मुक्ता चैतन्य
सलमान खान बायकांनी कोणते कपडे घालायचे आणि किती कपडे घालायचे, तिने लग्नाआधी आणि नंतर दिसायचं कसं, वागायचं कसं, त्यांनी नोकरी करायची की नाही, मूल झाल्यानंतर घरात बसायचं की नोकरी चालू ठेवायची या आणि अशा अगणित गोष्टींमध्ये बाईपेक्षा पुरुषच जास्त बोलत असतात. ते कुटुंबाच्या पातळीवर तर बोलतातच, पण सामाजिक पातळीवरही बाईनं कसं असावं याविषयी सातत्याने मतप्रदर्शनं करत असतात.
आणखी वाचा : आहारवेद: अमृतासम दूध
गमतीचा भाग असा की अशी मतप्रदर्शनं करणारे पुरुष, पुरुषांनी कसं वागावं याविषयी मात्र अवाक्षरही काढत नाहीत.
आता काळ बदलला आहे आणि पुरुषही बदलले आहेत, असं कितीही म्हटलं तरी पुरुषांच्या बदलण्याचा वेग अत्यंत धिमा आहे हेही खरंच. आणि ते स्वाभाविकही आहे, पिढ्यानुपिढ्या जी सत्ता हातात मिळालेली आहे ती इतक्या चटकन कशी काय सुटणार? शिवाय आपण निव्वळ योगायोगाने पुरुष म्हणून जन्माला आलो आहोत हा साधा विचार मागे पडून ‘आपण पुरुष आहोत’ या धुंदीत जगताना आपल्यात काही मूलभूत बदल करणं गरजेचं आहे, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. हे पुरुषांच्या तर येतच नाही पण बायकांच्याही येत नाही. कारण बायकाही पुरुषप्रधानतेच्या जबरदस्त वाहक असतात. बायकांवर पुरुषप्रधानतेचे संस्कार इतके पक्के आहेत की आपण पुरुष श्रेष्ठत्वाची भलावण करतोय हेही त्यांच्या लक्षात येत नाही इतकं सगळं विविध पातळ्यांवर सरावलेलं आहे.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग : उसाचे चिपाड आणि वाळलेल्या फांद्या
आज हे सगळं लिहिण्याचं कारण सलमान खान यानं व्यक्त केलेले विचार. पुरुष बायकांकडे ज्या नजरेनं बघतात ते त्याला आवडत नाही म्हणून बायकांनी अंगभर कपडे घालून त्याच्या सेटवर वावरावं, असा काही नियम त्याने केलेला आहे म्हणे. बायकांच्या सुरक्षिततेचा विचार आणि किती पुरुषांची तोंडं बंद करणार, त्यापेक्षा बायकांनी स्वतःला जपावं वगैरे भावना त्यामागे असेलही पण त्याच्याच सेटवर कुठल्याही पुरुषाकडून चुकूनही असभ्य वर्तन झालेलं चालणार नाही, असा नियम तो का करू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’मध्ये झालेल्या मुलाखतीत त्यानं या गोष्टी सांगितल्या होत्या. शिवाय आदर्श स्त्री कोण यावरही चर्चा झाली. पुन्हा तेच ते जुने, जी स्त्री उलट उत्तर देत नाही, सगळ्यांचं ऐकते, घराला प्राधान्य देते वगैरे वगैरे…
आणखी वाचा : आहारवेद : कॉफी घ्या, पण क्वचितच!
खरं सांगू का… हे ऐकण्याचा, वाचण्याचा, बघण्याचाही आता कंटाळा आला आहे. किती वर्षं आपण तीच ती ‘री’ ओढून बायकांना एका विशिष्ट चौकटीत कोंबू बघणार आहोत. कधी तरी जरा बदल म्हणून आदर्श पुरुष कोण याच्याबद्दल चर्चा करायला काय हरकत आहे? एरवी महिला सबलीकरणाबद्दल चर्चा करणार, बायकांचा उद्धार करण्याची जबाबदारी जणू आपली आहे, असा आविर्भाव आणणार आणि पुन्हा बायकांना चार भिंतीत कोंडू बघणार. बायकांनी दारू प्यायली तर संस्कृती बुडते, पुरुषाने प्यायली तर बुडत नाही का? व्हर्जिनिटीबाबत फक्त बाईच्या बाबतीत समाज संवेदनशील का असतो? अंगावर टॅटू काढणाऱ्या बायकांना नावं का ठेवली जातात? टीनएजर्सबरोबर काम करताना एक अनुभव नेहमी येतो, तीन-चार एक्स गर्लफ्रेंड असलेल्या मुलाला त्याचे समवयीन नावं ठेवत नाहीत, उलट त्याला पोरी पटतात म्हणून मित्रांना कौतुक असतं, पण त्यांच्याच एखाद्या मैत्रिणीला दोन-तीन एक्स बॉय फ्रेंड्स असतील तर तिला लगेच स्लट म्हटलं जातं. हे मी जेन झी, म्हणजे समकालीन टीनएजर्समध्ये बघितलेलं आहे. हे कुठून येतं?
कारण बाई कशी असली पाहिजे याच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने बनवलेल्या चौकटी अजूनही शाबूत आहेत. त्याचे संस्कार घराघरातून सुरू आहेत. ते करण्यात पुरुषांचा पुढाकार तर आहेच पण बायकांचाही आहे. बाईने तिच्या मर्जीनुसार जगू नये यासाठी समाज सतत प्रयत्न करीत असतो. सलमान खानच्या उदात्त विचारांमध्ये असलेला बुरसटपणा नवा नाहीये. आणि खरं सांगायचं तर त्याला नावं ठेवण्याचीही गरज नाहीये. कारण तो एकटाच नाहीये, आपापल्या घरादारात, आजूबाजूला, ऑफिसमध्ये, शाळा-कॉलेजांतून असाच विचार करणारे अगणित लोक आहेत. या सगळ्यांच्या मेंदूची सफाई करावी लागणार आहे. ती एका रात्रीत होणार नाही.
महिलांच्या सबलीकरणाबरोबरच जोवर आपण पुरुषांबरोबर काम करत नाही, त्यांच्यावर असलेले पुरुषप्रधानतेचे किचकट आणि चिवट संस्कार जोवर पुसून काढत नाही, त्यांना माणूसपणाच्या पातळीवर जोवर आणत नाही आणि त्यांचं मनोसामाजिक सबलीकरण जोवर करत नाही तोवर हे प्रश्न सुटणार नाहीत. मी टीनएजर असताना जे प्रश्न मला पडत होते तेच जर माझ्या मुलीला पडणार असतील तर समाज म्हणून आपण काहीच प्रगती केलेली नाही हे समजून घ्यावं.
प्रगती साधायची असेल तर फक्त एका घटकाबरोबर काम करून भागणार नाही. पुरुषांना त्यांच्या पुरुषपणाच्या चौकटीतून खेचून बाहेर काढावं लागेल, त्या चौकटीनं त्यांचं किती नुकसान केलं आहे हे पुनःपुन्हा सांगावं लागेल आणि समानतेचा आणि सन्मानाचा विचार त्यांच्या मनाच्या आणि भावनांच्या जमिनीत रुजवावा लागेल, तरच काहीतरी बदलाची आशा आहे. नाही तर वर्षानुवर्षं आणि पिढ्यानुपिढ्या आपण हेच बोलत राहू.
muktaachaitanya@gmail.com