डॉ. लीना निकम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी कधी वाटतं पाळीच्या बाबतीत आता कायद्यानंच बडगा उभारायला पाहिजे. ज्या घरात पाळीमध्ये मुलींना वेगळं बसवण्यात येते, हेळसांड करण्यात येते त्या घरावर कारवाई झालीच पाहिजे. सुशिक्षित समाज बदलला असेल थोडाफार, पण आजही ५० टक्के समाज अजूनही इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, इथे हात लावू नको ,देवाकडे पाहू नको याच मनःस्थितीत वावरतो आहे. म्हणूनच आजही पाळीच्या भीतीने बायकांना मंदिरात प्रवेश नाकारण्याचा संस्कृतीरक्षकांचा उद्योग वर्षानुवर्षे सुरूच आहे. एकीकडे बाई म्हणजे शक्तीचं रूप मानले जाते, तिच्या सृजनाचा सोहळा म्हणून गर्भाशयाचे प्रतीक असलेल्या घटाची स्थापना नवरात्रात होते आणि दुसरीकडे बाईचं मानसिक खच्चीकरण आणि पदोपदी तिचा अपमान! रजस्वला देवीची पूजा ही संस्कृती करते अन् मासिक पाळीमुळे बाईला अपवित्र ठरवून मंदिर प्रवेश नाकारण्याची परंपराही याच देशात पाळण्यात येते. बायकांच्या बाबतीतच हा विरोधाभास नेहमी पहायला मिळतो. असे का? आजही मेडिकल शॉप मध्ये सॅनिटरी नॅपकिन्स दिसणार नाही अशा कागदाच्या पुडक्यात गुंडाळून का दिले जातात? आजही शिकलेल्या बायकासुद्धा पाळीला ‘प्रॉब्लेम’, ‘अडचण’ असे का म्हणतात? आजही विज्ञान विषयात पाळीबद्दल शिकवताना शिक्षक कानकोंडे का होतात? आजही विशिष्ट जमातींमध्ये बाईला पाळीच्या काळात घराबाहेर का बसवण्यात येते? आजही ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकाला विरोध का सहन करावा लागतो? या प्रश्नांची उत्तरे शोधायची असेल तर बाईने केवळ माना न डोलवता आता समाजजागृती करण्याची गरज आहे. आज पाळी विषयावर पुण्याचे डॉ. स्वप्नील चौधरी, शर्वरी- सचिन हे पती-पत्नी कौतुकास्पद काम करीत आहेत. समाजात जागृती आणण्यासाठी पाळीवर अनेक कार्यक्रम राबवत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. पण अशी जागृती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी ही काळाची गरज आहे. शाळा शाळांमध्ये मासिक पाळी विषयी जेव्हा शिक्षक किंवा डॉक्टर्स मार्गदर्शन करतात तेव्हा मुलींना एका बंद खोलीत बसवतात आणि मुलांना बाहेर खेळायला लावतात. असे केल्याने मुलांच्या मनात आणखी उत्सुकता ताणली जाते. एकत्र नका करू पण मुलांनाही पाळीविषयी जागरूकता आणणे गरजेचे आहे. बऱ्याच शाळांमध्ये मुलींसाठी जी वॉशरूम्स असतात ती बघितली की असे वाटते, आरोग्य विषयक सोयीसुविधांचा किती अभाव आपल्या देशात आहे! सॅनिटरी पॅड्सची नीट विल्हेवाट लावण्यासाठी अजूनही आपल्या देशात पाहिजे तशी यंत्रणा नाही. त्यामुळे किती ब्लॉकेजेस तयार होतात याचा विचार आपण केव्हा करणार?

स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर तिच्या शरीर धर्माचा सुद्धा सन्मान करावाच लागेल. तिच्या शरीर धर्माला गलिच्छ, विटाळ मानून चालणार नाही. तामिळनाडू मधील कोईमतुर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी अतिशय स्वस्त दरात पाळीसाठी पॅड्सची निर्मिती केली. कारण बाई पाळीच्या काळात जी कापडं वापरते ती कधी तिला नुकसानकारक ठरतात. जुन्या कापडांमुळे इन्फेक्शन होऊ शकते. शिवाय एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त असे पॅड जेव्हा या पुरुषाने बनवले तेव्हा तो खरोखर चर्चेचा विषय होता. त्यावर ‘पॅड मॅन ‘नावाचा पिक्चर सुद्धा निघाला, ज्यात प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमारने काम केले आहे. पाळी विषयी एवढ्या मोकळेपणाने चर्चा प्रथमच एखाद्या चित्रपटात व्हावी ही गोष्ट खरोखर अभिनंदनीय आणि दिलासादायक बाब आहे. सातत्याने पाळी विषयी अशी जागृती झाली तर तिला ‘हॅपी टू ब्लीड’ म्हणत रस्त्यावर यावे लागणार नाही. ‘माय बॉडी माय राईट’ म्हणत आंदोलन करावे लागणार नाही. आणखी किती काळ जावा लागेल माहिती नाही पण पाळी विषयी तिची लढाई आजही जारी आहे..

ही लढाई रक्तरंजित नाही असे तरी कसे म्हणावे?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should respect of bodystructure menstrual cycle awareness asj