रविवार असल्याने सईला सुट्टी होती. जरा निवांत उठली, तर बाबांनी हाक मारली, ‘बेटा आवरून घे, पाहुणे येतायत घरी’. सईला मनात वाटलं, अरे यार रविवार आला की, सुट्टीचा दिवस या कांदेपोह्याच्या कार्यक्रमात जातो. बाबांना ‘ओके’ म्हणत सईने आवरायला घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई २५ वर्षांची तरुणी, एका कॉर्पोरेट कंपनीत कामावर होती. लग्नाचं वय झालंय, त्यामुळे घरचे मुलीसाठी मुलगा शोधत आहेत. त्यात एक स्थळ सांगून आलं, घरच्यांनी जुजबी माहिती घेतली आणि योग्य वाटल्याने ‘रविवारी घरी या’ असं कळवलं. सईला पाहायला आलेला हा दुसरा मुलगा होता. तसं बाबांनी सांगितलं होतं की मुलगा थोडा दूरचा होता, पण कुटुंब चांगलं आहे, सुशिक्षित आहे. शिवाय मुलाबद्दलही बऱ्याच चांगल्या गोष्टी कानावर आल्याने सई जरा निवांत होती. तिने विचार केला की, मुलगा चांगला असेल तर तो किती दूर राहतो याने फारसा फरक पडणार नाही.

हेही वाचा… अवखळ, बिनधास्त ते परिपक्व व्यक्ती…. हा प्रवास मोलाचा!

पाहुणे दुपारी १ वाजता येतील, असं बाबांनी सांगितलं होतं. त्यामुळे आई-बाबा, भाऊ-वहिनी आणि सईने आवरलं होतं. जवळच्या एका नातेवाईकांना सांगितलं होतं, त्यामुळे तेही आले होते. पाहुण्यांची वाट पाहणं सुरू होतं. पण ते काही १ वाजता आले नाहीत. वाट पाहून सगळे कंटाळले होते, रविवार वाया गेल्याने सईदेखील चिडचिड करत होती. अखेर ४ वाजता पाहुणे आले. चहा झाला आणि मुलगा-मुलगी एकमेकांशी बोलून घ्या, असं सांगण्यात आलं.

नातेसंबंध- बॉयफ्रेंड ‘इंटिमेट’ होण्याचा आग्रह करतोय?

सई आणि तो मुलगा दोघांना बाजूच्या खोलीत जाऊन बोला, असं सांगण्यात आलं. दोघेही गेले, सईला वाटलं की मुलगा काहीतरी बोलेल, पण हाय, हॅलो, नमस्कार किंवा काहीच न बोलता हसू लागला आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, असं म्हणाला. त्याचं वागणं बघून सई गोंधळली. मग सईने तिला विचारायचे होते ते प्रश्न विचारले. त्याने फक्त शिक्षणाबद्दल विचारलं आणि हसतच राहिला. सईचं बोलणं झालं, ती म्हणाली, ‘मला विचारायचं होतं ते विचारून झालंय’. त्यावर ‘अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या, नंतर अरे हे विचारायचं राहून गेलं, असं नको व्हायला’ असं तो तीन वेळा म्हणाला. सईला त्याचं वागणं प्रचंड खटकत होतं, पण तिने संयम ठेवला आणि खोलीतून बाहेर पडली.

तिथून बाहेर आल्यावर त्याच्या वागण्याबद्दल विचार करत होती. हा एकटाच असा विचित्र का हसत होता, या प्रश्नाचं उत्तर समजणं तिच्यासाठी कठीण झालं होतं. तसेच जवळपास ७ वर्ष नोकरी करणाऱ्या २७ वर्षाच्या तरुणाला समोरच्याशी कसं बोलावं इतकेही मॅनर्स नसावे, याचं आश्चर्यही वाटत होतं. आता हा सगळा प्रसंग घडल्यानंतरही त्या मुलाने लग्नाला होकार दिला आणि मुलाकडचे तिला तिचं उत्तर विचारू लागले. पण सई म्हणाली की ‘आम्ही तुम्हाला नंतर कळवू’. त्यावर त्यांचा लगेचचा हट्ट होता, पण तिने ऐकलं नाही.

हेही वाचा… रंगाच्या भिंती तोडू पाहणाऱ्या सावनीची चूक तरी काय?

पाहुणे निघून गेल्यानंतर आईने विचारलं की मुलगा कसा वाटला. खरं तर सईच्या दादालाही काही वेळ केलेल्या निरीक्षणानंतर त्याचं वागणं खटकलं होतं. त्यामुळे सईला मत विचारलं, तिने घडलेला प्रकार सांगितला. दादानेही त्याला खटकणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि अशा रितीने सईच्या कुटुंबाने मुलाला नकार कळवला.

मैत्रिणींनो, हा होता सईबरोबर घडलेला प्रकार. ही काल्पनिक कथा नाही. लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींनाही मुलांचे असे विचित्र अनुभव येतात. अशा परिस्थितीत तुम्हाला बोलायला, भेटायला वेळ मिळतो, त्या वेळेत समोरच्याला प्रश्न विचारून, त्याचं नीट निरीक्षण करून त्याच्या स्वभावाबद्दल तुम्हाला अंदाज येऊ शकतो. नाहीतर हल्ली खोटं बोलून फसवणूक करणारे कमी नाहीत!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Searching boy for marriage indian wedding rituals real life experience of woman met guy in arranged marriage hrc