Sharbat in Summer: आपल्याकडची परंपरागत शीतपेये नैसर्गिक थंडावा देतात. त्यामुळे उष्णता कमी होण्याबरोबरच पोटातील जळजळ, अपचन कमी होण्यासही मदत होते. महत्त्वाचं म्हणजे ही सरबतं करायला अत्यंत सोपी आहेत. कडक उन्हाचा आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाचा सामना करायचा असेल तर तुम्हीही ही सरबतं नक्की करा.

उन्हाळा अगदी असह्य होत आहे.अशावेळेस सतत काहीतरी थंड प्यावसं वाटतं. पण विकतची कोल्डड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली नसतातच. आपल्याकडे परंपरेनुसार चालत आलेली सरबत किंवा थंड पेयं आहेत. या घरगुती पेयांमुळे तहान तर भागतेच, शिवाय उन्हाळाही बाधत नाही.अगदी सहजपणे उपलब्ध असलेल्या साहित्यांतून केली जाणारी ही अत्यंत गुणकारी पेये असह्य होणाऱ्या उकाड्याशी दोन हात करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

१. लिंबू सरबत- अगदी सहजपणे कुठेही उपलब्ध होणारं पेय म्हणजे लिंबू सरबत. घराघरामध्ये केलं जाणारं लिंबू सरबत तहान तर शमवतंच, पण डिहायड्रेशनमुळे होणारा त्रासही कमी करतं. ज्यांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो, त्यांनी तर आवर्जून लिंबू सरबत घेण्याचा सल्ला दिला जातो.

२. नारळपाणी- फक्त उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतुत अत्यंत गुणकारी समजलं जाणारं नारळपाणी हे खरं तर पूर्णपणे नैसर्गिक पेय आहे. नारळाच्या आतमध्ये पाणी असल्याने त्यामध्ये कोणतीही भेसळ किंवा अशुद्धपणा नसतो. उन्हाळ्याचा त्रास होणाऱ्यांनी, वृध्द तसेच गर्भवती महिलांनी दररोज नारळपाणी प्यायले पाहिजे असे सांगितले जाते.

३.कोकम सरबत- कोकम सरबत आता फक्त कोकणापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पित्तशामक असलेले कोकम सरबत थंडावाही देते. कोकम सरबत पाचक पेय असल्याने उन्हाळ्यात अपचनाचा, पित्ताचा त्रास असलेल्यांनी तर आवर्जून घ्यावे.

४. सोलकढी- अस्सल मराठमोळी सोलकढी तिच्या गुणधर्मांमुळे आता देशभरात लोकप्रिय झाली आहे. ओलं खोबरं आणि कोकम यांच्यापासून केली जाणारी सोलकढी उष्णतेपासून बचाव करते. पोटाला थंडावा देते आणि उन्हाळ्यात पचनाचा त्रासही कमी करते.

५. बेलफळाचे सरबत- बेलफळाचे सरबत थंडावा देणारे आहे. या सरबतामुळे उन्हाळ्यात सतत तहान होत नाही, उन्हाळी लागत नाही. शरीरातील पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवून शरीर हायड्रेट ठेवण्यास बेलफळाचे सरबत मदत करते.

६. कैरीचे पन्हे- कैरीचे पन्हे हा अनेकजणांचा वीक पॉईंट आहे. कैरीचे पन्हे जितके चविष्ट आहे, तितकेच ते औषधीही आहे. कैरी उकडून केलेले पन्हे किंवा कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाळ्याचा त्रास कमी करते. गरमीमुळे होणारा त्रास, थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. पन्हे पाचकही आहे. कडक उन्हातून आल्यास कैरीचे पन्हे घेतल्यास उन्हाळी लागत नाही.

७.उसाचा रस- उसाचा रस अनेकांचे फेवरेट ड्रिंक आहे.उन्हाळ्यात उसाच्या रसामुळे तहान भागत असली तरी उसाचा रस पिताना काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छ ठिकाणी काढण्यात येणारा तसेच खूप वेळ काढून ठेवलेला, उघड्यावर ठेवलेला बर्फ टाकलेला रस अजिबात पिऊ नये.

८.सातूचे सरबत- उत्तर भारतात उन्हाळ्यात हे सरबत आवर्जून केले जाते. गरम हवेची वादळे अर्थात लू शी सामना करण्यात सातूचे किंवा सत्तूचे सरबत अत्यंत उपयुक्त आहे. शरीराला थंडावा देण्याबरोबरच हे सरबत पचन सुधारण्यासही मदत करते. नियमितपणे सातू अर्थात सत्तूचे सरबत प्यायल्यास जळजळ, पित्त, बद्धकोष्ठता कमी होते. शरीरातील उष्णता कमी होण्यासही मदत होते.

९. ताक- भारतातील घराघरांत केले जाणारे पेय म्हणजे ताक. शरीरातील उष्णता कमी करून पचन चांगले करण्यास ताक मदत करते. सतत तहानतहान होत असेल तर ताक नक्की प्या. थोडीशी जिरेपूड, कोथिंबीर, मीठ घालून केलेले ताक तोंडाला चवही आणते. ताक पिण्याने शरीर डिहायड्रेट होत नाही.

१०.वाळा सरबत- वाळा किंवा खस उन्हाळ्यात आवर्जून वापरला जातो. खासकरून उन्हाचं प्रमाण जिथं जास्त आहे तिथे वाळ्याचे पडदे लावले जातात आणि त्यावर पाणी मारून थंडावा निर्माण केला जातो.पाण्यात वाळा घालून ते सुगंधी पाणी प्यायलं जातं. तसंच खसचं सरबतही गुणकारी आहे. वाळ्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळी लागण्याचा किंवा उष्माघाताचा त्रास होत नाही. उन्हामुळे अशक्तपणा, थकवा जाणवतअसेल तर खसचं सरबत आवर्जून प्यावं. बध्दकोष्ठता, पोटातील जळजळही कमी होते. शांत झोपही लागते.

११. गुलाब सरबत- गुलाबाचे सरबत उन्हाळ्यात आवर्जून प्यायले जाते.यामुळे उन्हाचा त्रासही होत नाही आणि पोटातील जळजळ, उष्णता कमी होते.गार दुधात गुलाबाचे सिरप घालून प्यायल्यासही पोटाला थंडावा मिळतो.

आपल्याकडची ही परंपरागत शीतपेये नैसर्गिक थंडावा देतात.त्यामुळे उष्णता कमी होण्याबरोबरच पोटातील जळजळ, अपचन कमी होण्यासही मदत होते. महत्त्वाचं म्हणजे ही सरबतं करायला अत्यंत सोपी आहेत.कडक उन्हाचा आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाचा सामना करायचा असेल तर तुम्हीही ही सरबतं नक्की करा.