श्रद्धा तू आता कुठे असशील, आता जे घडतंय ते पाहतेयस की नाही, कल्पना नाही, पण तुझ्या मृत्यूची खूप चर्चा आहे अगं. तू कधी विचारही केला नसशील त्या लोकांनी तुझी दखल घेतली आहे, ती मृत्यूनंतर. सर्वजण तुला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. त्या क्रूर आफताबने जेव्हा तुझा जीव घेतला, तेव्हा तुला किती त्रास झाला असेल, ते फक्त तुलाच ठाऊक.
हेही वाचा – श्रद्धा वालकरसारख्या निर्घृण हत्या का होतात? उत्तर तसे नेहमीचेच… जाणून घ्या!
पण तुझ्या हत्येची बातमी आल्यानंतर मी तुझे फोटो पाहिलेत. तुझ्या फोटोंवरून, तुझ्या मित्रांनी तुझ्याबद्दल दिलेल्या माहितीवरून तू खूप हिंमत असलेली मुलगी वाटलीस मला. तू आफताबच्या प्रेमात पडलीस आणि त्याच्यासाठी तुझे नातेवाईक, घरचे, तुझे आईवडील सर्वांचाच विरोध पत्करलास. पण हो गं, काही महिन्यांच्या प्रेमापोटी तू तुझ्या जन्मदात्या पालकांना सोडू शकलीस, मग आफताब चांगला नाहीये, तो तुला मारत होता, तरी तू त्याला का नाही सोडलंस? तू नोकरी करायचीस, स्वतःच्या पायावर उभी होतीस, त्याच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी अवलंबून नव्हती. मग तो ड्रग्ज अॅडीक्ट आहे, तो तुला मारायचा, छळ करायचा, तरीही तू त्याच्यासोबत का राहिलीस? तुला भीती होती ना… की तो तुझा जीव घेईल, तू पोलिसांना पत्र दिल्याचंही समोर आलंय, मग का राहिलीस गं त्याच्यासोबत?
हेही वाचा – विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात नेमकं काय विकलं जातं?
प्रेम करणं चुकीचं नाही, अगं. माणूस एखाद्याच्या स्वभावामुळे किंवा दिसण्यामुळे प्रेमात पडतो, पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रेमाच्या लायकीची नाही, हे कळतं, तेव्हा त्याला सोडणं इतकं अवघड असतं का? तू त्याला वेळीच सोडलं असतंस, तर कदाचित आता जिवंत असतीस. त्याच्याबद्दल सत्य समजल्यानंतर पालकांना सांगितलं असतंस, तर त्यांनीही घेतलं असतं ना समजून. त्याचा मार सहन करून तू चुकलीस अगं. त्याने तुला इतक्यांदा मारूनही तू त्याला सोडू शकली नाहीस, अखेर त्या नराधमानं तुझा जीव घेतला. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने तुझ्या मृतदेहाचे तुकडे करून इतक्या ठिकाणी फेकले की त्यातले काही अजूनही सापडले नाहीत!
हेही वाचा – विजया वसावे… नंदूरबारमधील ओळखपत्रधारक पहिली तृतीयपंथीय!
श्रद्धा तू गेलीस गं जीवानिशी. पण तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत, ज्यांची स्वप्न आहेत, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचंय, करिअर करायचं, यशाची शिखरं गाठायचीत. पालकांना चांगलं आयुष्य द्यायचंय, त्यांना अभिमान वाटेल, असं काम करायचं आहे. अनेक मुलींचे पालक आपल्या मुलीचं आयुष्य सुखकर व्हावं, त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत, यासाठी दिवसरात्र मेहनत करतात, त्यांच्यासाठी धडपडत असतात. पण, श्रद्धा तुझ्यासोबत जे झालं त्यानंतर अशा कितीतरी मुलींची स्वप्नं मरतील, पालक काळजीपोटी त्यांना बाहेर जाऊ देणार नाहीत. कारण, त्यांच्या मुलीलाही एखादा आफताब भेटला तर काय होईल, अशी भीती त्यांना वाटणार. एका टॉक्सिक रिलेशनशिपमुळे तुझा जीव गेला गं, तू त्याला सोडू शकली नाहीस पण त्याने तुला कायमचं संपवलं आणि तुझ्या जाण्याने कितीतरी मुलींच्या स्वप्नानाही संपवलं!
प्रेम करणं गुन्हा नाही, पण मुलींनी ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर साथ देईल का, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, स्वभाव कसा आहे, या सर्व गोष्टींचाही विचार करायला हवा. कारण फक्त प्रेम असेल, पण नात्यात समजूतदारपणा नसेल, एकमेकांना सांभाळून घेता येत नसेल, तर सतत भांडणं होत असतील, तर त्या नात्याचा शेवट कधीच गोड होऊ शकत नाही. तुमच्या एका निर्णयामुळे तुमचं संपूर्ण आयुष्यही संपू शकतं, म्हणून नातं जोडताना वर सांगितलेल्या बाबींचा विचार नक्कीच व्हायला हवा.