लग्नानंतर महिलेचं नाव बदलण्याची आपल्या इथं परंपरा आहे. परंतु, याची कायदेशीर सक्ती नाही. त्यामुळे अनेकदा लग्नानंतर महिलांनी नाव बदलावं का? असा प्रश्न उपस्थित होत असतात. आधुनिक युगात अनेक मुली आज नाव बदलत नाहीत, तर काहीजणी माहेर आणि सासरचं दोन्ही आडनावे लावतात. काहीजणी पत्रव्यवहारासाठी आणि कागदपत्रावरील नाव बदलतात पण खासगीत माहेरचंच नाव सांगतात. अशा अनेक पद्धतींमुळे अनेक मुलींना त्यांना त्यांची एकच ओळख जपायची असते. अशावेळेस मुलींनी कायदेशीररित्या नाव बदलावं की नाही याबाबत आपण आज जाणून घेउयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वकील उदय वरुंजीकर याबाबत सांगतात की, लग्नानंतर नाव बदलायचं की नाही हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो. कायदेशीर नाव बदलायचं असेल तर त्याकरता ऑफिशिअल गॅझेट करावं लागतं. विवाह झाल्याचं प्रमाणपत्रही द्यावं लागतं. परंतु, ही प्रक्रिया न करताही लोक आपआपलं जुनं नाव पुढे कायम ठेवतात. हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा भाग आहे.

हेही वाचा >> निकोलाई सचदेव… तुझी भूमिका पटली; पण लग्नानंतर ओळख बदलावीच का?

“परंतु, महाराष्ट्रात हिंदू कायद्याच्या बाबतीत पुरुषसत्ताक संस्कृतीत येणारा हा भाग आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर तिचं गोत्र बदलतं, ती दुसऱ्या घराण्यात जाते, त्या घराण्याचं नाव तिने लावावं अशी सर्वसाधारण हिंदू वारस कायद्याचेही संकेत आहेत. पण लग्नानंतर नाव बदललं पाहिजे असं कोणताही कायदा स्वतंत्रपणे सांगत नाही”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

“आज घडीला अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर दोन्ही नाव लावताना दिसतात किंवा जुनं नाव कायम ठेवतात किंवा नवीन नाव लावतात. त्यामुळे याबाबतीत कायदा हा वैयक्तिक पसंत असते, तुम्हाला जे ठेवायचं असतं ते ठेवू शकता”, असंही अॅड. उदय वरुंजीकर म्हणाले.

नाव बदललं नाही तर काय अडचणी येऊ शकतात?

“पुढील आयुष्यभरात काही कागदोपत्र व्यवहार करताना आईचं, वडिलांचं आणि पतीचं नाव जुळत नाही. त्यामुळे त्यांना अॅफिडेव्हिट द्यावं लागतं. पासपोर्ट काढायला गेलात तर अॅफेडेव्हिटमध्ये नाव का बदललं नाही याचे पुरावे द्यावे लागतात. याकरता लग्नाचं प्रमाणपत्रही उपयोगाला येतं.

याबाबत आम्ही काही महिलांशीही संवाद साधला. जाहिरात क्षेत्रात काम करत असलेली निकीता मुरकर म्हणाली की, “माझं लग्न होऊन पाच वर्षे झाली आहेत. मी नाव न बदलण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या या निर्णयाला माझ्या नवऱ्यानेही पाठिंबा दिला. आम्ही फक्त लग्नाचं प्रमाणपत्र काढलं आहे. जिथे जातो तिथं हे प्रमाणपत्र सोबत ठेवतो. आजवर आम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही.”

तर पेशाने अकाऊटंट असलेली प्राजक्ता कणसे म्हणाली की, “माझं लग्न नुकतंच झालं आहे. लग्नानंतर नाव बदलावं की नाही याबाबत मी अजूनही साशंक आहे. मला माझ्या पूर्वीच्या नावाची ओळख बदलायची नाही. पण व्यवहारात अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे. सध्या तरी मी नाव बदलणार नाहीय.”

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should women change their name after marriage what exactly does the law say chdc sgk