शिल्पा चिटणीस जोशी
“ डॉक्टर आमचं लग्न होऊन आता सहा महिने झालेत, पण अजून आमच्यात शारीरिक संबंध आलेले नाहीत. मी थोडा जरी प्रयत्न केला तरी ही पूर्ण शरीर आकसून घेते आणि रडायला लागते. मग मीच माघार घेतो. असंच चाललंय गेले कित्येक दिवस. कंटाळलो आहे मी आता.” समोर बसलेल्या जोडप्यातला तरुण हताश झाला होता आणि त्याची तरुण बायको चेहऱ्यावर अपराधी भाव घेऊन मान खाली घालून बसली होती. तिला बोलतं करायला खूप वेळ लागला, पण नंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.
ही तरुणी एका अत्यंत कर्मठ घरात लहानाची मोठी झाली होती. वयात आल्यापासून तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली होती. मासिक पाळी, स्त्रीचं शरीर याबद्दल पद्धतशीरपणे नकारात्मकता निर्माण करण्यात आली होती. पुरुषाला कधीही अंगाला हात लावू द्यायचा नाही, अशी दहशतच खूप घरांमध्ये मुलींच्या मनात निर्माण केली जाते. स्त्री पुरुष संबंधांची हवाही लागू दिली जात नाही. हिच्या घरी हेच होत होतं. हिचे आईवडीलही वेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचे. अशा वातावरणात वाढलेली मुलगी कोणतेही समुपदेशन न होता लग्न झाल्यावर लैंगिक अनुभवांना सामोरी कशी जाणार?
आणखी वाचा-फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर चक्क ‘एआय जनरेटेड’ मॉडेल!
अशी परिस्थिती आपल्या समाजात खूप घरांमध्ये आजही दिसते. पती-पत्नी कुटुंबासमोर एकमेकांशी कायम सुरक्षित अंतर राखून वावरतात. पतीने साधा खांद्यावर हात ठेवला तरी पत्नी तो झटकून टाकते. त्यांचे लैंगिक आयुष्य मुलांपासून लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. पतीपत्नीचे खासगी आयुष्य खासगी राहणे आवश्यक आहेच, पण घरात वावरताना होणारे सहजस्पर्श, कधीतरी प्रेमाने जवळ घेणे यामध्ये व्यक्त होणारा जिव्हाळा पतीपत्नींच्या तसेच त्यांच्या मुलांचं भावविश्व समृद्ध करणारा असतो. याची जाणीव आपल्या संपूर्ण समाजात होणे आवश्यक आहे. पालकांच्या लैंगिक जीवनाचे मुलांवरही दूरगामी परिणाम होतात, याची अनेक पालकांना कल्पना नसते. कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी कधीही बोलल्या गेल्या नाहीत तरी मुलांना त्या नकळत जाणवत असतात. त्यामुळे निरोगी लैंगिक जीवन असणाऱ्या पालकांची मुले मोठी झाल्यावर त्यांचे कामजीवन निरामय असण्याची शक्यता खूप जास्त असते.
हस्तमैथुन करणे अत्यंत नैसर्गिक आहे, स्त्री-पुरुष अगदी दोघांसाठीही. हे सगळे तज्ञ सांगून सांगून थकले तरी याबद्दलच्या गैरसमजुती समाजात कमी होत नाहीत. हस्तमैथुनामुळे लैंगिक इच्छेचे नैसर्गिकरीत्या दमन होते आणि ती व्यक्ती इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकते. आपल्याकडे अजूनही मुलं हस्तमैथुन करताना सापडली तर बेदम मारहाण वगैरे अत्यंत चुकीच्या आणि धोकादायक गोष्टी होताना दिसतात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विशिष्ट वयानंतर पालकांनी त्याच्या पाल्याची प्रायव्हसी अर्थात खासगीपण जपायला हवं. त्यांच्या खोलीत जाताना दार वाजवून जाणे हा शिष्टाचार जपायला हवा. तरुण पिढीमध्ये मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप याचा मुक्त वापर असल्यामुळे पोर्नोग्राफी बघणे दुर्दैवाने खूप लहान वयात सुरू होते आहे. याचे अनेक दुष्परिणाम त्याच्या पुढच्या लैंगिक आयुष्यावर होतात. त्यामुळे वेळीच मुलांशी मोकळेपणाने बोलून हे पोर्नोग्राफीचे व्यसन वाईट असते हे समजावून सांगणे गरजेचे आहे. हे सगळ्या पालकांना जमेलच असं नाही, अशा वेळी याबद्दलचे लेख, पुस्तके, कार्यशाळासुद्धा उपलब्ध असतात त्याचा फायदा करून घेता येईल. वयात आलेल्या मुलामुलींमध्ये परिपक्वतेचा खूपच अभाव असतो आणि भावनांचा गोंधळ आणि आवेग दोन्ही खूप जास्त. त्यामुळे या अजाण वयात काही चुका होऊ शकतात.आजकाल डेटींग वगैरे गोष्टी शालेय वयातच सुरू होत आहेत. हा सगळा बदललेल्या काळाचा महिमा आहे, तो आपण थांबवू शकत नाही, पण मुलांना विश्वासात घेऊन हे मैत्री करायचं वय आहे, प्रेम करायचं नाही हे समजावून सांगू शकतो. मुलामुलींनी एकेकटे फिरायला न जाता ग्रुपने बाहेर जावे, कोणा एकाशी जास्त जवळीक वाढवण्याची ही वेळही नाही आणि वयही नाही हेही मुलांना पालक पटवून देऊ शकतात. त्यातूनही काही चूक झालीच तर “आधी माझ्याकडे ये, मी तुझ्या बरोबर कायम आहे, ” हा विश्वास पालकांनी मुलांना द्यायला हवा नाहीतर एक चूक सावरण्यासाठी आणखी पुढच्या भयंकर चुका केल्या जाण्याची आणि शोकांतिका घडण्याची शक्यता असते.
म्हणूनच मुलं जसजशी मोठी होतील, तेव्हा तेव्हा त्यांच्याशी लैंगिक विषयांवर बोलत राहणे गरजेचे आहे यामुळे त्यांची मानसिकता निकोप राहू शकते. एका बाजूला भारतीय पालक अजूनही त्यांच्या मुलांची लैंगिकता स्वीकारू शकत नाहीयेत. दुसरीकडे नव्या पिढीमध्ये लहान वयातच लैंगिक संबंध इतके सर्रास प्रस्तापित होत आहेत की त्यामुळे समाजात एक विरोधाभास निर्माण झाला आहे. हा कमी करण्यासाठी दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद सुरू होणे अत्यावश्यक आहे. तरच भावी पिढीचे लैंगिक आणि मानसिक आरोग्य निकोप राहील.
( डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत)
shilpachitnisjoshi@gmail.com