लोकगीतांना साजेसा आवाज… शब्दांमधला भारदस्तपणा… मनापासून आलेले स्वर… भक्तीगीत किंवा छठ पूजेची गाणी गाताना भक्तिरसांत न्हाऊन निघालेले स्वर… ही ओळख शारदा सिन्हा यांची. ‘बिहारची कोकिळा’ म्हणून प्रसिद्ध शारदा सिन्हा यांची गायकी फक्त बिहारपुरतीच मर्यादित नव्हती. छठ पूजेची गाणी ते लोकगीते ते बॉलीवूड चित्रपटातील गाणी असा त्यांचा हा प्रवास होता. छठ पूजेच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शारदा सिन्हा यांचं निधन छठ पूजेच्या काळातच व्हावा या योगायोगाबद्दल त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. पाच दशकांहूनही जास्त काळ लोकगीतांची समृद्ध परंपरा आपल्या खांद्यांवर पेलणाऱ्या शारदा सिन्हा यांच्याकडे फक्त बिहारच नाही तर संपूर्ण उत्तर भारताचं सांस्कृतिक राजदूत म्हणून बघितलं जायचं.

बिहारच्या सुपौल जिल्ह्यातल्या हुलास गावात १ ऑक्टोबर १९५२ साली शारदा सिन्हा यांचा जन्म झाला. आठ भावांची ती एकुलती एक लाडकी बहीण. अगदी लहानपणापासूनच त्यांना संगीत आणि नृत्याची आवड होती. लग्न झाल्यावर त्या त्यांच्या सासरी बेगुसराय इथं आल्या. तिथे बोलली जाणारी मैथिली भाषा खूप वेगळी होती. आपल्या मुलीला गाण्यात रुची असल्याचं त्यांच्या वडिलांनी सासरच्यांना सांगितलं होतं खरं, पण शारदा यांच्या सासुबाईंना त्यांनी गाणं म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. पण त्यांचे पती त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी आपल्या आईचं मन वळवलं आणि शारदा यांना त्यांची कला जापोसण्यास सतत पाठिंबा दिला. त्यांच्यामुळेच आपण मोकळेपणानं संगीताची सेवा करू शकले असं अनेकदा शारदा सिन्हांनी सांगितलं होतं. समस्तीपूर कॉलेजमध्ये त्या काही वर्षं संगीताच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुखही होत्या. त्यांनी मिथिला विद्यापीठातून संगीतात पीएच.डीही केली होती. त्या मणिपुरी नृत्यही शिकल्या होत्या. विशेष म्हणजे पाटणा आकाशवाणीवर त्यांची ऑडिशन झाली तेव्हा त्यांना नाकारण्यात आलं होतं. पण त्यानं निराश होण्याऐवजी जास्त मेहनत करून स्वत:ला सिद्ध करण्याचं त्यांनी ठरवलं. सहा महिन्यांनंतर पुन्हा झालेल्या ऑडिशनमध्ये त्यांची निवडही करण्यात आली.

Actor Sachin Pilgaonkar is coming to Yavatmal on Wednesday to appreciate Geet Ranjan
यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला अभिनेता सचिन येणार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sankarshan Karhade Political Poem video viral
छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल
aishwarya narkar shares diwali padwa video
नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून
sangli and miraj vidhan sabha
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

हेही वाचा – आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती लोकसंगीत आणि विशेषत: छठ पूजेच्या गाण्यांमुळे. १९७४ मध्ये त्यांनी पहिलं भोजपुरी गीत गायलं. एकदा त्यांच्या वाचनात तुलसीदास यांची ‘मोहे रघुवर की सुधि आई…’ ही रचना आली. त्यांना ती खूपच आवडली. त्यांनी ती घरच्यांसमोर गाऊन दाखवली तर घरच्यांनाही ती आवडली आणि त्यांनी अशाच काही रचना गाण्यास त्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच दरम्यान त्यांचा छठ पूजेच्या गीतांशी परिचय झाला. गावातील घराघरांतून गायली जाणारी छठ पूजेची पारंपरिक गीतं त्यांनी लिहून काढली आणि ती रेकॉर्ड केली. ७०-८० च्या दशकांत रेकॉर्ड झालेल्या छठ पूजेच्या त्यांच्या गीतांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. घराघरांमध्ये त्यांचा आवाज पोहोचला. त्यांनी छठ् पूजेची जवळपास ७० पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत.

त्यांच्या आवाजाचा पोत अगदी वेगळा होता. ‘मैंने प्यार किया’ या सुपरहिट सिनेमातील त्यांनी गायलेलं ‘कहें तोसे सजना…’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. त्यानंतर ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटात त्यांनी गायलेलं ‘बाबूल जो तुमने सिखाया…’ हे गाणंही गाजलं. आजही उत्तर भारतात नवरीच्या विदाईच्या वेळेस हे गाणं वाजवलं जातं. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांनी ‘गँग ऑफ वासेपुर’ मध्ये ‘तार बिजलीसे पतले’ आणि २०१४ मध्ये ‘चारफुटिया छोकरे’ हे गाणं गायलं.

हेही वाचा – अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही जन्मनोंदणीचा हक्क

शारदा सिन्हा या अत्यंत मृदुभाषी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना पान खायला आवडायचं. कोणत्याही कार्यक्रमात गाण्यापूर्वी गळा थंड राहावा म्हणून त्या पान खायच्या असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. मिथिलांचलमध्ये देवी भगवतीला पानाचा प्रसाद असतो. त्याचं प्रतिक म्हणूनही त्यांना पान विशेष आवडायचं. २२ सप्टेंबरला त्यांना सावलीसारखी साथ देणारे त्यांचे पती डॉ. ब्रिजभूषण यांचं निधन झालं. ५४ वर्षांच्या सहजीवनातील त्यांचा जोडीदार सोडून गेल्यानंतर त्या भावनिकरित्या कोसळल्या होत्या. पती निधनानंतर आपल्या वाढदिवसाला त्यांनी लिहिलेली पोस्ट बरीच व्हायरल झाली होती. त्या कॅन्सरशी झगडत होत्या. पण त्यांची संगीताशी असलेली बांधिलकी कमी झाली नव्हती. त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांनी छठ पूजेचं नवं गाणं रिलीज केलं होतं. तिथेही त्या संगीताचा रियाज करायच्या. शारदा सिन्हा यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्कार, २००१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.

छठ पूजेसाठी संपूर्ण देशभरातूनच नाही जगभरातून मूळचे बिहारी, उत्तर प्रदेशीय आपापल्या गावी जातात. गंगा नदीच्या किनाऱ्यावर अर्घ्य देण्यासाठी गर्दी होते. विविध जातींचे, विविध वर्गांतले, अनेक शहरांमधून आलेले हे भाविक असतात, पण त्यांना जोडणारा धागा एकच असतो तो म्हणजे शारदा सिन्हा यांच्या गाण्याचा. छठ पूजेच्या पवित्र काळात निर्मळ मनानं तिची संगीतसेवा करणाऱ्या शारदा सिन्हा यांना छठ मैयाने बोलावले अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.