प्रश्न- लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य? जर योग्य असेल तर कसे? आणि जर अयोग्य असेल तर कसे?
उत्तर – मला वाटतं, आधी व्हर्जिनिटीचा अर्थ काय हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात नेमका कोणता अर्थ आहे आणि एक तज्ज्ञ म्हणून मला माहीत असलेला अर्थ काय हे समजून घ्यायला हवे. मी एक अर्थ समजून उत्तर देईन आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती त्याचा दुसराच अर्थ समजून त्याचं उत्तर ऐकेल़ तर अशी चूक होऊ नये म्हणून व्हर्जिनिटी म्हणजे काय असते हे वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घेऊ.
स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी एक कौमार्य पडदा (म्हणजेच हायमेन) असतो. असं मानलं जातं, की ज्या वेळेला स्त्री शारीरिक संबंध ठेवते, त्या वेळेला हा पडदा फाटला जातो आणि तिची व्हर्जिनिटी वा कौमार्य भंग पावतं; पण हा एक जुना विचार आहे. याला विज्ञान अजिबात मानत नाही. अनेक स्त्रियांना जन्मजात तो पडदा नसतोच, मग त्या व्हर्जिन नसतात का? काहींचा पडदा इतका तलम आणि बारीक असतो की लहानपणी तो खेळताना, पळताना, उड्या मारताना फाटला जातो. तर याचा अर्थ तिची व्हर्जिनिटी गेली का? असंही असू शकतं, की तो पडदा इतका लवचिक असतो, की तो शारीरिक संबंध करूनही फाटला जात नाही. या तिन्ही गोष्टी पाहिल्या की तो पडदा आहे किंवा नाही याच्यावरून ती व्हर्जिन वा कुमारी आहे की नाही हे कसं ठरवणार? म्हणून आज विज्ञान व्हर्जिनिटी म्हणजे कौमार्य पडदा फाटणं, असं मानत नाही. आजही अनेक जमातींमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीला रक्तस्राव झाला नाही तर ती मुलगी कुमारी नव्हती, असा शेरा मारून तिला त्या त्या जमातींच्या संस्कृतीप्रमाणे वागवलं जातं.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’
आता दुसऱ्या अर्थाकडे येऊ. तुम्हाला व्हर्जिनिटी वा कौमार्य गमावणं म्हणजे लग्नाआधी संबंध ठेवावेत की ठेवू नयेत, हे विचारायचं असेल तर ते परिस्थितीजन्य असू शकतं. समजा, एखाद्या मुलीचं वय १६ आहे आणि मुलगा १८ वर्षांचा असेल तर तसे संबंध ठेवणं योग्य कसं असेल? किंवा एखाद्या मुलीला तिच्यापेक्षा अतिशय मोठ्या वयाची व्यक्ती संबंध ठेवण्यास बळजबरी करत असेल तर तेही योग्य ठरणार नाही. इथे वयाची, नात्याची माहिती असेल तर उत्तर अधिक स्पष्टपणे देता येईल. कोणत्याही संदर्भाशिवाय या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य ठरत नाही.
दुसरा मुद्दा, समजा, तुम्ही योग्य वयातले आहात; पण नात्यात कमिटेड आहात का? या संबंधातून ती मुलगी गरोदर राहिली किंवा त्यातून तिला एचआयव्हीसारखा आजार झाला तर ती जबाबदारी कुणाची? त्यामुळे व्हर्जिनिटी सांभाळायची की नाही याचं हो किंवा नाहीमध्ये उत्तर देता येणारच नाही; पण त्याचबरोबर असे संबंध ठेवणं हे सरसकट चुकीचं वा नैतिकदृष्ट्या अयोग्य असंही आज आपण म्हणू शकत नाही.
आणखी वाचा : लैंगिक समस्या आणि व्हायग्रा
ज्या शारीरिक संबंधांची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता आणि जबाबदारी घेण्याचे तुमचे वय आहे, तुम्ही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान आहात. ज्या शारीरिक संबंधातून निर्माण होणाऱ्या परिणामांची तुम्हाला कल्पना आहे आणि जबाबदारी घेण्यास तुम्ही सक्षम असाल, तर लग्नाच्या आधीही संबंध ठेवण्यास हरकत नाही. अर्थात हे माझे तांत्रिकदृष्ट्या उत्तर झाले; पण जबाबदारी म्हणजे काय हेही अनेकांना कळत नाही. ‘रिस्पॉन्सिबल सेक्सुअल बिहेवियर’ हे शब्द मी नेहमी वापरत असतो. कारण याचे परिणाम काय होऊ शकतात हेही अनेकांना माहिती नसते.
अनेकांना केवळ गरोदर राहाण्याची किंवा एखादा रोग होण्याची भीती वाटते. यात भावनिक मुद्दाही असतो, तो विचारात घेतलाच जात नाही. तो तिच्यावर हे संबंध लादतोय का? तिच्यावर दबाव टाकला जातोय का? दोघांचीही इच्छा आहे का? त्यातून नात्यांवर, भावसंबंधांवर होणाऱ्या परिणामांची त्यांना कल्पना आहे का? त्यांची ते जबाबदारी घेऊ शकत आहेत का? या सगळ्या प्रश्नांचा विचार होणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीला धरून आहे की नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे.
आणखी वाचा : लैंगिक समस्या-प्रश्नोत्तरे : छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा
लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर.
सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.