हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव. हृदयात होणारा लहानसा बिघाडही त्या व्यक्तीचे जीवन अडचणीत टाकू शकतो. त्यामुळेच प्रत्येक मनुष्याचे हृदय हे बरगड्यांच्या पिंजऱ्यात अतिशय सुरक्षित राहील अशी शरीररचना असते, पण जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे, अनिवार्य असणारे हेच हृदय जर कोणी बॅगेत घेऊन फिरत असेल तर… सेल्वा हुसैन ही अशी पहिली स्त्री आहे, जी तिचे हृदय पाठीवरच्या बॅगेमध्ये घेऊन फिरते आहे, गेली ६ वर्षं.

आश्चर्य वाटले ना ऐकून!

सेल्वा आणि तिच्या बॅगेतील हृदयाचा प्रवास सुरू झाला हा साधारणत: २०१७ पासून. ब्रिटनमधील एसेक्स येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय सेल्वा हुसैनला एक दिवस श्वासोच्छवास घेण्यास अतिशय त्रास होऊ लागला. तिने कसेबसे एसेक्स, क्लेहॉल येथे तिच्या फॅमिली डॉक्टरांचा दवाखाना गाठला. तिची स्थिती पाहून त्यांनी तिला स्थानिक रुग्णालयात पाठवले. तिला गंभीर हृदयविकाराचा त्रास असल्याचे तिथे निदान करण्यात आले. तिला कार्डिओमायोपॅथी हा हृदयाच्या स्नायूंचा आजार झाल्याचे तज्ञांनी सांगितले.

प्राथमिक औषधोपचारांनंतर तिला जगप्रसिद्ध हेअरफिल्ड रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे तिला आणि पर्यायाने तिच्या हृदयाला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सेल्वाचे हृदय पूर्ण निकामी झाल्याने ते काढून ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक झाले होते. मात्र, तिच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे हृदय प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. पती अल हुसैनने सेल्वा यांची संमती घेऊन शल्यचिकित्सकांनी तिचे निकामी झालेले नैसर्गिक हृदय काढून त्याच्या जागी एक विशेष हृदयाचे काम करणारे युनिट लावले.

हेही वाचा… ‘लेझी गर्ल जॉब’… मनासारखं आयुष्य, काम आणि पैसा

सेल्वाला बसविण्यात आलेले कृत्रिम हृदय एका अमेरिकी कंपनीने बनवले असून त्याची किंमत ८८.७२ लाख रुपये इतकी आहे. हे उपकरण वापरणारे हेअरफिल्ड रुग्णालय हे ब्रिटनमधील एकमेव आहे. सेल्वाची शस्त्रक्रिया हेअरफिल्डचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रमुख आंद्रे सायमन यांच्या मदतीने प्रसिद्ध डॉ. डायना गार्सिया सेझ यांनी केली.

आता ती बॅगच सेल्वाची प्रत्येक क्षणाची मैत्रीण झाली आहे. त्या बॅगेचे वजन साधारणत: ६ किलो इतके आहे. त्यात दोन बॅटरी, एक इलेक्ट्रिक मोटर आणि एक पंप आहे. बॅगेला जोडलेल्या दोन मोठ्या प्लास्टिकच्या नळ्या तिच्या पोटाद्वारे तिच्या शरीरात प्रवेश करतात आणि तिच्या छातीपर्यंत जातात. या यंत्राच्या सहाय्याने तिच्या छातीच्या पोकळीत हवेचे दोन फुगे भरले जातात, ते तिच्या शरीराभोवती रक्त ढकलण्याची क्रिया करतात. नैसर्गिक हृदयाच्या झडपांप्रमाणे हे काम चालते. कृत्रिम हृदय प्रति मिनिट १३८ ठोके या प्रमाणात कंप पावते आणि त्यामुळे तिच्या शरीराला रक्त पुरवठा होतो. सेल्वा बाहेर जाते तेंव्हा तिच्या हृदयाचा जामानिमा बॅगेत घेऊन फिरते. घरी असेल तेव्हा तो घरातच तिच्या जवळपास काढून ठेवण्यात येतो.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: बाल्कनीमधील हसरी बाग

सेल्वाला तिचे ‘हृदय बॅगेत’ असण्याची आणि त्याद्वारे दिनचर्या सुरू ठेवण्यासाठी सवय व्हायला काही महिने गेले. पण पती अल, किंवा इतर कोणी मदतनीस यांच्या सततच्या सहकार्याने ती बाहेरही पडू शकते आणि बऱ्याच अंशी सामान्य आयुष्यही जगते आहे.

आत्तापर्यंत आपत्कालीन परिस्थिती आलेली नाही, मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत, सेल्वाला बॅकअप मशीनशी जोडण्यासाठी तिच्या पतीकडे किंवा मदतनीसाकडे फक्त ९० सेकंदाचीच मुदत असेल. त्यामुळे बॅग तिची जीवनवाहिनी झाली आहे. ब्रिटनमध्ये २०११ मध्ये झालेल्या यशस्वी प्रयोगानंतर फक्त एकच व्यक्ती सेल्वा यापूर्वी कृत्रिम हृदयासह घरी परतली आहे. विज्ञानाच्या प्रगतीममुळे एका जीवाला नवं आयुष्य मिळालं ही किती महत्वाची घटना आहे.

Story img Loader