आज स्त्रिया उद्योग जगतातही आघाडीवर दिसताहेत. अनेक यशस्वी व्यवसाय आणि ब्रँड्सच्या मागे एक स्त्री आहे! नवीन स्त्रिया उद्योग क्षेत्रात उतरू पाहात आहेत. स्वतःच्या अंगचे गुण, कौशल्य, कला या विविध गोष्टींचं व्यवसायात कसं रूपांतर करता येईल, याचा विचार करताहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेषतः करोना काळापासून घरात राहूनच काही व्यवसाय सुरू करता येईल का, असा प्रयत्न अनेक स्त्रियांनी केला. काही जणी त्यात यशस्वीदेखील झाल्या आहेत. ज्या आधीपासूनच उद्योग क्षेत्रात होत्या, त्या आता व्यवसायवृद्धीसाठी पावलं उचलताहेत. हे चित्र आशादायकच.

हेही वाचा… चौथ्या सीटसाठी वादावादी कशाला? ‘लोकल’ नियमांची खरच गरज आहे का?

व्यावसायिक गणितं उलगडताना, त्यातली आव्हानं आणि आघाड्या सांभाळताना स्त्रियांना स्वतःचं वैयक्तिक अर्थानियोजन आणि आर्थिक ताळमेळ कसा साधता येईल ते पाहू या!

१) ‘कॅश फ्लो’ची पूर्ण माहिती आणि त्यावर नियंत्रण ठेवा –

प्रत्येक व्यवसायाच्या स्वरूपानुसार ‘कॅश फ्लो’ हा असतोच. यात नफा, कर्जाचे हफ्ते, पगार, मार्केटिंग (विपणन), जागेचं भाडे इ गोष्टी येतात.

व्यावसायिक उलाढाली करताना तुम्ही या ‘कॅश फ्लो’ची माहिती वेळोवेळी घ्या. आवक आणि जावक यांची योग्य माहिती जर तुम्हाला असेल, तर तुम्ही व्यावसायिक आणि वैयक्तिक अर्थनियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल.

२) व्यावसायिक आणि वैयक्तिक ‘कॅश फ्लो’ वेगवेगळे ठेवा –

बरेचदा व्यावसायिक आर्थिक व्यवहार, बँक खाती, देणी, गुंतवणुकी इत्यादींची वैयक्तिक अर्थव्यवहाराबरोबर सरमिसळ होते. यात होतं असं, की अनेक व्यावसायिक स्त्रियांना उत्पन्न आणि नफ्याचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोन्ही ‘कॅश फ्लो’ वेगवेगळे ठेवा.

म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अर्थानियोजनासाठी तुम्ही वास्तवाचं भान ठेवून मग निर्णय घेऊ शकाल.

३) आपत्कालीन निधी (contingency fund) –

व्यावसायिक उत्पन्न स्थिर नसतं. प्रत्येक व्यवसायाला स्पर्धेत टिकून राहताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी तुम्हाला आपत्कालीन निधी महत्त्वाचा आहे.

तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मासिक खर्चासाठी किमान १८ ते २४ महिने पुरेल इतकी रक्कम तुमचा आपत्कालीन निधी म्हणून असली पाहिजे.

हा निधी तुम्ही सेव्हिंग अकाऊंट, शॉर्ट टर्म बँक फिक्स्ड डीपॉजीट, लिक्विड डेट फंड इत्यादींमध्ये गुंतवू शकता. यामुळे तुमचा पैसा तुम्हाला गरजेच्या वेळी लगेच काढून घेता येईल.

४) टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या –

‘जीवन विमा’ हा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. हा विमा घेण्याचा मुख्य हेतू म्हणजे, या विम्यामुळे, आपल्यानंतर, आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचं पुढील आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनानं जगता आलं पाहिजे.

आज अनेक प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. परंतु त्यात, ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ ही पॉलिसी हा उद्देश सफल करते. ढोबळमानानं, तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान २० पट इतक्या रकमेची टर्म इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही घ्यावी.

तसंच ‘हेल्थ इन्शुरन्स’ (आरोग्य विमा) पॉलिसी महत्त्वाची. वाढत्या आरोग्यविषयक समस्या, वाढत जाणारे वैद्यकीय खर्च यावर आर्थिक मदत (सपोर्ट) म्हणून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काम करते.

तुम्ही वैयक्तिक अथवा कौटुंबिक- फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेऊ शकता.

५) वैयक्तिक उद्दिष्ट आणि ध्येयं ठरवा –

तुमच्या मनात तुमच्या व्यवसायाची उद्दिष्ट आणि ध्येयं जरी निश्चित असली तरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सध्या साध्य करायची ध्येयं निश्चित करा.

यामुळे तुम्हाला योग्य त्याप्रकारे गुंतवणूक करणं सोपं जाईल.

६) नियमित गुंतवणूक करा –

नियमित योग्य गुंतवणूक आपलं ध्येय साध्य करायला मदत करते.

तुमच्या ध्येयानुसार, गुंतवणूक कालावधी नुसार आणि जोखीम क्षमतेनुसार तुम्ही गुंतवणुकीचं साधन आणि पद्धत निश्चित करू शकता.

७) वैयक्तिक आर्थिक नोंदी ठेवा आणि वेळोवेळी आढावा घ्या –

तुमचं वैयक्तिक बँक खातं, व्यवहार, कर्ज हफ्ते, मालमत्ता, नॉमिनेशन, केलेल्या गुंतवणुकी, इन्शुरन्स पॉलिसी, इत्यादींची नोंद ठेवा. त्या नोंदी वेळोवेळी अपडेट करत जा.

यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचा , तुमच्या ‘लाएबिलिटीज’चा (आर्थिक देणी वा दायित्व) वेळोवेळी आढावा घेता येईल.

अशा प्रकारे वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत नेहमी सजग रहा. मग तुमचा उद्योग- व्यवसाय तर छान चालायला मदत होईलच, पण वैयक्तिक आर्थिक आघाडीही चांगली राहील!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

priya199@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven important financial tips for women who venturing into business dvr
Show comments