नीलिमा देशपांडे
प्रश्न : स्त्रियांनी आपली लैंगिक इच्छापूर्ती हस्तमैथुनातून (Masturbation) करावी का?
उत्तर : – आपल्या समाजात, अगदी सुशिक्षित स्त्रियांमध्येही ‘हस्तमैथुन’ या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञता आहे. काहींना तर तिरस्कारही आहे. आजही या विषयावर उघडपणे बोललं जात नाही, हे यामागचे खरे कारण. मुळात स्त्रियांही स्वत: स्वत:च्या गरजेसाठी, आनंदासाठी ‘हस्तमैथुन’ करू शकतात हेच अद्याप अनेकांना माहीत नाही. याउलट स्वत:च्या योनीमार्गाला हात लावणं अनेकदा घाणेरडं, अस्वच्छ मानलं जातं.
अगदी लहानपणापासून मुलींना आपल्या शरीराविषयी काळजी घ्यायला लावली जाते, ती प्रामुख्याने तिच्या दोन अवयवांचीच. स्त्रीच्या स्तन आणि योनीमार्गाविषयी जितकी गुप्तता बाळगली जाते तेवढी अन्य कोणत्याच अवयवाबाबत बाळगली जात नाही. खरं तर वय वाढत जातं, मुलगी वयात येते तेव्हा तिला तिच्या शरीराची नीट आणि संपूर्ण माहिती देेणे गरजेचे असते. लग्नानंतर शरीर शरीरसंबंधांसाठी, सेक्ससाठी व्यवस्थित तयार होणं कोणत्याही स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यातलाच एक भाग म्हणजे ‘हस्तमैथुन’ शिकणं. त्यासाठी ‘सेक्सस्टोरी’चा वापर शिकून घेणं हेही फायदेशीर ठरू शकतं.
काही वेळा ‘हस्तमैथुन’ कशासाठी असा प्रश्न पडू शकतो. काही वेळा नवरा-बायकोच्या वैयक्तिक आजारपणामुळे लैंगिक संबंधांमध्ये बाधा येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ- रक्तदाबाचा त्रास, ह्रदयरोग यामुळे पुरुषांच्या लिंगाला काही वेळा ताठरपणा येत नाही तर काही वेळा काही आजारात हाडे ठिसूळ होतात, मोडतात. मोठा अपघात असो वा दीर्घ आजारपण अशा वेळी त्या पुरुषाला लैंगिक संबंध ठेवता येत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही, की त्याच्या बायकोने तिची लैंगिक इच्छापूर्ती करूच नये. अशा परिस्थितीमध्ये ‘हस्तमैथुन’ करणे हे तिच्या समाधानासाठी महत्त्वाचे साधन ठरतं. इच्छापूर्ती न झाल्याने होणारा चिडचिडेपणा, सतत येणारा रागही त्यामुळे कमी होऊ शकतो.
स्त्रियांचं लैंगिक समाधान तिच्या गर्भधारणेशी संबंधित नसतं त्यामुळे अनेकदा तिच्या लैंगिक इच्छांकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं तर नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास आणि आदर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन गोष्टींच्या अभावी कुठल्याही नात्यांमध्ये मोकळेपणानं बोलणं, एकमेकांना विश्वासात घेणं, आपल्या आवडीनिवडी, गरजा व्यक्त करणं कमी होतं. या गोष्टी कमी पडल्याने नवरा बायको एकमेकांशी लैंगिक संबंधांबद्दल, कुठल्या प्रकारे इच्छापूर्ती झालेली आवडेल, काय केलं की समाधान वाटेल, आनंद वाटेल आणि अजून अजून जवळीक साधायचा प्रयत्न केला जाईल. शेवटी आकर्षण म्हणजे हेच ना? की जोडीदाराबद्दल प्रेम वाटणं, आदर वाटणं. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ते शोधून काढणं, आणि त्याप्रमाणे आपलं वागणं बदलणे. कुठल्याही नात्यांमध्ये दबावाखाली केलेली गोष्ट ही त्रासदायक ठरते, मग ती लैंगिक इच्छापूर्ती असो किंवा इतर जीवनशैलीतल्या गोष्टी असो. स्त्रियांच्या लैंगिक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ. याकाळात स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. योनीमार्ग कोरडा होणं, तिथे आग होणं, जळजळ होणं या सगळ्या गोष्टी घडतच असतात. या कोरडेपणामुळे शिश्निकाच्या (clitoris) च्या आजूबाजूच्या पेशीही कोरड्या पडतात. पुढे जाऊन लैंगिकसंबंधांमध्ये त्रास व्हायला लागतो. वेदना होत असल्याने लैंगिक संबंधांची इच्छाही कमी होते आणि त्याचा आनंदही कमी होतो. या शारीरिक गोष्टींचा मनावर मोठा परिणाम होत असतो तो म्हणजे सतत अस्वस्थ राहाणं, राग राग करणं होतंच. अनेकदा तो राग नवऱ्यावर निघतो आणि मग भांडणं नित्याची होतात.
यासाठी गरजेचं आहे स्वत:ला आनंदी ठेवणं. म्हणूनच असं काही घडत असेल तर किंवा एकट्या स्त्रियासुद्धा स्वतःच्या आनंदासाठी ‘हस्तमैथुन’ करू शकतात, परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे केव्हाही चांगलेच.
(डॉ. नीलिमा देशपांडे स्त्रीरोग तज्ज्ञ असून सेक्स थेरपीस्ट आहेत. )
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.