महिला अत्याचारांविरोधात सध्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो. महिलांवर शारीरिक अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेही तयार केले आहेत. त्यांची तक्रार तत्काळ दाखल करून फास्ट ट्रॅकवर चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षाही केली जाते. परंतु, २५ वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. लाजेखातर अनेक महिला त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात बोलत नसत. लहान मुली अशा विघातक घटनांना बळी पडल्यास त्यांच्या नातेवाईकांना गाव सोडून जावं लागत असे. समाजाच्या नजरा त्यांना बोचत असत. लोकांचे जीवघेणे टोमणे सहन होत नसत. त्यामुळे पोलिसांत जाऊन तक्रार करण्यापेक्षा गाव सोडून दुसरीकडे स्थायिक होणं त्यांना सोयीचं वाटे. असाच प्रकार उत्तर प्रदेशात घडला. वयाच्या १२ व्या वर्षी बलात्कार, १३ व्या वर्षी मातृत्व लाभलेल्या मुलीला तिच्या याच मुलाने न्याय मिळवून दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यावर सविस्तर वृत्तांत दिला आहे.
पीडित महिला आता ४१ वर्षांची आहे. पण तिच्या वयाच्या १२ व्या वर्षी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या बलात्कारातून तिनं एका मुलालाही जन्म दिला होता. मुलाच्या जन्मानंतर एका कुटुंबाने त्याला दत्तक घेतलं. त्यामुळे या मुलाच्या जन्मानंतर पीडितेला या मुलाविषयी काहीच माहिती नव्हतं. परंतु, या मुलाला पडलेल्या अनेक प्रश्नांमुळे त्यानेच त्याच्या खऱ्या आईचा शोध घेतला आणि तिची व्यथा जाणून घेत तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या महिलेची ही दुःखद कहाणी तिने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सांगितली.
पीडित महिला १० वर्षांची असताना उत्तर प्रदेशातील हरदोई येथील तिच्या घरापासून ६१ किमी अंतरावर असलेल्या शहाजहांपूर शहरात राहणाऱ्या तिच्या विवाहित बहिणीच्या घरी स्थायिक झाली. तिनं तिथंच शाळा शिकण्याचा निर्णय घेतला. तिचे वडील लष्करात असल्याने त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे एकाच ठिकाणी चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तिने बहिणीकडे राहण्याचा निर्णय घेतला होता. गावातल्या शाळेपेक्षा शहाजहांपूरमधील तिची शाळा चांगली होती. तिला हिंदी विषय आवडायचा. भरपूर शिकून तिला पोलीस अधिकारी बनायचं होतं. “मला गणवेश घालून घरी जायचं होतं. तेव्हा माझं हे स्वप्न होतं”, असं या पीडित महिलेने इंडियन एक्स्प्रसेने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं.
शाळा चांगली असली तरीही शाळेच्या आजूबाजूचा परिसर तिला खायला उठायचा. तिला रोज शाळेत येणं-जाणं कठीण वाटायचं. कारण तिच्या वाटेवर तिचा माग धरून बसलेले अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक होते. तिच्या घराजवळील स्मशानभूमीच्या पुढे काही मुलं रेंगाळत राहायची. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना हेरायची, त्यांना टोमणे मारायचे, अश्लील टीप्पणी करायचे. असाच प्रकार या पीडित महिलेबरोबरही व्हायचा. त्यामुळे तिचा घर ते शाळेपर्यंतचा प्रवास नकोसा व्हायचा. या गुंडांमध्ये दोघेजण भाऊ होते. त्यांचा ट्रक होता. हा ट्रक या पीडित महिलेच्या घराजवळच पार्क केला जायचा. त्यामुळे, “मी घराच्या बाहेर पडले की त्यांचा त्रास सुरू व्हायचा”, असं पीडित महिलेने सांगितलं.
या आंबटशौकिन मुलांनी एकदा तिला गाठलंच. या कटू आठवणीबाबत ती म्हणाली, “मी एकदा एकटीच घरी होते. तेव्हा हे ट्रकचालक माझ्या घरी आले आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मला धमकावले. या बलात्काराविषयी कोठेही वाच्यता न करण्याविषयी त्यांनी मला धमकी दिली. यानंतर त्यांनी सतत सहा महिने माझ्यावर अत्याचार केले. हे दोघेही परिसरातील गुंड होते. त्यांनी याआधी अनेकदा चोरी-मारी, हत्येसारखी प्रकरणे केली होती. आणि या सर्व गोष्टी ते बढाया मारत सर्वांना अभिमानानेही सांगत असत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला असता तरी फारसा फरक पडला नसता.”
“एकदा मला पहिली पाळी आली. पहिल्या पाळीनंतर माझी प्रकृती फार बिघडली. त्यामुळे माझ्या बहिणीने मला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीनंतर मी गरोदर असल्याचं समजलं. परंतु, त्यावेळी माझं अवघं १३ वर्षे वय होतं, त्यामुळे माझा गर्भपातही डॉक्टरांनी नाकारला”, असंही या पीडित महिलेने सांगितलं.
“मी गरोदर राहिल्यानतंर माझ्यावरील बलात्काराचं प्रकरण उजेडात आलं. त्यामुळे माझ्या बहिणीने आणि भावोजींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु, आरोपींनी माझ्या बहिणीला आणि भावोजींनाही धमकी दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबाने पुन्हा १५० किमी दूर असलेल्या रामपूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला”, असंही तिनं सांगितलं. तिच्या बहिणीचा नवरा सरकारी कर्मचारी होता. त्यामुळे त्यांनी त्वरीत रामपूरला बदली करण्यासाठी अर्जही केला.
रामपूरला स्थायिक झाल्यानंतर १९९५ साली तिने एका मुलाला जन्म दिला. परंतु, हा मुलगा त्वरीत तिच्यापासून दूर लोटला गेला. या नवजात बाळाला हरदोईमधील एका जोडप्याने दत्तक घेतलं. “ते बाळाला घेऊन गेले. मला फक्त माझी प्रसूती आठवतेय. बाकी काही आठवत नाही. मी त्यावेळी फार अशक्त होते. त्यानंतर ते मूल जिवंत आहे की नाही हेही मला माहीत नव्हते”, असं पीडित महिला म्हणाली. या घटनेनंतर अनेकदा तिला तिच्या या मुलाची आठवण आली. पण तिने याबाबत कुठेच कधीच वाच्यता केली नाही.
काही वर्षानंतर तिला लग्नाचं स्थळ आलं. तेव्हा ती अवघ्या १७ वर्षांची होती. वाराणसीहून तिला चांगलं स्थळ असल्याने तिच्या कुटुंबियांनी १९९९ साली तिचं लग्न लावून दिलं. २००२ मध्ये तिला एक मुलगाही झाला. याबाबत ती म्हणते, “माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता. मला माझा मुलगा मोठा झालेला पाहायचा होता. त्याला वाढवायचे होते.”
तिचा संसार सुखाचा सुरू असतानाच त्यात मिठाचा खडा पडला. तिच्या सासरच्यांना तिच्या आधीच्या बलात्काराच्या घटनेबद्दल कळलं. तेव्हापासून तिच्या सासरचे तिच्यापासून हटकून वागू लागले. तिचं जेवण-पाणी बंद केलं. तिला जवळपास बहिष्कृतच केलं होतं. तिच्या नवऱ्यानेही तिच्याशी बोलणं बंद केलं. “तू आणि तुझ्या घरच्यांनी माझा विश्वासघात केला आहे. तुझं पहिलं मूल इथं आलं तर? समाजात आमची इज्जत जाईल”, असं तिचा नवरा तिला रागाने बोलू लागला. यानंतर परिस्थिती आणखी बिघडू लागली. या दरम्यान तिचा तिच्या कुटुंबीयांशीही संपर्क तुटला होता. तिच्याकडे स्वतःचा फोनही नव्हता. पण तिच्या बहिणीचा एक पत्ता तिच्याकडे होता. ती त्या पत्त्यावर पत्र लिहायची, पण त्यावरून तिला कोणतंही उत्तर यायचं नाही. याबाबत ती म्हणाली, “कोणालाही माझ्याशी बोलायचं नव्हतं. शेवटी एकेदिवशी माझ्या बहिणीचं मला पत्र आलं. त्यावर तिचा फोन नंबर लिहिला होता. मी फोन करून तिला सर्व हकिगत सांगितली. तिनं माझी परिस्थिती समजून घेत नवऱ्याला सोडून यायला सांगितलं.”
२००७ मध्ये तिने तिच्या नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला. यावर तिच्या नवऱ्यानेही कोणता आक्षेप घेतला नाही. नवरा तर तिला आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला बसस्टॉपवर सोडून निघून गेला. तिची बहिण राहत असलेल्या उत्तर प्रदेशातील रेणुकूटला जाण्यासाठी ती बसमध्ये चढली. तिला इथून नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. त्यामुळे तिनं लखनौ येथून तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. तिथे तिने टेलरिंगची नोकरी केली.
या काळात, अनाकलनीय घडामोडी घडल्या. लैंगिक अत्याचारातून जन्माला आलेल्या तिच्या मुलाला अनेक प्रश्न पडू लगले. त्याचं आडनाव त्याच्या कुटुंबियांपेक्षा वेगळं का? तो इतरांपेक्षा वेगळा का दिसतो? अशा प्रश्नांनी त्याला पछाडलं. त्याच्या दत्तक पालकांनी त्याचं चांगलं संगोपन केलं होतं. पण, काही प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने तो त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघाला. त्यावेळी त्याला शहाजहांपूर येथे घडलेली घटना त्याला कळली. त्याच्या नातेवाईक आणि कुटुंबियांनी त्याला त्याच्या खऱ्या आईविषयी सांगितले.
वयाच्या १६ व्या वर्षी तो त्याच्या आईच्या शोधात निघाला. त्याच्या गावातील एक ड्रायव्हर काका उत्तर प्रदेशात राहत होते. ते शहाजहांपूरमधील एकाला ओळखत होते. त्यामार्फत त्यांनी त्याच्या आईची चौकशी केली. थोड्या प्रयत्नांनी त्याला त्याच्या खऱ्या आईचा पत्ता मिळाला.
ऑक्टोबर २०१० मध्ये एका कागदाच्या तुकड्यावर लिहिलेल्या पत्त्यावरून त्याने त्याच्या आईचा शोध घला. त्यासाठी तो लखनौला जाणाऱ्या बसमध्ये चढला आणि लखनौच्या वसितगृहापर्यंत जाऊन त्याने त्याच्या आईचा माग काढला. आईला भेटताच, “तू माझी आई आहेस का?” असा प्रश्न या मुलाने पीडितेला विचारला. तीही आश्चर्यचकीत झाली. परंतु, हाच आपला पहिला मुलगा असल्याची ओळख पटल्यानंतर तिने त्याला छातीशी कवटाळून खूप वेळ रडली.
पीडित महिला तिच्या दोन मुलांसह आता वसतिगृहात राहू लागली. परंतु, या दोन्ही भावंडांत वारंवार खटके उडत असत. या दोघांनाही एकमेकांशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. परंतु, कालांतराने तिघांमध्येही एक अनोखा बंध तयार झाला.
एकदा मुलांबरोबर खेळत असताना त्याला कोणीतरी नाली का किडा असं म्हटलं. हे शब्द कानावर पडताच पीडित महिलेने त्या मुलाला हटकलं. एवढंच नव्हे तर दोघांना शाळेत टाकतानाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले. सख्ख्या भावांची आडनावे वेगवेगळी का असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावरून मोठ्या मुलानेच तिला रागात विचारलं की, माझे वडील नेमके कोण आहेत?
याबाबत बोलताना पीडित महिला म्हणाली की, त्याचे प्रश्न कधीच संपायचे नाहीत. त्यामुळे मला नेहमी त्याचे प्रश्न दुर्लक्षित करावे लागत असे. पण ते सतत प्रश्न विचारत असतं. एकदा मी दोघांनाही पुढे बसवलं आणि शाहजहांपूरमध्ये घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दोघांनाही दिली.
हेही वाचा >> सामान्य घरातील ‘त्या’… आता शिकणार ‘आय.आय.टी.’त!
मग एकेदिवशी तिचा अकरावीत असलेला लहान मुलगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला की, “आई आपण बलात्कार करणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.” “मुलाचे हे बोल ऐकून मी घाबरले. कारण ते फार शक्तीशाली लोक होते”, असं पीडित महिला म्हणाली. पण माझ्या मोठ्या मुलानेही यात पुढाकार घेतला. तो म्हणाला, गरज पडल्यास आपण अधिकाऱ्यांची मदत घेऊ.
मुलांची साथ असल्याने तिनेही या विरोधात आवाज उठवायचं ठरवलं. “खरंतर मला तिथं पुन्हा परत जाण्याची भीती वाटत होती. आम्ही शाहजहांपूरच्या एका पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो. पण पोलिसांना सांगण्यासाठी त्यांचं नाव, गाव, पत्ता माझ्याकडे काहीच नव्हतं. त्या गावात गेल्यावर मी आजारी पडले. गेल्या २४ वर्षांत हे गाव पूर्णपणे बदललं होतं. पण मला त्यांचे चेहरे आणि डोळे अजूनही आठवतात. त्यांची टोपणनावं मला माहीत होती. पण ते या गावात अजूनही राहतात की नाही हे मला माहीत नव्हतं”, असं पीडित महिला म्हणाली.
उपनिरिक्षक मंगल सिंग यांनी हे प्रकरण हाताळलं होतं. त्या म्हणाले, “या दोघांचा माग कसा काढायचा हे आम्हाला कळत नव्हतं. मधल्या काळात इतका वेळ निघून गेला होता. इतक्या वर्षांनंतर ती तक्रार करण्याकरता का आली होती हे कळत नव्हतं. त्यानंतर ती पुन्हा दोन तीन वेळा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. आम्हीही गुन्हेगारांची चौकशी केली. परंतु, आमच्या हाती काहीही लागलं नाही.”
ऑगस्ट २०२० मध्ये तिने या संदर्भात वकील मोहम्मद मुख्तार खान यांच्या मदतीने शाहजहानपूर सत्र न्यायालयाचे दार ठोठावले. तिने गावभर फिरून या बलात्काऱ्यांची माहिती काढली. खरंतर तिच्यासाठी हे फार खर्चिक होतं. कारण, शाहजहांपूरपर्यंत पोहोचण्यासाठी तिला दिवसाला २००० रुपयांचा खर्च येत होता. आणि त्यावेळी तिला फक्त १५ हजार रुपये पगार होता. “परंतु, यावेळी मी एकटी नव्हते. माझ्याबरोबर माझी मुलं होतं. माझ्या या संघर्षात नंतर माझी बहीण आणि माझ्या मैत्रिणीही सामिल झाल्या”, असंही ती आत्मविश्वासाने म्हणाली.
शाहजहांपूरच्या एका ऑटोमोबाईल मेकॅनिकच्या दुकानात ती गेली आणि तिने स्वतःची ओळख दोन आरोपी भावांची नातेवाईक म्हणून दिली. दुकानदाराने सांगितले की तो त्यांना ओळखतो आणि लगेचच दोन भावांमध्ये लहान असलेल्या गुड्डू हसनला फोन केला. फोनवरील त्याचा आवाज तिनं ओळखळा. यावरून माग काढत पोलिसांनी मार्च २०२१ मध्ये पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला.
हेही वाचा >> असा नवरा हवा गं बाई! स्वयंपाक ते केरकचरा सगळं नवऱ्याने केलं, पण…; बाईच्या मनातला साथीदार नक्की कसा असतो?
एसआय मंगल सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की , “आम्ही भावांना पोलिस ठाण्यात बोलावले. ती त्यांची शेजारी असल्याने त्यांनी तिला ओळखत असल्याचे कबूल केले, परंतु बलात्काराचे आरोप फेटाळले.”
जून २०२१ मध्ये, पोलिसांनी तिच्या पहिल्या मुलाचे आणि दोन पुरुषांचे डीएनए नमुने गोळा केले. नमुन्यांवरून उघड झाले की, दोन आरोपींपैकी मोठा नाकी हसन हा तिच्या मुलाचा बाप होता. दोन्ही भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ती म्हणते की, मी शाहजहांपूर सोडल्यानंतर प्रथमच आरोपीला पाहिले होते. मला त्यांच्याकडे बघायचेही नव्हते. सुदैवाने, त्यांचे चेहरे रुमालाने झाकलेले होते.”
धमकीचा फोन
शाहजहांपूर न्यायालयात खटला सुरू असतानाच महिलेला धमकीचा फोनही आला होता. “एकदा त्यांच्याशी संबंधित कोणीतरी मला फोन केला आणि केस मागे घेण्यास सांगितले. ‘तू अजून जिवंत आहेस?’ असं या व्यक्तीने विचारलं. तेव्हा मी बसमध्ये बसून शाहजहांपूरहून लखनौला परत जात होते. मला माहित होते की ते माझा माग काढू शकतात. म्हणून मी बसमधून उतरले आणि धावले. आणि मी एक लांब मार्ग स्वीकारला”, असंही महिलेने सांगितलं.
मुलाने आरोपीला कधी पाहिले का? असं विचारलं असता तो म्हणाला, “होय, खटल्याच्या वेळी मी पहिल्यांदाच त्याचा चेहरा व्यवस्थित पाहिला. त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला… पण माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता”, असं तिचा मुलगा म्हणाला.
मे २०२४ मध्ये एका अध्यायाचा शेवट
तिच्या धाकट्या मुलाने नुकतीच बी.ए.ची परीक्षा पूर्ण केली. तर तिचा पहिला मुलगा, आता ड्रायव्हर आहे. त्याचे लग्न होऊन तीन वर्षे झाली आहेत आणि तो वडील आहे. तो म्हणतो, “माझ्या पत्नीला माझ्या आयुष्याविषयी सर्व काही माहीत आहे आणि मी जसा आहे तसा तिने मला स्वीकारले. मे २०२४ मध्ये तिच्या बलात्काऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली. “आपल्या आयुष्यात काहीतरी आता चांगलं झालंय”, असं त्यावेळी तिचा मोठा मुलगा म्हणाला.