मंगला जोगळेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हल्ली धकाधकीच्या जीवनात अपुरी झोप ही अनेकांच्या जीवनातील नित्याचीच बाब झाली आहे. दिवस संपतो, पण कामाचा ढीग संपत नाही, ही तक्रार शहरात तर जवळजवळ प्रत्येकाचीच असते. शाळेत जाणारे चिमणे जीवसुद्धा या चक्रात अडकलेले बघून आपल्या पोटात तुटते. अमेरिकेतील ‘नॅशनल स्लीप फाउंडेशन’च्या एका अभ्यासानुसार ३५ टक्के लोकांची झोप पूर्ण होत नाही. आपल्या समाजजीवनात झपाट्याने झालेले बदल पाहता आपल्याकडे खूप काही वेगळी परिस्थिती असेल असे नाही. झोपेच्या तक्रारी, मानसिक त्रास, आरोग्याच्या तक्रारी, म्हातारपणामुळे जाणवणारे आरोग्य प्रश्न, अशा विविध कारणांमुळे समाधानकारक झोपेपासून माणूस दूर राहतो आहे. ऑफिसचं काम जास्त झाले, मुलांचा अभ्यास वाढला, घरात पाहुणेरावळे आले, काही समारंभांचे आयोजन असले, तर पहिला परिणाम होतो तो आपल्या झोपेवर.
अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम
महिनोन्महिने, वर्षानुवर्षे अपुऱ्या झोपेवर वेळ मारून नेणारे ‘सुपरमानव’ आपल्या तडफदारीची कितीही चुणूक दाखवत असले, तरी त्यांच्या मेंदूवर झोपेच्या अभावातून येणाऱ्या थकव्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो, असं अभ्यासांमधून दिसून येते. कामात लक्ष न लागणे, विचारशक्तीवर परिणाम होणे, सर्जनशीलता कमी होणे, या सर्व गोष्टी कमी झोपेमुळे होतात. चटकन नाव न आठवणे, शब्द न आठवणे, असे अनुभव यायला लागतात. अपुऱ्या झोपेमुळे चक्कर आल्यासारखं वाटणे, काय बोलतो आहोत- ऐकतो आहोत त्याचे अवधान नसणे, असे अनुभवही आपल्याला कधीमधी येतात. रस्त्यावरील कितीतरी अपघात झोपेच्या अभावी घडून येतात.
माणसाला रोज सात ते आठ तास झोप मिळाली नाही आणि या दिनक्रमाची कालक्रमणा तशीच चालू राहिली, तर बुद्धीची धार कमी झाल्यासारखं वाटू शकते आणि मेंदूचे आरोग्य हळूहळू बिघडू शकते. रोज सहा तास झोप घेणाऱ्यांमध्येही चुटकीसरशी विचार करण्याची क्षमता कमी होते, तसेच स्मरणशक्तीच्या चाचण्यांमध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. झोप पुरेशी न झाल्यामुळे मन स्थिर करता येत नाही. त्यामुळे नवीन ज्ञानग्रहणाला अधिक वेळ लागतो. मेंदूमध्ये माहिती साठवण्यावर परिणाम होतो. प्रसंगावधानतेवर, विचार सुचण्यावर, विचार मांडण्यावरदेखील अपुऱ्या झोपेमुळे परिणाम होतो. नवीन कौशल्ये शिकत असताना ठरावीक झोप मिळाली नसेल, तर ते कौशल्य कायमच्या स्मृतीत जाऊ शकत नाही. अष्टावधानी असणे हा आपल्या कार्यशैलीचा एक मोठा आधारस्तंभ मानला जातो, त्यावरही झोप नसल्याचा परिणाम होतो. म्हणजेच एकंदरीत आपली कार्यक्षमता दुर्बल होत जाण्याच्या मार्गाने आपली वाटचाल चालू होते. झोपेचा आणि शिक्षणाचा संबंध विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीही समजून घेणे आवश्यक आहे.
झोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते. तरुण पिढीमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण वाढल्याचे त्यामुळेच दिसते. मधुमेहामुळे मेंदू लवकर थकायला लागतो, असेही शास्त्रज्ञांना लक्षात आले आहे. त्रासिकपणा, त्रागा, चिडचिड, निराशा असे नको असलेले स्वभावातील बदल हा जीवनातील ताण आणि अपुरी विश्रांती याचाच परिणाम आहे. झोपेच्या अभावामुळे एकंदरीतच शरीर उतरणीला लागतं, असं म्हटल्यास ते गैर ठरणार नाही. थोडं थांबून आपली ‘बिझी लाईफस्टाइल’ आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा हिशेब प्रत्येकानं करण्याची गरजच यातून दिसते. महिनोन्महिन्यांची सोडा, खरं तर अगदी एखाद्या दिवसाची कमी झोपही मेंदूला परवडणारी नसते.
mangal.joglekar@gmail.com