिणीचं स्वप्न आहे. रुक्मिणीला पूर्वीपासूनच शिकण्याची खूप आवड आहे. ती मनापासून अभ्यास करायची. लग्नाआधी ती कटोरिया ब्लॉकमधील एका शाळेत नियमित विद्यार्थिनी होती. लग्नानंतर ती सिलजोरी पंचायतीतील पैलवा इथं तिच्या सासरी गेली. लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं. ग्रामीण भागात तर आजही मुलींच्या शाळा, शिक्षणाबाबत उदासिनता दिसून येते. पण रुक्मिणीला मात्र शिक्षणासाठी तिच्या सासरच्यांचा पूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळालं. इतकंच नाही तर डिलिव्हरीनंतर लगेचच परीक्षा देण्याच्या निर्णयातही ते तिच्याबरोबर ठामपणे उभं राहिले. त्यामुळे रुक्मिणीला आपलं ध्येय साध्य करताना खूप मोठा आधार होता.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!

‘माझं बाळंतपण नीट झालं याचा तर आनंद आहेच, पण पेपर लिहिता आला, परीक्षा वाया गेली नाही, याचाही मला आनंद आहे. माझ्या मुलानंही भरपूर शिक्षण घ्यावं आणि खूप मोठं नाव कमवावं असं मला वाटतं,’ अशी प्रतिक्रिया रुक्मिणीनं दिली होती. आपल्याला विज्ञानाचा पेपर चांगला गेला आहे आणि चांगले गुण मिळतील,असा विश्वास तिनं व्यक्त केला. तर आई आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पेपर दिला नसता तर संपूर्ण वर्षाची मेहनत, कष्ट वाया गेले असते. कदाचित ती जिद्द पुढे कमी पडली असती. खरंतर बाळंतपण झाल्यानंतर नवमातांना कितीतरी सांभाळावं लागतं, काळजी घ्यावी लागते. पण रुक्मिणीची जिद्द, धैर्य, इच्छाशक्ती यापुढे सगळ्यांनाच नतमस्तक व्हावं लागलं आणि तिच्यासोबत अनेकजण उभे राहिले.

आजही आपल्याकडे लग्न आणि मातृत्व हा करियरमधला सगळ्यांत मोठा अडथळा मानतात. कित्येक मुलींना लग्न झालं की इच्छा आणि क्षमता असूनही शिकता येत नाही. आई झाल्यानंतर तर उच्चपदांवर काम करणाऱ्या स्त्रियांचीही करियर संपतात किंवा संपवली जातात. आई झाल्यानंतर स्त्रीचं स्वत:चं आयुष्य, तिचं करियर सगळ्याचा तिनं त्याग केला पाहिजे असाच समज बहुतेक ठिकाणी आहे. पण मातृत्व हा फक्त स्त्रीच्या आयुष्यातला एक टप्पा असतो, तिच्या करियरला मिळालेला फुलस्टॉप नाही. रुक्मिणीनं हेच दाखवून दिलं आहे. भारतीय स्त्री जात्याच चिवट आणि लढवय्यी असते. कोणत्याही संकटाशी सामना करायला ती घाबरत नाही. परिस्थितीवर शक्ती-युक्तीनं ती मात करते आणि आपल्या मार्गातले अडथळे दूर करुन पुढे जाते. शिकण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या रुक्मिणीला हातातली सोन्यासारखी संधी घालवायची नव्हती. त्यामुळे शारिरीक वेदनांवर तिनं मनोधैर्यानं मात केली. ‘जब किती बात को शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती हैं,’ असं म्हटलं जातं, रुक्मिणीकडे बघून याचीच प्रचिती येते.

Story img Loader