संपदा सोवनी
अभिनेत्री श्रुती हसन तिच्या सोशल मीडियावरच्या मोकळ्याढाकळ्या वावरामुळे प्रसिद्ध आहे. आजवर ती अभिनयापेक्षा गात्या गळ्यासाठी आणि उत्तम पियानोवादनासाठी अधिक नावाजली गेली आहे. तिनं लिहिलेलं आणि गायलेलं ‘मॉन्स्टर मशीन’ हे नवीन गाणं नुकतंच यूट्यूबवर प्रसिद्ध झालंय. या गाण्याचे ‘आय नीड अ मॉन्स्टर, नॉट ए मॅन… आय ॲम सो ब्युटीफिली ट्विस्टेड, लुक इनसाइड मी इफ यू कॅन…’ हे शब्द रसिकांचं लक्ष वेधून घेताहेत. आता श्रुतीनं एका मुलाखतीत या गाण्यामागची प्रेरणा सांगून आधुनिक जगातही स्त्रियांवर जी बंधनं गृहित धरली जातात, ती झुगारून देत आपलं मत मांडणाऱ्या स्त्रीमनाचा हा आविष्कार सांगितलं आहे.
भारद्वाज रंगन यांनी ‘गलाटा प्लस’ या व्यासपीठासाठी श्रुतीची घेतलेली एक मुलाखत नुकतीच यूट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. त्यात तिनं स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल मांडलेली काही मतं चर्चिली जाताहेत. स्त्रियांना डाकीण (witch) ठरवून जाळण्याच्या प्रथेचा संदर्भ तिच्या या नवीन गाण्याला आहे, असं श्रुती रंगन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगते. ती म्हणते, ‘We are the granddaughters of the witches you couldn’t burn, हे प्रसिद्ध वाक्य मला आकर्षक वाटलं. आता काळ बदलला आहे, पण अजूनही स्त्रियांना प्रतीकात्मक स्वरूपात का होईना, या प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागतोच. आधुनिक किंवा ‘मॉडर्न’ स्त्रीकडे काही मूल्यं उरलेली नाहीत, असं म्हणताना किंवा अशा एखाद्या स्त्रीला ‘बी’पासून सुरू होणारी शिवी देताना तिनं ठरीव सामाजिक मान्यतांशी जुळवून घ्यावं अशी अपेक्षा धरली जाते. स्वत:त आग, ऊर्जा असलेल्या स्त्रियांनी ती ऊर्जा अबाधित राखावी आणि समविचारी पुरूषांनी स्त्रियांना पाठिंबा द्यावा, ही या गाण्याच्या मागची संकल्पना आहे.’
आणखी वाचा-नातेसंबंध: ‘लिव्ह-इन’मधून बाहेर पडायचंय?
आपल्या ‘गॉथ’ प्रेमाविषयीही श्रुती प्रसिद्ध आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांची आणि तशाच मेकअपची आवड आणि स्वत:ला आपण आहोत तसं जगासमोर सादर करणं, ही या मानसिकतेची वैशिष्ट्यं मानली जातात. ‘गॉथ पापा’ (तमिळमध्ये- ‘गॉथ स्टाईल’प्रेमी मुलगी) समजली जाणाऱ्या श्रुतीच्या चित्रपटांमधल्या भूमिका मात्र पुष्कळदा या व्यक्तिमत्त्वाच्या एकदम उलट असतात. चित्रपटांत एक रूप आणि समाजमाध्यमांवर आपण आहोत तसं खरं रूप तिनं जपलंय, म्हणूनही अनेकजण तिचं कौतुक करतात. आपल्या करिअरविषयी बोलताना ती म्हणते, ‘माझ्यात जसं गॉथ प्रेम आहे, तशीच माझी एक आनंदी, अवखळ बाजूही आहे. सगळ्यांचंच असं असतं! प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात अनेक व्यक्तिमत्त्वं असतात. आता मात्र ऑनलाईन माध्यमांवर लोक लगेच ‘तमिळमध्ये बोल’, ‘हिंदीत का बोलत नाही?’, ‘तू इंग्लिशमध्येच का गातेस?’ असे प्रश्न विचारून मोकळे होतात. पण मी प्रामुख्यानं इंग्लिशमध्येच लिहू शकते. मला जितकं भारतीय संगीत प्रिय आहे, तितकंच पाश्चात्य संगीतही आवडतं. अभिनयाच्या करिअरमध्ये मात्र सुरूवातीला मला असं सांगितलं जाई, की व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू दाखवून लोकांना गोंधळात पाडू नकोस. काळे कपडे घालू नको, अमुक असं बोलू नको, अमुक हे गाऊ नकोस… थोडक्यात श्रुतीचं हे रूप उघड करू नकोस. आता मात्र मला या गोष्टीचं काही वाटत नाही.’
lokwomen.online@gmail.com