डिसेंबर म्हणजे ट्रिप आणि त्यातली मजा. ‘इयर एन्ड’ साजरा करण्याचं प्लॅनिंग. सर्व मैत्रिणींना एकत्र भेटून सेलिब्रेशन कसं करायचं ते ठरवायचं होतं. तनुजानं आज तिच्या घरीच सर्वांना बोलावलं होतं. तिनं नुकताच नवीन फ्लॅट घेतला होता. सर्वजणी आल्यानंतर ती तिचं नवीन घर, नवीन इंटेरिअर अगदी उत्साहानं सर्वांना दाखवत होती. किचन, लिव्हिंग रूम, मुलांची रुम हे सर्व दाखवून झाल्यावर ती बेडरूममध्ये सर्वांना घेऊन गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ही माझी बेडरूम आणि शेजारी तन्मयची बेडरूम. दोन्ही रूममधल्या थीम्स वेगवेगळ्या आहेत.”

ती उत्साहानं सर्व सांगत होती, पण निकितानं विचारलं, “अगं तुझी आणि तन्मयची बेडरूम एकच असेल ना? वेगळी कशी?”

“हो. आमच्या दोघांच्या बेडरूम्स वेगळ्या आहेत.”

“अगं, पण मी समजले नाही. नवरा बायकोची बेडरूम एकच असते ना?”

“नाही. आमच्या दोघांच्या बेडरूम्स वेगवेगळ्याच आहेत कारण आमच्यात ‘स्लिप डिव्होर्स’ आहे.”

“काय? डिव्होर्स? अगं, तू काही बोलली नाहीस आमच्याशी?” मेधा जवळ जवळ किंचाळलीच.

ज्योती म्हणाली, “तनुजा, सहा महिन्यांपूर्वी आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा तर तुम्ही सोबतच होता ना?”

“एवढं सगळं झालं आणि तू सांगितलं नाहीस आम्हांला?” नमिताने विचारलं.

चिकित्सक आम्रपाली म्हणाली, “अगं डिव्होर्स आहे ना? मग, एकत्र घरात कसं राहणार?”

सर्वजणी अनेक प्रश्न विचारायला लागल्या, तसं तनुजा म्हणाली, “अगं, तुम्ही समजताय तसं नाहीये, आमचा काही कायदेशीर डिव्होर्स झालेला नाहीये. आम्ही अजूनही एकमेकांचे पती पत्नी आहोत. आम्ही एकत्रच राहत आहोत आणि राहणार आहोत, फक्त आमचा ‘स्लिप डिव्होर्स’ आहे, म्हणजे आम्ही एकमेकांसोबत झोपत नाही. म्हणून आमची बेडरूम्स वेगळी आहे.”

हेही वाचा – डॉ. मनमोहन सिंग… भारतीय महिलांचा खंबीर पाठिराखा

तनुजानं हे सांगितल्यावर पुन्हा सगळ्याजणी तर्क वितर्क करायला लागल्या. दोघांपैकी एकाला काही आजार आहे का? तन्मय व्यसनी आहे का? त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही वाद आहेत का? तन्मयचं कुठं अफेअर आहे का? त्याच्यात काही लैंगिक दोष आहेत का? – काही बाही प्रश्न समोर यायला लागले.

तनुजानं पुन्हा सर्वांना थांबवलं आणि सांगितलं, “तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. तुमचे काहीतरी गैरसमज होत आहेत. आम्ही दोघांनी वेगळं झोपायचं ठरवलं आहे, कारण तन्मयची कंपनी अमेरिकेतील आहे. त्याचे सर्व कॉल्स तेथील वेळेप्रमाणे म्हणजे आपल्याकडील रात्रीचे असतात. त्याच्या कॉल्समुळं मला त्रास होऊ लागला. माझ्या दुसऱ्या दिवशीच्या कामांवर त्याचा परिणाम व्हायला लागला. त्यातच मला झोपेत घोरण्याची सवय आहे, त्याचा त्याला त्रास होत होता. तो उशिरा झोपायला आला तरी माझ्या घोरण्यामुळं त्याची झोप व्हायची नाही, म्हणून आम्ही वेगळं झोपायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही आमच्या बेडरूम्सही वेगळ्या करून घेतल्या. आमच्यात फक्त ‘स्लिप डिव्होर्स’ आहे.”

“हे काय? असं वेगवेगळं झोपलात तर त्या वैवाहिक नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. पती पत्नींमध्ये कोणतेही वाद असले तरी ते बेडरूममध्ये मिटतात आणि मिटावेत असंच म्हटलं जातं ना? असं वेगळं झोपून दुरावा वाढणार नाही का? मग ‘स्लिप डिव्होर्स’चा रियल डिव्होर्स व्हायला वेळ लागणार नाही.”

सर्वजण आपली मतं मांडत होत्या. इतक्या वेळ शांत असलेली सुप्रिया म्हणाली, “तुम्ही म्हणता त्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी त्या पूर्ण सत्य नाहीत. पती पत्नीनं ठरवून केलेली ती एक सोयही असते. जर दोघांच्या सवयी वेगळ्या असतील तर दोघांनाही एकमेकांचा त्रास होतो. झोप पूर्ण होत नाही, त्यामुळं चिडचिड वाढते. एकमेकांमधील वाद वाढतात. त्यापेक्षा दोघांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्वतंत्र झोपणं काही वेळा हिताचेच असते. आता यामुळं खरंच दुरावा निर्माण होतो का? याचा विचार केला तर दोघांनीही याबाबत काही पथ्य पाळणं आणि नियोजन करणं महत्वाचं असतं. एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा केव्हा, कधी, कशा पूर्ण करायच्या याबाबतीत दोघांमध्ये चर्चा होणं, काही गोष्टी ठरवून घेणं महत्वाचं असतं. घरातील कोणत्याही व्यवहारांवर, नातेसंबंधावर त्याचा परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. ज्या वेळी पती पत्नी मध्ये खूप वाद असतात, दोघांचं एकमेकांशी आजिबात पटतं नाही त्यामुळं त्या दोघांमध्ये मानसिक आणि शारीरिक दुरावा निर्माण होतो, त्यामुळं ते एकत्र झोपत नाहीत तेव्हा मात्र ते एकमेकांपासून खऱ्या अर्थानं लांब गेलेले असतात. परंतु समजून उमजून एकमेकांच्या मर्जीनं दोघेही ‘स्लिप डिव्होर्स’चा मार्ग स्वीकारत असतील आणि त्यांच्या एकमेकांच्या प्रति असणाऱ्या कर्तव्यांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेत असतील तर नातेसंबंध सुदृढ राहण्यासाठी काहीवेळा ‘स्लिप डिव्होर्स’ फायदेशीरही ठरतो. ताणतणाव दूर करण्यासाठी अनेक जोडपी ‘स्लिप डिव्होर्स’चा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. तनुजा आणि तन्मय यांनी हा पर्याय जाणीवपूर्वक स्वीकारला आहे, त्यामुळं कोणत्याही शंका मनात आणू नका.”

हेही वाचा – चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल

सुप्रियचं म्हणणं सर्वांनीच शांतपणे ऐकून घेतलं. रिलेशनशिपमधील हा ट्रेंडही समजावून घेण्याची आज गरज आहे. केवळ एकत्र झोपलं म्हणून पती पत्नीचं नातं अधिक चांगलं असतंच असं नाही, तर नातं जपताना एकमेकांना नक्की काय हवंय याचा विचार करून आरोग्यमय सुदृढ सहजीवनासाठी कधी कधी ‘स्लिप डिव्होर्स’चा पर्यायही फायदेशीर ठरतो हे सर्वजणींच्या लक्षात आलं.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slip divorce relationship married life ssb