बंगळुरूमध्ये नोकरदार महिलांसाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. त्याशिवाय कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, महिलांविषयक काळजी, मुलभूत सुविधा बंगळुरूमध्ये सर्वांत चांगलं असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. उत्तम जॉब मार्केट आणि कौशल्य संधी यासाठी बंगळुरूच्या बरोबरीने मुंबईने गुण मिळवले आहेत. गुरूग्रामही यात अग्रेसर आहे.
आपल्यापैकी अनेकजणी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी, नोकरीसाठी जातात. अशा वेळेस सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न असतो तो सुरक्षेचा. परक्या शहरात आपली मुलगी सुरक्षित असेल का याची काळजी घरच्यांना वाटत असते. ऑफिस ते घर हा प्रवास, सार्वजनिक वाहतूक, रस्ते अशा सगळ्या ठिकाणी सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. महिलांसाठी भारतातील सर्वांत सुरक्षित शहरं कोणती आणि ती का आहेत? याचं उत्तर एका सर्व्हेमधून मिळालं आहे. ‘द अवतार ग्रुप’ (The Avtar Group) या ‘वर्कप्लेस कल्चर कन्सल्टिंग फर्म’ने हा सर्व्हे केला होता. त्यानुसार नोकरदार महिलांना कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहर सर्वाधिक सुरक्षित वाटत असल्याचं समोर आलं आहे. या अहवालानुसार, दक्षिण भारतातील शहरं नोकरदार महिलांना जास्त सुरक्षित वाटत असल्याची माहिती आहे. बंगळुरूनंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई आहे. तर आपल्या मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मायानगरी मुंबई नोकरदार महिलांना कामकाज, प्रवास तसंच राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित वाटत असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. तर पुणे हे नोकरदार महिलांसाठी पाचव्या क्रमांकाचं सुरक्षित शहर ठरलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई, चौथ्यावर हैद्राबाद तर पाचव्या स्थानावर पुणे, त्यानंतर कोलकता, अहमदाबाद, दिल्ली, गुरूग्राम आणि कोईमतूर सुरक्षित शहरांमध्ये स्थान मिळालं आहे.
एकूण २५ सुरक्षित शहरांच्या या यादीमध्ये दक्षिण भारतानं बाजी मारली आहे. या यादीतील २५ पैकी १६ शहरं दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारतातील शहरं उत्तर भारतापेक्षा जास्त सुरक्षित वाटत असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. देशातील १२० शहरांची सरकारी आकडेवारी आणि अवतार ग्रुपच्या संशोधनानुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये खालील मुद्यांचा विचार केला गेला आहे-
- महिलांना राहण्यासाठी ते शहर किती सुरक्षित आहे?
- महिलांना नोकरीच्या किती संधी उपलब्ध आहेत?
- प्रवास करणे किती सोपे आहे? प्रवासासाठी/ वाहतूक व्यवस्था महिलांच्यादृष्टीने कशी आहे?
- राहण्यासाठी घरांची वगैरे सुविधा कशा आहेत?
- महिलांसाठी मुलभूत सोयीसुविधा कशा आहेत?
- सरकारी संस्था किती क्षमतेनं काम करत आहेत?
बंगळुरूमध्ये नोकरदार महिलांसाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. त्याशिवाय कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, महिलांविषयक काळजी, मुलभूत सुविधा बंगळुरूमध्ये सर्वांत चांगलं असल्याचं महिलांनी सांगितलं आहे. उत्तम जॉब मार्केट आणि कौशल्य संधी यासाठी बंगळुरूच्या बरोबरीने मुंबईने गुण मिळवले आहेत. गुरूग्रामही यात अग्रेसर आहे. कामाकाजासाठी बाहेर पडणाऱ्या महिला हा काही नवीन मुद्दा नाही. नाईट शिप्ट, कामाचे भरपूर तास, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करावा लागणारा भरपूर प्रवास अशा अनेक गोष्टी नोकरदार महिलांनाही कराव्याच लागतात. पण या सगळ्यामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का प्रश्न आहेच. देशातील अनेक हायटेक शहरांमध्येही महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनही अत्यंत उदासीनता असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे लैंगिक समानतेच्या मुद्यावर दक्षिण भारतातील शहरे उत्तर भारतातील शहरांपेक्षा अधिक चांगली असल्याचं मत महिलांनी नोंदवलं आहे. या यादीमध्ये तामिळनाडूमधली सर्वाधिक म्हणजे ८ शहरे आहेत. बंगळुरूमध्ये रोजगाराच्या संधी जरी सर्वाधिक असल्या तरी सामाजिक सहभागाच्या दृष्टीने बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं या यादीमध्ये प्रगती केली आहे. २०२३ मध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईनं २०२४ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर गुरूग्रामनं २०२३ मधल्या २० व्या स्थानापासून २०२४ मध्ये ९ व्या क्रमांकावर आले आहे. वेगाने होणारे औद्याेगिकीकरण हे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण समजलं जातं. नवीन उद्योगांमुळे महिलांनाही रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. त्यामुळे अगदी वेल्लोर, तिरुचिरापल्ली किंवा सिमलासा, पुद्दुचेरीसारख्या छोट्या शहरांनीही या यादीत स्थान मिळवलं आहे. पण एकूणच दक्षिण भारतातील शहरे सामाजिक आणि औद्योगिकदृष्ट्या महिलांसाठी जास्त सर्वसमावेशक आहेत असं यातून दिसतं. त्यानंतर पश्चिम भारत आहे. मध्य आणि पूर्व भारतात तुलनेनं उद्योगव्यवसायाचा विकास कमी आहे आणि त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या संधीही कमी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहतुकीच्या अन्य साधनांच्या दृष्टीने हैदराबादला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मुंबई यात अगदी थोड्याशा फरकाने मागे आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई अग्रेसर आहे. त्याबरोबरीने हैदराबाद आणि तिरुअनंतपूरमला पसंती आहे. तर सरकारी संस्थाच्या प्रभावशाली कामकाजामध्ये पुण्यानं तिरुअनंतपूरमच्या बरोबरीने अग्रस्थान मिळवलं आहे. जीवनमानाचा दर्जा/ गुणवत्ता (quality of life) या मुद्यावरही पुण्यानं सर्वाधिक पसंती मिळवली आहे.
फेब्रुवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये ६० शहरांतील १,६७२ महिला सहभागी झाल्या होत्या. देशाच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील महिलांचा सहभाग आणि त्यांची प्रगती महत्त्वाची असते. त्यासाठी महिलांना बरोबरीने रोजगाराच्या संधी मिळणं, समान वेतन मिळणं, कौशल्य विकासाला वाव मिळणं हेही गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची आहे ती महिलांची सुरक्षा. महिला सुरक्षित असतील तरच त्या बाहेर पडतील आणि विकासामध्ये त्यांचा सहभाग वाढेल. त्यामुळेच ही फक्त आकडेवारी नाही. त्यातून प्रत्येक शहर आणि राज्याने आपल्या इथं राहणाऱ्या महिलांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी पावलं उचलणंही गरजेचं आहे.