शिक्षणाला वयाचं कोणतंच बंधन नाही. कोणतीच अट नाही, असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. शिकायचं वेड लागलं, तर काही लोक कधीच शांत बसत नाहीत. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. याचा प्रत्यय एका आजीच्या शाळेतून येत आहे. अशा अनेक आजीबाई असतात; ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असूनदेखील काही कारणांस्तव शिक्षण घेणं शक्य झालं नाही. अशा आजींसाठी शाळा चालविली जात आहे. या माध्यमातून आता आजीबाई सुशिक्षित होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नातवंडांना शाळेत सोडायला आलेले आजी-आजोबा आपण पाहिले आहेत. मात्र, आता आजीबाईंची शाळा सुरू झाली आहे. ठाणे येथील शांतीनगर परिसरात एक अनोखी शाळा भरते. ही आहे चक्क ‘आजीआई’ची शाळा. गावातल्या आजी या शाळेत शिक्षणाचे धडे घ्यायला जातात. येथील आजीबाई भारी नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन, असा युनिफॉर्म घालून शाळेत शिकायला जातात. या आजीबाई अभ्यासाचे धडे गिरवीत आहेत.

६५ ते ८० वयोगटातील आजीबाई आता शिक्षण घ्यायला लागल्या आहेत. आजीचं वय वाढलं म्हणून काय झालं, त्यांची शिकण्याची उमेद मोठी आहे. चालायला त्रास होत असला तरी त्या काठी टेकत गणवेश घालून शाळेत येऊ लागल्या आहेत. अ, ब, क, डचे धडे घेऊ लागल्या आहेत. के. व्ही. चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशनच्या वतीने ही आजीबाईंची शाळा भरविण्यात येत आहे. मंगळवार आणि शनिवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही शाळा भरते. सध्या या शाळेत २० च्या दरम्यान महिला शिकत असल्याची माहिती आहे. अनेक वर्षांपासून आजीबाईंच्या मनातील शिकण्याची इच्छा आज या आजीबाईंच्या शाळेतून पूर्ण होतेय.

येथे पाहा व्हिडिओ

मुळाक्षरे, बाराखडी लिखाण, वाचन आणि स्वत:चं नाव लिहिणं, स्वाक्षरी करणं हे आजीबाई शिकत आहेत. तसेच आजीबाईंनादेखील स्वतःचं नाव, पत्ता सांगता यावा, सध्या डिजिटल युग असल्यानं मोबाईलमधील सोशल मीडियासारखे अ‍ॅप सहज हाताळता यावेत, यासाठीदेखील त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. आज आजीबाईंना शिक्षण घेत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहताना दिसून येतोय. आजीबाईंची शाळा एक वरदान ठरत आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School for grandmothers thane district grandmothers aged 65 to 80 years study in schools chdc pdb