‘मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी’ असं जरी म्हणत असले तरी ‘तिचा’ जन्म झाला तेव्हा घरात आनंद, उत्साह अजिबात नव्हता. उलट ‘मुलगी झाली’ म्हणून तिच्या घरातले उदास झाले. त्यांनी पाठच फिरवली. जन्मदाता बापही याला अपवाद नव्हता. त्यानंतर तिचे आईवडील वेगळे झाले. एकट्या आईने मोठ्या कष्टाने तिला घडवलं. तिला सतत मोठी स्वप्नं बघण्याची सवय लावली. लहानपणापासून तल्लख बुध्दी लाभलेल्या त्या मुलीनंही ही स्वप्नं प्रत्यक्षात आणली. प्रचंड धैर्य, चिकाटीचं बाळकडू मिळालेली ती मुलगी पहिल्या फटक्यात युपीएससी पास झाली आणि आयएएससाठी तिचं सिलेक्शन झालं… तिचं नाव आहे- सृष्टी डबास. सृष्टीची यशोगाथा देशभरात चर्चेचा विषय आहे. याचं कारण म्हणजे सृष्टी कोणतंही कोचिंग न घेता युपीएससी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण आहे आणि तीदेखील पूर्णवेळ नोकरी करत असताना…
देशातीलच नाही तर जगभरातील अत्यंत अवघड परीक्षांपैकी गणली जाणारी युपीएससी परीक्षा सृष्टी उत्तीर्ण झाली ती केवळ तिच्या बुध्दीमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर. लहानपणापासून तिनं तिच्या आईचा संघर्ष पाहिला होता. आपण मोठं झाल्यावर आईच्या कष्टाचं चीज करायचं हे तर तिनं ठरवलेलं होतंच. पण संपूर्ण देशासाठी अन्यायाविरोधात लढायचं असाही तिनं निश्चय केला होता. ठरवल्याप्रमाणे ती फक्त तिच्या ध्येयाचा पाठलाग करत राहिली.२०२३मध्ये तिनं युपीएससी दिली. तिला लेखी परीक्षेत ८६२ गुण मिळाले आणि व्यक्तिमत्त्व चाचणीत १८६ गुण मिळाले. एकूण १०४८ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया ६वा रँक मिळवून तिनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
सृष्टीचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी रानीखेडा इथं झाला. जन्माला आल्यावर नाकारलेपणाची भावना आणि आईचा प्रचंड संघर्ष, त्याग या सगळ्याचा तिनं आपल्या लढाईसाठी शस्त्र म्हणून वापर केला. दिल्लीच्या गंगा इंटरनॅशनल स्कूलमधून तिचं १२ वी पर्यंतचं शिक्षण झालं. १२वीत तिला ९६.३३% मिळाले होते. त्यानंतर तिनं इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात बी.ए आणि इग्नू विद्यापीठातून राज्यशास्त्रातूनच एम.ए केलं. त्यानंतर तिनं दिल्लीच्या सामाजिक न्याय विभागात काही काळ काम केलं. मग ती मुंबईत आरबीआयमध्ये रुजू झाली. ही नोकरी करत असतानाच तिनं युपीएससीची तयारी सुरू केली. पण हा मार्ग अजिबात सोपा नव्हता. दिवसा काम आणि रात्री परीक्षेची तयारी असं तिचं वेळापत्रक होतं. दुपारी जेवणाच्या सुट्टीत ती आरबीआयच्या लायब्ररीमध्ये जायची. तिथली पुस्तकं आणून त्याच्या नोट्स ती काढायची. त्यानंतर घरी गेल्यावर परत रात्री अभ्यास करायची. कोणत्याही प्रकारचं कोचिंग किंवा क्लासेस तिनं लावले नव्हते. एकाच विषयावरची वेगवेगळी पुस्तकं मात्र ती वाचायची. त्याचा अत्यंत शिस्तबध्द रितीने तिनं अभ्यास केला. त्याचबरोबर वेळेचं योग्य नियोजन, अभ्यासातलं सातत्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर आपण हे यश मिळवल्याचं सृष्टीचं म्हणणं आहे.
‘खरंच हा प्रवास सोपा नव्हता. रात्री उशिरापर्यंत केलेली जागरण… पहाटे उठून परत ऑफिससाठीची तयारी, रोजच्या जगण्यातले अनेक त्याग, संघर्ष… असं सगळं होतं. पण मला हार मानायची नव्हती. मला माझ्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा होता.’ सृष्टीच्या मेहनतीचं चीज झालं. पूर्णवेळ नोकरी करत आणि तेही कोचिंग नसताना युपीएससी कशी उत्तीर्णहोणार? असा प्रश्न अनेकांनी तिला विचारला होता. पण तिनं त्यांना आपल्या निकालातूनच उत्तर दिलं. रोजच्या अभ्यासाबरोबरच सृष्टी न चुकता किमान चार वेगवेगळी वृत्तपत्रे वाचायची. सृष्टी कुशल कथ्थक नर्तिकाही आहे. युपीएससी टॉपर्स लिस्टमध्ये तिचं आता नाव आहे.
प्रतिकूल परिस्थितीसमोर हात टेकणारे अनेकजण असतात. पण त्या संघर्षालाच आपलं शस्त्र करणारे सृष्टीसारखे अगदी थोडेजण असतात. आकर्षणाच्या हजारो गोष्टी आजूबाजूला असतानाही सृष्टी त्यात अडकली नाही. तिची आई सतत तिच्यासोबत होती. तिच्या आईच्या त्याग आणि संघर्षाला सृष्टीनं स्वत:च्या कष्टांची, जिद्दीची जोड दिली आणि त्यातूनच तिनं साकारलं तिचं आयुष्यभराचं स्वप्नं….