मुला-मुलींना शाळेत योग्य प्रकारे ‘सेक्स एज्युकेशन’ मिळालं नाही तर ते कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा हल्ली तर अगदी दहावी-बारावीमध्येसुद्धा मित्र-मैत्रिणींकडून त्याची माहिती घेतात. जी बहुतांशी गूगल सर्च करून किंवा ऐकीव माहितीवर आधारित असते. सेक्सविषयक प्रश्न घेऊन माझ्याकडे अशीही काही जोडपी आली होती ज्यांनी ‘पॉर्नोग्राफी’ पाहिली आणि त्यातील चित्रणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम झाला. इतका, की त्यामुळे त्यातल्या तरुणींच्या मनात सेक्सविषयक भीतीच बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॉर्नोग्राफी बघणाऱ्यांच्या हे लक्षातच येत नाही की ते सगळं आर्टिफिशियल वा खोटं असतं, नाटक असतं. जसं कुठल्याही चित्रपटाचं चित्रीकरण होतं तसंच अशा फिल्मचंही ठरवून चित्रीकरण होतं. अशा फिल्मची निर्मितीच काही क्षणांचा आनंद घेण्यासाठी असते. बघणाऱ्याला उत्तेजना येण्यासाठी असते. प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे, की अशा प्रकारच्या फिल्मस् बघून वैवाहिक नातं अजिबात घट्ट होत नाही. एकमेकांना समजून घ्यायची जी क्षमता असते ती अशा फिल्म बघून वाढत नाही.

आपण कुठल्याही गोष्टीवर बोलताना पुरेशी माहिती घेऊन बोलत असतो. तसंच शरीरसंबंधांचं आहे. त्याविषयी आपल्या जोडीदाराशी बोलताना आधी आपल्या शरीराबद्दल आणि त्यांच्या शरीराबद्दलही आपल्याला पूर्ण माहिती असणं महत्त्वाचं असतं. आणि त्याबद्दल सुरक्षित वाटणं जास्त महत्त्वाचं असतं. आपण जोपर्यंत स्वतःच्या शरीराला ओळखत नाही, आपल्या वेगवेगळ्या अवयवांना भलतीच, वेगळीच नावं देण्यापेक्षा रूढ नाव देऊन बोलणं जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत आपणच आपल्या शरीराबद्दल कम्फर्टेबल नाही, असं होतं. मग आपल्या जोडीदाराबरोबर त्याविषयी कसं बोलणार? खरं तर आई-वडिलांनीच लहानपणापासूनच मुलांना प्रत्येक अवयवाची ओळख त्या त्या नावाने करून देणं गरजेचं आहे. त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. स्तन, ढुंगण हे शब्द सहजपणे वापरायला हवेत. मुलांना सुसूची जागा दाखवायला हवी. त्यात चुकीचं काही नाही. मुलं लहानपणीच जर आपल्या शरीराविषयी जागरूक असतील, प्रत्येक अवयवाचं काम त्यांना माहीत असेल तर मोठं झाल्यावर त्याचा बाऊ वाटण्याचं काहीच कारण नाही.

हेही वाचा… आहारवेद: खोकल्यावर गुणकारी मिरे

म्हणूनच शालेय वयातच मुलांना आपल्या आणि आपल्यापेक्षा भिन्न लिंगाच्या व्यक्तीच्या शरीराची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन, सेक्सुआलिटी एज्युकेशन देणं गरजेचं आहे. त्याचे फायदे आहेत. एक तर मुलांना योग्य ती माहिती मिळते. तसेच कोणत्या वयात, कोणत्या गोष्टी करायच्या असतात, त्यातली जबाबदारी कोणती, ती कशी निभवायची याचीही माहिती अशा शिक्षणातून मिळत असते. चुकीचे लैंगिक संबंध किती घातक असतात, त्याचा मनावर, शरीरावर कसा वाईट परिणाम होतो हेही या शिक्षणातून शिकवले गेले तर ‘नाही म्हणजे नाही’ म्हणायला मुलं शिकू शकतात.

हेही वाचा… ‘घूमर’नं मला आनंदच दिला!’ – सैयामी खेर

या ज्ञानाचा लग्नानंतरच्या शरीरसंबंधांमध्ये खूप फायदा होतो. मुला-मुलींनी जेव्हा स्वतःचं शरीर ओळखलं असतं तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टींने आनंद मिळतो, कोणत्या गोष्टीने नाही हे त्यांना मोकळेपणाने सांगता येतं. त्यातून वैवाहिक नात्यांमध्ये एक उघड साधेपणा येऊ लागतो. याशिवाय जोडीदारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचाही अंदाज बांधता येतो. त्यामुळे एखाद्याची इच्छा नसली तर ती समजून घेऊन तिथं जबरदस्ती वा भांडण करण्याची गरज उरत नाही. शरीरसंबंधासाठी आणि मन जुळायला हवी असतील तर एकमेकांबद्दल आदर असावा लागतो. विश्वास असावा लागतो.

आणि इतकं करून जरी लग्नापूर्वी आपल्या शरीराबद्दल काही शंका असल्या तर डॉक्टरांना किंवा तज्ञ डॉक्टरांना भेटा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. अशा भेटींसाठी जोडप्याने एकत्र जाणं कधीही चांगलं असतं. जर ते शक्य नसलं तर आपण स्वतः जाऊन आपल्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करून घ्यायला हवं, हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

(डॉ. नीलिमा देशपांडे स्त्रीरोगतज्ञ असून सेक्स थेरपिस्ट आहेत.)

deshnp66@gmail.com

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex education awareness should be created among teenagers about body parts especially sexual organs dvr