प्रिय साक्षी मलिक आणि सगळ्या लढवय्या मैत्रिणींना समर्पित..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कशा आहात? काळजी घेताय ना? कसंय ना आपण शौर्याचं पदक मिरवताना रडण्याची मुभा आपल्याला कुणीच देत नाही. अश्रू या भावना असतात, पराभव नाही हे अजून आपल्या लोकांना कळलेलं नाही. पण कळेल, वेळेनुसार कळेल. मुळात घराबाहेर पडण्यापासून ते शिक्षणापर्यंत अगदी साधे अधिकारही आपल्याला भांडुनच मिळवावे लागलेत, त्या तुलनेने आपला आताचा लढा थोडा सोपा आहे नाही का? यापूर्वी आपल्याला आपण ‘आहोत’ हे सिद्ध करावं लागलं, मग आपण ‘तोडीस तोड’ आहोत हे सिद्ध करावं लागलं आणि आता आपण ‘बरोबर’ आहोत हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. आणि यासाठी आजचा हा पत्राचा खटाटोप, ज्यामध्ये कुठल्याच स्त्री- पुरुषाला सल्ला द्यायचा प्रयत्न नाही. पण प्रत्येक माणसाला ‘खरं’ ओळखणारा आरसा दाखवण्याचा हेतू आहे.

सुरुवातच आपण एका गोड शब्दाने करूया तो म्हणजे, ‘फेमिनिज्म’! हा शब्द नुसता उच्चारला तरीही पहिली प्रतिक्रिया येते की, पुरुषांचा द्वेष करायचा ना? गंमत म्हणजे ही प्रतिक्रिया द्यायला आपल्याच अन्य मैत्रिणीही मागे नाहीत. कारण मुळात कूल दिसायचं म्हणून पुरुषांच्या हो ला हो करणाऱ्या अनेकजणी आपण आजवर पाहिल्या असतील. इंग्रजीमध्ये यासाठी एक छान शब्द आहे तो म्हणजे ‘पीक मी’ गर्ल्स. सोपा अर्थ सांगायचा तर ‘मी कशी मुलींसारखी मुसुमुसु रडत नाही, मी कशी डॅशिंग आहे, मी कशी स्पष्ट बोलते म्हणून माझ्या मैत्रिणी नाहीत, मित्रच आहेत’ हे दाखवून द्यायचं आणि मग एखाद्या स्त्रीद्वेष्ट्याचा ‘अहं’ वाढवून त्याच्याकडून कामं करून घ्यायची.

थोडा विचार केला तर याचीही काही कारणं समोर येतात. पहिलं कारण, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ‘लॉबी तयार करणे’. समजेल असं उदाहरण पाहायचं तर, अनेकदा महत्त्वाचे निर्णय हे चहाच्या टपरीवर किंवा सिगारेटचे झुरके ओढत, अगदी सभ्य भाषेची बंधने न ठेवता घेतलेले असतात, स्त्रीदाक्षिण्य दाखवायचं म्हणून अशा चर्चांमध्ये महिलांचा समावेश अगदीच कमी ठेवला जातो. या अनौपचारिक चर्चा विश्वास वाढवण्याचं निमित्त ठरतात. आणि मग जेव्हा निर्णयाची अंमलबजावणी करण्याची वेळ येते तेव्हा औपचारिकतेने दिसणारी क्षमता अनौपचारिक विश्वासाच्या मागे पडते. म्हणायला आज आपल्याकडे स्त्री पुरुष एकत्र काम करत असले तरी ही विश्वासाची दरी अजूनही कमी झालेली नाही. अशावेळी काही जणी खदखदत राहतात तर काही जणी खदखदणाऱ्यांवर खुदुखुदू हसून पक्ष बदलतात. साक्षी आणि विनेशच्या बाबतही हेच झालं असावं, महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु झालं तेव्हा ४० चेहरे त्यात होते ना आणि आज लढ्यात अजूनही पाय रोवून किती जणी उभ्या आहेत?

दुसरं कारण म्हणजे, उत्तरं देण्याचा स्वभाव! जेव्हा कुस्तीपटुंनी ‘कुण्या एका मदमस्त सत्ताधाऱ्याची’ चूक मांडली तेव्हा समोरून काय उत्तर आलं? काहीच नाही! जेव्हा आंदोलन तीव्र होत गेलं, जेव्हा देशाचा गौरव वाढवणारे कुस्तीपटू रस्त्यावरून बसून होते तेव्हा समोरून काय उत्तर आलं, काहीच नाही! अगदी शेवटच्या टप्यावर आम्ही तुमचं ऐकल्यासारखं करतो हे दाखवायचं म्हणून ‘त्या’ सत्ताधाऱ्याच्या जागी दुसऱ्याला बसवण्यासाठी निवडणुकीचं आमिष दाखवलं गेलं, पण त्यातही ‘आरोपी’ ला देव मानणाऱ्याचा पर्याय उत्तर म्हणून देण्यात आला. अगदी सहज केलेली ही फसवणूक आहे. समोरच्याला असे पर्याय द्यायचे ज्यात आपल्याला कमीत कमी आक्षेप असेल, निवडीमध्ये कोंडी करून समोरच्याची निवड करण्याची इच्छाच संपवून टाकायची आणि आपल्याला हवा तसा शेवट गोड करून घ्यायचा. पण अगदी याच उलट आंदोलनकर्त्यांनी आरोपीला अगदी सरळ साधे सोपे उत्तर देऊ केले, आणि ते म्हणजे त्याग! मग तो त्यांनी कमावलेल्या पदकांचा असो, गौरवाचा असो किंवा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा.

हा त्याग समोरचे पळवाट म्हणून वापरणार हे वेगळं सांगायला नको, ते चुकीचे होते म्हणून मागे झाले हे बोलायला कोणीच कमी करणार नाही, सत्ताधारी तर नाहीच पण त्याहीपेक्षा त्यांना देवाच्या खुर्चीत बसवणारे त्यांचे भक्तही नाहीत. आपली बाजू सिद्ध करायची असेल तर संघर्ष करावाच लागेल, संघर्ष करायचा असेल तर प्रश्न विचारावेच लागतील, प्रश्न विचारताना आवाज कणखरच असावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला एकत्र यावंच लागेल.

हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

ता. क.- हा संघर्ष स्त्रीचा असला तरी त्यात बजरंग, विरेंदर सारखे कित्येक कृष्ण साथ देण्यासाठी पुढे आले आहेत, त्यांच्या हिंमतीला सलाम. पण हा एक लढा जिंकण्यासाठी आपल्याला तारणहार शोधून चालणार नाही, तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकेल लढवय्यांची सेना तयार करायला हवी. त्यासाठी आधी प्रत्येकीने स्वतः झाशीची राणी होऊन पुढे यायला हवं.

सिद्धी