प्रश्न: सहा वर्षांपूर्वी माझा प्रेमविवाह झाला. आजही माझ्या पत्नीवर माझे खरोखरच खूप प्रेम आहे. पण अलीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक स्त्रियांशी माझा संपर्क येतो. त्यातील काही सुडौल स्त्रियांबद्दल अनेकदा माझ्या मनात सुप्त आकर्षण निर्माण होतं. हे आकर्षण प्रामुख्याने शारीरिक असतं. मला वाटणाऱ्या या भावना मी आत्तापर्यंत कधीही कुणापाशी व्यक्त केलेल्या नाहीत. माझ्या पत्नीलाही याची कल्पना नाही. पण अनवधानाने निर्माण होणाऱ्या या आकर्षणामुळे मलाच माझ्याबद्दल घृणा वाटू लागली आहे. आपण आपल्या प्रेमळ पत्नीशी मनाने एकनिष्ठ नसल्याची भावना माझ्यात वाढत चालली असून ती मला खूप त्रास देते आहे. काय करावं सुचत नाही…
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू?
उत्तर : पुरुषाला वाटणारं स्त्रीबद्दलचं आकर्षण ही निसर्गाने रचलेली एक व्यवस्था आहे. त्यामुळे असं आकर्षण वाटणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. असं होत नसेल तरच नवल. या प्रक्रियेकडे अभ्यासू वृत्तीने पाहिल्यास त्यामुळे येणारी आत्मघृणेची भावना कमी होईल. शिवाय नुसतं वाटणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात फरक आहे. तुमचा संयमच महत्वाची कामगिरी करतो आहे. त्यामुळे स्वताबद्दल घृणा वाटणे किंवा त्याबद्दल आत्मक्लेश करून घेणे तुमच्या मनावर दूरगामी परिणाम करू शकतो.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य?
तुमचं तुमच्या पत्नीवर जे प्रेम आहे ती मानसिक घटना आहे. प्रेमाचा हा भावबंध शरीरापलीकडच्या विश्वातला आहे. शारीरिक आकर्षण व भावनिक प्रेमसंबंध या दोन वेगवेगळ्या पातळीवर, पण एकाच वेळी तुमच्यात घडत असलेल्या विभिन्न घटना आहेत. या दोन घटनांची सांगड घालण्याचा प्रयत्न करू नका; विफल ठरेल. शरीराला शरीराच्या गुणधर्माप्रमाणे चालू द्या व मनाला मनाच्या गुणधर्माने. तुमच्या जीवनात जे घडतंय तसं अनेकांच्या जीवनात घडताना दिसतं. असं घडण्यात गैर काहीच नाही; पण याबद्दलचा न्यूनगंड बाळगणं मात्र नक्कीच घातक ठरू शकेल. स्वत:बद्दल वाटणारी घृणा हळूहळू तुमच्यातील प्रेमालाही कलुषित करेल. असं होण्याआधीच या घृणेला दूर सारा.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’
अभ्यासकाच्या नजरेने मनात आणि शरीरात घडणाऱ्या या घटनांचं निरीक्षण करतच तुमच्या जाणिवा परिपक्व होतील व तुमच्या प्रेमालाही खऱ्या अर्थी प्रौढत्व येईल. शरीर निष्पाप आहे. ते आपल्या नियमानुसार चालतं. त्याचा स्वीकार करा. शरीर व मनातील क्लेश दोघांना कमकुवत बनवतो. दोघांनाही आपापल्या गुणधर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य द्या. घृणामात्र फेकून द्या.
आणखी वाचा : लैंगिक समस्या आणि व्हायग्रा
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.