Sana Ali ISRO Scientist: चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाचे पुन्हा एकदा जगभरात कौतुक होत आहे. एकेकाळी रॉकेटचे भाग जोडून सायकलवरून वाहून नेणारी ISRO ची मागील कित्येक वर्षातील प्रगती पाहता आता भारत अमेरिकेच्या नासाला सुद्धा टक्कर देण्यास सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ गाठलेला पहिला देश ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले राष्ट्र या बलाढ्य कामगिरीत भारताने अनेक चढउतारही पाहिले आहेत. या प्रवासात हजारो वैज्ञानिकांचा वाटा आहे. विशेषतः महिला सुद्धा या क्षेत्रात मोलाची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी अलीकडंच उदाहरण द्यायचं झालं तर चांद्रयानाच्या ‘रॉकेट वुमन’ डॉ. रितू करिधाल यांनी कमांड देत चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावलं ही स्त्री शक्तीची एक मोठी झेप म्हणता येईल. आता याच ISRO मधून एक नवी यशोगाथा समोर येत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ म्हणून मध्य प्रदेशच्या सना अली हिची निवड झाली आहे. बसचालक म्हणून काम करणाऱ्या सनाच्या वडिलांनी लेकीला कर्ज काढून शिकवले होते. तर आईने सनाच्या शिक्षणासाठी स्वतःचे दाग दागिने सुद्धा गहाण ठेवले होते. अगणित अडथळे पार करून, सना आता इस्रोमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून नियुक्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सनाने आपला खर्च भागवण्यासाठी शिकवणीचे वर्ग घेतले. सनाने विदिशाच्या सम्राट अशोक टेक्निकल इन्स्टिट्यूट (SATI) मधून बीटेक आणि एमटेक पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तिने ग्वाल्हेर येथील अभियंता अक्रमशी लग्न केले. विशेष म्हणजे, सनाच्या सासरच्या मंडळींनीही तिच्या यशाचा मार्ग बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली.
इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सनाचे अभिनंदन केले होते. तिला एक प्रेरणा म्हणून संबोधून ते म्हणाले, “तुझ्यासारख्या महिला मध्य प्रदेशला अभिमानाने प्रगतीपथावर नेत आहेत. मी तुम्हाला आनंदी, यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
माध्यमांशी बोलताना, सनाने सुद्धा लोकांनी त्यांच्या मुलींना शिक्षण द्यावे आणि त्यांच्या स्वप्नांना पंख द्यावे असा सल्ला दिला आहे. तर मुलींनी सुद्धा मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करायला हवे. अभ्यास करून ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावेत. या प्रवासात पुन्हा-पुन्हा अयशस्वी झालात तरी मेहनत करत राहायला हवी. एक दिवस यश नक्की मिळेल,” असं ती म्हणाली.