मोटारस्पोर्ट्स सारख्या खेळात नारायण कार्तिकेयन, करुण चंडोक, जहान दारुवाला, अर्जुन मैनी असे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक प्रसिध्द आहेत. याच रांगेत आता साल्वाचं नाव जोडलं जातं. अथक प्रयत्न, जिद्द आणि सातत्य यामुळे तिनं पाहिलेल्या स्वप्नामुळे इतिहास घडणार आहे. त्यामुळेच कदाचित तिच्यासारख्या अनेक मुलींना मोटारस्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रेरणाही मिळणार आहे.
तुफान वेग… वाहनावरचा प्रचंड कंट्रोल आणि संयम… डोळ्यांचं पातं लवण्याच्या आत उडालेला धुरळा किंवा वळणावर सफाईदारपणे वळलेली वाहनं … एफ-१ रेसिंगच्या चाहत्यांना आकर्षून घेणाऱ्या या गोष्टी. याच गोष्टींची भुरळ साल्वा मार्जनलाही पडली, पण साल्वाच्या या आकर्षणाचं रुपांतर स्वप्नात झालं आणि ते स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्यासाठी तिनं जीवाचं रान केलं. जवळपास दहा वर्षांपूर्वी केरळच्या ग्रामीण भागातली एक मुलगी मोटारस्पोर्ट्सकडे आकर्षित झाली. त्यावेळेस हे स्वप्नं प्रत्यक्षात येणं जवळपास अशक्यच होतं. मात्र मोटारस्पोर्ट्सच्या दुनियेत जशा अनेक अशक्य गोष्टी ट्रॅकवर घडताना आपण पाहतो तसंच तिनंही अशक्य ते शक्य करून दाखवलं. केरळमधली २५ वर्षांची साल्वा मार्जन इतिहास घडवण्याच्या अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. साल्वाला जानेवारी २०२५ मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी ले ऑटोमोबाईल (FIA)द्वारा आयोजित फॉर्म्युला १ अकादमीमध्ये सहभागी होणारी भारतातली पहिली महिला बनण्याचा सन्मान मिळणार आहे.
हेही वाचा : स्त्री आरोग्य : तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेताय? खबरदारी घ्या!
भारतात एरवीही जिथे मोटारस्पोर्ट्सबद्दल फारसं बोललं जात नाही, तिथे महिला मोटार रेसर बनण्याचा विचार करणंही दूरची गोष्ट होती. केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातील पेरेम्बरामध्ये साल्वाचं मूळ गाव आहे. तिनं बिझनेस मॅनेजमेंटची पदवीही घेतली आहे. २०१८ मध्ये फॉर्म्युला रेसिंगमध्ये सहभागी होण्याच्या तिच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू झाला. भारतात फॉर्म्युला रेसिंगसाठी फॉर्म्युला LGB ही एक लोकप्रिय एंट्री स्पर्धा आहे. त्यात ती सहभागी झाली. त्यानंतर आपल्या कौशल्याच्या जोरावर २०२३ मध्ये एफ-४ इंडियन चॅंपियनशीपसाठी ती पात्र झाली. त्याचवर्षी तिनं एफ-४ युएई चँपियनशीपमध्येही भाग घेतला. तिथंही उत्कृष्ट कामगिरी केली. तिचं लक्ष्य आता एफ-१ अकादमी हेच आहे. त्यासाठी अधिक चांगल्या सरावासाठी ती संयुक्त अरब अमिरातीतमध्ये गेली आहे.
या सगळ्या प्रवासात साल्वापुढे मुख्य अडथळा होता तो रेसिंगसाठी लागणाऱ्या महागड्या सामानाचा. रेसिंग हा प्रकार अत्यंत खर्चिक आहे. एफ-४ च्या ट्रेनिंसाठी लागणाऱ्या सामानाच्या खर्चामुळे साल्वा अगदी मेटाकुटीला आली होती. पण तिनं हार मानली नाही. तिनं आपल्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी मिळवली. त्यातून पैसे वाचवले आणि आवश्यक ते सामान खरेदी केलं. यामध्ये तिच्या घरच्यांचा पाठिंबा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. असंख्य धोके असलेल्या या क्षेत्रात करियरसाठी मुलीला प्रोत्साहन दिल्याबद्दल तिच्या पालकांना टोमणेही ऐकायला लागले. पण तिचे आईवडिल आणि भाऊ बहीण यांनी तिची साथ कधीच सोडली नाही.
हेही वाचा : Kolkata Rape : “मुलींनो भारतात येऊ नका, कारण..” कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर महिला इन्फ्लुएन्सरची पोस्ट
मोटार रेसिंगमध्ये प्रचंड शारीरिक क्षमता लागते. त्यामुळे फिटनेस अत्यावश्यक असतो. रेसिंग कारच्या आतमधलं तापमान कधीकधी ४०° सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यातच वळणांवर ब्रेकिंगचे प्रेशर कित्येकदा ६० ते १०० किलोपर्यंतही आवश्यक असते. पण रेसच्या दरम्यान रेसरचं वजन ४ किलो कमी होऊ शकतं इतकं हे सगळं प्रचंड थकवणारं असतं. आजही मोटार रेसिंग क्षेत्रात पुरुषी वर्चस्व आहे. त्यामुळे महिलांसाठी या क्षेत्रात जास्त आव्हानं आहेत याची साल्वाला जाणीव आहे. तिलाही कितीतरी स्पर्धांमध्ये अपयश मिळालं, रेसिंगदरम्यान अपघात झाले, गाड्यांचं नुकसान झालं, तिची कामगिरीही काहीवेळेस खराब झाली. आपल्याला हे जमेल का असं वाटणारे काही क्षण साल्वाच्याही आयुष्यात आले, पण रेसिंगवरच्या प्रेमानं या विचारांपासून तिला नेहमीच परावृत्त केलं.
आता साल्वा Next Level Racing हा तिच्या प्रशिक्षणाचा अर्धा खर्च उचलणाऱ्या स्पॉन्सर्सची ब्रँड अँबेसेडर आहे. तरीही तिचं स्वप्नं पूर्ण कऱण्यात आर्थिक अडथळे आहेतच. एफ-१ अकादमीतून पात्र होणं हा तिच्यासाठी फक्त प्रतिष्ठेचा मुद्दा नाहीये, तर त्यामुळे तिचा आर्थिक भारही बराच कमी होणार आहे. एफ-१ रेसिंगमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणं हे तिचं ध्येय आहे. त्याचबरोबर तिला मोटारस्पोर्ट्समध्ये येणाऱ्या महिला रेसरसाठी मार्ग खुला करायचा आहे.
भारतात आता खेळांमधल्या करिअरविषयी जागरुकता वाढू लागली आहे. क्रिकेट सोडून अन्य खेळांतही करिअर करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळतंय. पण तरीही मोटारस्पोर्ट्स सारख्या खेळात नारायण कार्तिकेयन, करुण चंडोक, जहान दारुवाला, अर्जुन मैनी असे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक प्रसिध्द आहेत. याच रांगेत आता साल्वाचं नाव जोडलं जातं. अथक प्रयत्न, जिद्द आणि सातत्य यामुळे तिनं पाहिलेल्या स्वप्नामुळे इतिहास घडणार आहे. त्यामुळेच कदाचित तिच्यासारख्या अनेक मुलींना मोटारस्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रेरणाही मिळणार आहे.
© The Indian Express (P) Ltd