प्रश्न : एप्रिल महिन्यात माझ्या मोठ्या भावाचा विवाह झाला व नवीन वहिनी घरात आली. वहिनी अत्यंत सुंदर, प्रेमळ व खेळकर वृत्तीची आहे. तिचं व माझं वय सारखंच आहे. गेले तीन-चार महिने माझ्या मनात मात्र एक असह्य द्वंद्व चालू आहे.
वहिनीबद्दल वाटणारा आदर व प्रेम याचं रूपांतरण तिच्याबद्दल वाटणाऱ्या लैंगिक आकर्षणात झालं आहे. तिला अजून याची कल्पना नाही. माझ्या मनात सतत तिच्याचबद्दलचे विचार येत राहतात. तिच्याकडे पाहण्याचा, बोलण्याचा माझा दृष्टिकोन अगदीच बदलून गेला आहे. भावाबद्दलही माझ्या मनात मत्सर निर्माण झाला आहे. अभ्यासात लक्ष लागत नाही. हा विषय कुणाशी बोलणंही शक्य नाही. मी काय करू ?
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य?
उत्तर : वहिनी आणि तुम्ही तरुण व समवयस्क असल्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेलं आकर्षण हे नक्कीच अनैसर्गिक नाही; पण जर काल-परवापर्यंत परिचयाची नसलेली एक व्यक्ती (वहिनी) आज एका वेड्या आकर्षणाचं कारण ठरली आहे, तर आकर्षित होण्यासारखी दुसरी एखादी व्यक्ती तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. आज वहिनीकडे वाहणाऱ्या आकर्षणाचा प्रवाह दुसऱ्या कुणाकडे वळवणं तुमच्या वयात जराही अवघड नाही. असं न करण्यातले धोके थोडे तीक्ष्ण नजरेने पाहा.
तुमच्यासाठी खास व्यक्ती जेव्हा कधी तुमच्या संपर्कात येईल तेव्हा वहिनीबद्दल वाटणाऱ्या या अप्रासंगिक आकर्षणाची झापड तुम्हाला त्या व्यक्तीला ओळखण्यात अडथळा निर्माण करेल. हा दुर्विलास टाळायचा असेल, तर आजच थोडे जागरूक व्हा.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नाआधी शरीरसंबंध?
एका अर्थी हा प्रश्न विचारून तुम्ही योग्य वेळी या समस्येचा उपचार केला आहे. तुमच्या प्रश्न विचारण्यातच यातून निर्माण होणाऱ्या अशुभ गुंतागुंतीची चाहूल तुम्हाला लागली असल्याचं दिसून येतं. थोडं आणखीन सावध व्हा.
विद्यार्थी आहात. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याचा प्रयोग करून बघा. तुमचा भाऊ व वहिनी यांनाही त्यामुळे घरात थोडा अधिक एकांत मिळेल व तुमची चेतना इतर दिशांना वळवणं सोपं होईल.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा
लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर.
सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.