–केतकी जोशी
“मी माझ्या आईला घरगुती हिंसाचाराला बळी पडताना पाहिलं होतं. मला कधीही कमजोर किंवा कमकुवत म्हणवून घ्यायचं नव्हतं आणि त्यामुळेच मी माझ्या फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. मी दुर्लक्षित नाही, कमकुवत नाही हा आत्मविश्वास व्यायामामुळे, फिटनेसमुळे माझ्यात आला.” हे शब्द आहेत भारताच्या पहिल्या फिमेल फिगर ॲथलेट दीपिका चौधरी हिचे. मूळच्या आण्विक जैवशास्त्रज्ञ म्हणजेच मोलेक्युलर बायोलॉजिस्ट असलेल्या दीपिकानं पहिली व्यावसायिक महिला फिगर ॲथलेट म्हणून इतिहास घडवला आहे. २०१२ सालापर्यंत दीपिकाचं विश्व तिचं घर आणि तिची लॅबोरेटरी इतकंच मर्यादित होतं. त्यानंतर तिनं फिटनेससाठी जिम जॉईन केली. लहानपणापासूनच दीपिकाला व्यायामाची आवड होती. आता तिनं आपल्या फिटनेसकडे पुन्हा लक्ष देण्याचं ठरवलं आणि फिटनेससाठी म्हणून सुरू झालेला हा प्रवास बॉडीबिल्डींगच्या पॅशनपर्यंत येऊन पोचला.
फिटनेस म्हणजे फक्त घाम गाळणं आणि हवा तसा व्यायाम करणं असं नाही, तर असा व्यायाम करणं- जो तुमच्या तब्येतील मानवेल आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा करेल.
दीपिका चौधरी कोण आहे?
मूळच्या पुण्याच्या असलेल्या दीपिकाला लहानपणापासूनच खेळांची आवड होती. शाळेत असताना तिनं अनेक क्रीडा स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. ती अभ्यासातही हुशार होती. दीपिकानं पुण्याच्या एमईएस आबासाहेब गरवारे कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर तिनं राष्ट्रीय विषाणू संस्था, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून कामही सुरू केलं. २०१२ मध्ये तिचा फिटनेसचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी तिनं एका प्रशिक्षकांच्या हाताखाली मूलभूत प्रशिक्षण घेतलं. मात्र त्यानंतर आपल्याला बॉडीबिल्डींगमध्ये रस असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं त्यादृष्टीने मेहनत करायला सुरुवात केली.
आणखी वाचा-पाऊस, फुलं आणि बरंच काही…
तिची प्रगती बघून तिच्या प्रशिक्षकांनीच तिला पुण्यातील के ११ अकादमीमध्ये स्पोर्ट्स न्यूट्रीशनचा अभ्यासक्रम करण्यासाठी तयार केलं. तिथेच तिला बॉडीबिल्डींगचं जग किती विस्तारलं आहे आणि फिगर कॉम्पिटिशन्सविषयी समजलं. त्यानंतर तिला ‘शेरु क्लासिक (SHERU Classic)’ या भारतातल्या एकमेव व्यावसायिक बॉडीबिल्डींग स्पर्धेबद्दल माहिती मिळाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती दिल्लीला गेली. तिथे जगभरातून आलेल्या या क्षेत्रातील बऱ्याजणांशी तिची ओळख झाली. त्यातच एक होत्या अमेरिकेतून आलेल्या शॉनोन डे. शॅनोन यांनी दीपिकाला तिच्यासारखं शरीरसौष्ठव करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तिला फिगर ॲथलेट होण्यासाठी प्रेरणाही दिली. त्यानंतर दीपिकानंही मनाशी ठरवलं आणि त्यादिशेने प्रयत्न सुरू केले. अर्थात फिगर ॲथलेट म्हणजे फक्त बॉडी बिल्डींग नाही. यामध्ये स्नायू बळकट असण्याबरोबरच शरीरात झीरो फॅट असणं आवश्यक असतं. आणि हे वाटतं तेवढं हे सोपं नव्हतं.
दीपिकानं २०१३ मध्ये अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये फोर्ट लॉडिरेडल चषकाच्या पहिल्याच स्पर्धेत ‘फिगर’ विभागात अव्वल क्रमांक मिळवला. त्यामुळे तिचा हुरुप वाढला आणि तिच्या पुढच्या दैदिप्यमान करियरचा पाया रचला गेला. २०१६ मध्ये दीपिका आंतरराष्ट्रीय फिटनेस आणि बॉडीबिल्डींग फेडरेशनच्या स्पर्धेत प्रो स्टेटस मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. २०१७ मध्ये दीपिका ॲरनॉल्ड क्लासिकसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. त्यानंतर करियरमधल्या पुढच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये गेली. तिथं तिच्या आदर्श शॅनॉन डे यांनी सुरू केलेल्या बॉम्बशेल फिटनेस केंद्रात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. हे प्रशिक्षण महाग होतं, तिला प्रायोजकांची मदतही मिळत नव्हती. पण सगळ्या अडचणींवर मात करत तिच्या मार्गाने चालत राहिली आणि भारतातली पहिली महिला फिगर ॲथलेट होण्याचा मान तिनं मिळवला.
भारतातही बॉडीबिल्डींगचं करियर वाढतंय. तरुण मुलीही आवडीने या क्षेत्राकडे वळताना दिसतायत, पण सरकारकडून अजूनही गांभीर्यानं याकडे लक्ष दिलं जात नाहीये याची दीपिकाला खंत वाटते. दीपिकाचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स आहेत. तिथे ती तिचा फिटनेस प्रवास कसा झाला हे ती शेअर करत असते. जिममध्ये वजन उचलणं म्हणजे फिटनेस असं दीपिका मानत नाही. दीपिकाचा शास्त्रज्ञ ते व्यावसायिक बॉडीबिल्डर हा प्रवास म्हणजे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रवास तसंच तिचं खेळाप्रती असलेलं प्रेम, निष्ठा यांचा हा पुरावा आहे. दीपिकामुळे कितीतरी महिलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळालीच, पण त्याचबरोबर तिनं कितीतरीजणींना आपले आरोग्य आणि फिटनेसकडे प्राधान्याने लक्ष देण्यासाठीही प्रवृत्त केले आहे.
ketakijoshi.329@gmail.com